गिरिजादेवी : (८ मे १९२९ – २४ ऑक्टोबर २०१७). हिंदुस्थानी शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीतातील ख्यातनाम ठुमरी गायिका. त्या बनारस आणि सेनिया घराण्याचे प्रतिनिधित्व करीत होत्या. त्यांचा जन्म बनारस (उत्तरप्रदेश) येथे संगीतप्रेमी सुसंस्कृत जमीनदार कुटुंबात झाला. त्यांचे वडील रामदेव रॉय संगीतप्रेमी होते. ते हार्मोनियम वाजवीत असत. त्यामुळे बालपणीच गिरिजादेवींना संगीताची गोडी लागली. त्यांनी वयाच्या ५ व्या वर्षापासून सुमारे १५ व्या वर्षापर्यंत पं. सरजू प्रसाद मिश्रा यांच्याकडे कंठसंगीताचे प्राथमिक धडे घेतले. वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी याद रहे या हिंदी चित्रपटातही काम केले होते. त्यांचा विवाह लहानवयातच मधुसूदन जैन या व्यवसायिकाशी झाला (१९४६). पुढील काळात पं. श्रीचंद मिश्रा यांच्याकडे त्यांनी वेगवेगळ्या संगीतशैलींची बरीच वर्षे तालीम घेतली. कालांतराने त्यांनी ठुमरी, दादरा, टप्पा, कजरी, होरी, चैती, बारामासा आणि भजन यांसारख्या उत्तरभारतीय गानप्रकारांमध्ये विशेष प्रावीण्य मिळविले.
अलाहाबाद आकाशवाणी केंद्रावरून (१९४९) एकल कंठसंगीत सादर करून त्यांनी आपल्या गायन कारकिर्दीस सुरुवात केली. त्यानंतर भारतातील बहुतेक सर्व आकाशवाणी केंद्रांवरून त्यांचे कार्यक्रम प्रसारित होऊ लागले. १९५१ साली बिहारच्या आरा संगीत कॉन्फरन्समध्ये त्यांचे पहिल्यांदा जाहीर गायन झाले. त्यानंतर देशभरातून तसेच परदेशातून देखील त्यांना अनेक मैफलींसाठी निमंत्रित केले गेले. अलाहाबाद, लखनऊ, वाराणसी, कोलकाता, मुंबई, जोधपूर व जयपूर इत्यादी अनेक संगीत संमेलनात त्यांनी कार्यक्रम केले. त्यांनी भारतीय प्रतिनिधी म्हणून नेपाळमध्येही सलग सात दिवस कार्यक्रम केले. त्यांनी आकाशवाणीच्या केंद्रीय ऑडिशन बोर्डावर तसेच संगीत नाटक अकादमी (दिल्ली) वर मानद सदस्य म्हणून काही वर्षे काम केले.
गिरिजादेवी पती निधनांनतर (जुलै १९७५) कोलकाता येथे वास्तव्यास गेल्या. कोलकात्यात इंडियन टोबॅको कंपनीने (आय्.टी.सी.) १९६० च्या दशकात नॅशनल रिसर्च अकॅडेमी या नावाने संस्था चालविली होती. तीत अखिल भारतीय कीर्तीचे गायक-वादक चांगले मानधन देऊन गुरुशिष्य परंपरेने शिकविण्यासाठी आमंत्रित केले जात. त्यांच्या निवासाची सोयही केली जाई. शिवाय त्यांच्याकडे सुपूर्त करण्यात येणारे शिष्यही तज्ञांच्या समितीतर्फे चाचणी परीक्षा घेऊनच निवडले जात. अशा शिष्यांना पाचशे ते पंधराशे रुपये शिष्यवृत्ती व राहण्याची सोय गुरुच्या घरी वा जवळपास केली जाई. या योजनेखाली गिरिजादेवी (बनारस घराणे) १९७७ पासून निवासी गुरू म्हणून रूजू झाल्या. त्यावेळी त्यांनी अनेक शिष्य तयार केले. त्यानंतर त्या बनारस हिंदू विश्वविद्यालयात अभ्यागत प्राध्यापक म्हणूनही कार्यरत होत्या.
सूक्ष्म स्वरस्थान, आवाजातील काकूप्रयोग (स्वर लहानमोठा करत गाