स्तंभलेख, समुद्रगुप्ताचा : (अलाहाबाद स्तंभलेख). अलाहाबाद (उत्तर प्रदेश) येथील विस्तृत स्तंभलेख हा गुप्त सम्राट समुद्रगुप्त (इ. स. सु. ३२०–३८०) याच्या कारकिर्दीविषयीचे महत्त्वाचे पुराभिलेखीय साधन आहे. प्रस्तुत लेख मौर्य सम्राट अशोक (इ.स. पू. ? ३०३–? २३२) याच्या येथील शिलास्तंभावर कोरलेला आहे. गुप्त राजघराण्यातील हा पहिला उपलब्ध कोरीव लेख आहे. याव्यतिरिक्त एरण (जि. सागर, मध्य प्रदेश) येथे एका शिळेवर समुद्रगुप्ताची खंडित प्रशस्ती कोरलेली आढळते. समुद्रगुप्ताच्या प्रशस्तिलेखाव्यतिरिक्त या स्तंभावर अशोकाची राणी कारुवाकी हिचा शिलालेख व कौशाम्बीच्या राजांना उद्देशून खोदलेल्या आज्ञा असल्याने मुळात हा स्तंभ कौशाम्बी येथे उभारलेला असावा, असे तज्ज्ञांचे मत आहे. कालांतराने हा स्तंभ फिरूझशाह तुघलक (१३५१–८८) याने अलाहाबादच्या किल्ल्यात स्थलांतरित केला असावा. या स्तंभावर मोगल सम्राट जहांगीर (१५६९–१६२७) याची वंशपरंपरा विशद करणारा कोरीव लेखही आढळतो.

अलाहाबाद येथील स्तंभ.

इ. स. १८३४ मध्ये संस्कृत विद्यावंत कॅप्टन अँथोनी ट्रॉयर यांनी द जर्नल ऑफ द एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलच्या तिसऱ्या खंडात या शिलालेखाचे वाचन आणि ठसे सर्वप्रथम प्रसिद्ध केले. त्यानंतर ब्रिटिश सनदी अधिकारी आणि शिलालेखअभ्यासक जॉन फेथफुल फ्लीट (१८४७–१९१७) यांनी कॉर्पस इन्सक्रिप्शनम् इंडिकेरमच्या तिसऱ्या खंडात या लेखाचे सविस्तर  विवेचन केले (१८८८). या लेखाने स्तंभावरील २ मी. रुंद व १.६ मी. लांब इतकी जागा व्यापली आहे. लेख उत्तर हिंदुस्तानातील चौथ्या शतकाच्या प्रथमार्धात प्रचलित असलेल्या ब्राह्मी लिपीत संस्कृत भाषेत कोरला आहे. सोळाव्या ओळीपर्यंत पद्य आणि उर्वरित गद्यरचना आहे. ‘ळ’ अक्षराचा वापर येथे झालेला दिसतो. शब्दांमध्ये ‘य’ पूर्वी ‘र’ आल्यास ‘य’ चे द्वित्व आणि ‘र’ नंतर ‘क’ आल्यास ‘क’ चे द्वित्व झालेले दिसून येते. लेखाचा सुरुवातीचा भाग नष्ट झाला आहे. लेखात काळाचा उल्लेख नाही. प्रस्तुत लेख प्रशस्ती प्रकारचा आहे.

शिलालेख.

समुद्रगुप्ताचा महासेनापती, संधिविग्रहीक (संरक्षणमंत्री) आणि महादंडनायक (अंतर्गत सुरक्षाप्रमुख) हरिषेण याने ही प्रशस्ती रचली होती. हरिषेण हा खाद्यटपाकिक (मुदपाकखान्याचा प्रमुख) व महादंडनायक ध्रुवभूती याचा पुत्र होता. महादंडनायक तिलभट्टकाने ही प्रशस्ती कोरविली. प्रस्तुत प्रशस्तिलेखात समुद्रगुप्ताची वंशावळ, त्याचे व्यक्तिमत्त्व, पराक्रम, विद्वत्ता, राज्यविस्तार, अश्वमेध यज्ञ इत्यादींचे तपशील दिले आहेत.

लेखात समुद्रगुप्त हा महाराज श्रीगुप्ताचा पणतू, महाराज घटोत्कचाचा नातू आणि सम्राट चंद्रगुप्त पहिला (कार. ३१८–३३५) आणि कुमारदेवी यांचा पुत्र असल्याचे विशद केले आहे. समुद्रगुप्त आपल्या आजोळच्या कुळाचा आवर्जून उल्लेख करतो. तो ‘लिच्छवी दौहित्र’ (लिच्छवी वंशातील) असल्याची नोंद या कुळाचे गुप्त परिवारातील महत्त्वाचे स्थान विशद करते. सम्राट चंद्रगुप्त आणि राणी कुमारदेवी यांचे जोडनाणे याची साक्ष आहे. चंद्रगुप्ताने या लायक पुत्रास आपला वारस घोषित करून ‘असेच पृथ्वीचे पालन कर’ अशी आज्ञा केली होती. पित्याची निवड रास्तच होती हे समुद्र्गुप्ताच्या दिग्विजयांची वर्णने सिद्ध करतात.

पाटलिपुत्रावर राज्य करणाऱ्या कोटकुल राजाला त्याने अगदी लीलया, जणू खेळत दंडाला धरून फिरवावे त्याप्रमाणे पराभूत केले. पाटलिपुत्र ही मगधची पारंपरिक राजधानी गुप्तांच्या ताब्यात येणे हा समुद्र्गुप्तासाठी महत्त्वाचा विजय होता. सातव्या पद्यात पुष्प (पूर) या शहराचा उल्लेख येतो. हे पाटलिपुत्राचे दुसरे नाव असावे. चिनी प्रवासी ह्यूएनत्संग (यूआनच्वांग) ‘कु सु मो पो लो’ आणि ‘पो चा लि त्सु चिंग’ अशा दोन्ही नावांचा उल्लेख करतो. त्यानंतर समुद्र्गुप्ताने अच्युत आणि नागसेन, रुद्रदेव, चंद्रवर्मा, गणपतिनाग, नंदि, मतिल, नागदत्त, बलवर्मा या आसपासच्या प्रदेशातींल शत्रूंचा पूर्ण पराभव केला. अशा रीतीने साम्राज्याचा गाभा सुरक्षित करून समुद्र्गुप्ताने साम्राज्यविस्ताराला सुरुवात केली आणि आपल्या नाण्यांवरील ‘सर्वराजओच्छेता’ हे बिरुद सार्थ केले.

यानंतर सीमावर्ती वन्य प्रदेशातील राजांना पराभूत करून त्यांना आपले ‘परिचारक’ हा हुद्दा दिला. मात्र ही राज्ये खालसा न करता त्यांना मांडलिक बनवण्याची नीती अवलंबिली. यात समुद्र्गुप्ताचे राजकीय चातुर्य दिसून येते. समुद्रगुप्ताचा वाढता दबदबा पाहून समतट (आग्नेय बंगाल), डवाक (आसाममधील नौगाव जिल्हा), कामरूप (उत्तर आसाम), नेपाळ, कर्तुपूरच्या (जालंदर जिल्ह्यातील कर्तारपूर) राजांनी तसेच मालव, आर्जुनायन, यौधेय, माद्रक, आभीर या गणराज्यांनी तसेच मध्य प्रदेशातील सनकादिकांनी त्याचे स्वामित्व मान्य केले आणि त्याला खंडणी देऊ केली. यावरून सुदूर पूर्व ते रावी व चिनाबच्या खोऱ्यापर्यंत गुप्तसाम्राज्याचा विस्तार झाला, असे समजते.

उत्तरपथ पूर्णपणे काबीज झाल्यावर समुद्रगुप्ताने आपल्या राजनीती व युद्धकौशल्याने दक्षिणपथ जिंकून घेतला. कोसलचा महेंद्र, महाकांतारचा (बस्तर जिल्हा) व्याघ्रराज, पिष्टपूरचा महेंद्रगिरी, वेंगीचा हस्तिवर्मन, पालक्काचा उग्रसेन, कांचीचा (सध्याचे कांजीवरम्) पल्लवराजा विष्णुगोप, एरंडपल्लचा दमन, अवमुक्तचा नीलराज, देवराष्ट्रचा कुबेर, कुस्थलपूरचा धनंजय, कोरलचा मंटराज आणि काहूरचा स्वामिदत्त या राजांना पराभूत केले; परंतु त्यांची राज्ये खालसा न करता त्यांना मांडलिक केले. सिंहलद्विपच्या (श्रीलंका) अधिपतींनी त्याचे स्वामित्व मान्य केले. बौद्ध साहित्यातील दाखल्यानुसार श्रीलंकेचा राजा मेघवर्ण याला बोधगयेस येणाऱ्या यात्रेकरूंसाठी तीन मजले आणि सहा मंडप असलेला विहार बांधण्याची अनुमती समुद्रगुप्ताने दिली. या घटनेचा उल्लेख प्रस्तुत लेखात मात्र नाही. वायव्येकडील ‘दैवपुत्र शाही शाहानुशाहीʼ उपाधी घेणारे कुशाण, तसेच शक-क्षत्रप समुद्र्गुप्ताशी युद्ध न करता त्याला शरण गेले. यासाठी त्यांना आपल्या राजकन्यांचे विवाह गुप्त घराण्यात करणे, गुप्तांच्या गरुडचिन्हांकित नाण्यांचा वापर करणे इत्यादी मार्ग अवलंबावे लागले. प्रस्तुत प्रशस्तिलेखातील या माहितीमुळे समुद्रगुप्ताचा राज्यविस्तार आणि तत्कालीन राजकीय परिस्थितीचा अचूक अंदाज येतो.

प्रस्तुत लेख समुद्रगुप्ताच्या व्यक्तिमत्त्वावर आणि कलागुणांवर भाष्य करतो. तो शत्रूंचा कर्दनकाळ; पण सज्जनांचा आश्रयदाता आणि दीन व अनाथ जनांचा पोशिंदा होता. समुद्रगुप्त अत्यंत उदार होता. त्याने शेकडो गोसहस्रदाने दिली होती. आपल्या दिग्विजयानंतर त्याने अश्वमेध यज्ञ केला होता, हे त्याच्या ‘अश्वमेध’ प्रकारच्या नाण्यांवरून समजते. नाण्यांवर अश्वमेधाच्या अश्वाची आकृती असून ‘अश्वमेधपराक्रमःʼ असा उल्लेखही आहे; तथापि ही घटना बहुधा प्रस्तुत लेख कोरल्यानंतर घडली असल्याने त्याचा उल्लेख या लेखात नाही.

समुद्रगुप्ताने पराभूत राजांना सन्मानाने वागविले आणि त्यांची संपत्ती परत केली. ही प्रशस्ती तो भूलोकीवरचा कुबेर, इंद्र, वरुण आणि यमाप्रमाणे तेजस्वी असल्याचे सांगते. तो योद्धा आणि राजकारणधुरंधर तर होताच, पण गायन आणि वादनकलेतही निपुण होता. त्याच्या एका नाण्यावर तो वीणा वाजवीत बसलेला दाखविला आहे. हरिषेण म्हणतो, ‘त्याने बुद्धिमत्तेत बृहस्पतीला, वाद्यवादनात तुम्बरूला आणि गायनात नारदाला मागे टाकले होतेʼ. काव्यरचनेत तो अव्वल होता. त्याला ‘कविराज’ असे म्हटले जात असे. समुद्रगुप्ताच्या नाण्यांवरील वृत्तबद्ध लेखांवरून याचा प्रत्यय येतो.

संदर्भ :

  • Fleet, John Faithfull Ed., Corpus Inscriptionum Indicarum, Vol III, Culcutta, 1888.
  • Mookerji, Radhakumud, The Gupta Empire, Delhi, 1969.
  • Singh, Upinder, A History of Ancient and Early Medieval India : From the Stone Age to the 12th Century, Delhi, 2008.
  • Troyer, A. ‘Remarks Upon the Second Inscription of the Allahabad Pillarʼ, Journal of the Asiatic Society of Bengal, Vol. III, Calcutta, 1834
  • गोखले, शोभना, पुराभिलेखविद्या, (द्वितीय आवृत्ती), पुणे, २००७.
  • देगलूरकर, गो. बं. प्राचीन भारत, पुणे, २०१५.

समीक्षक – कल्पना रायरीकर

प्रतिक्रिया व्यक्त करा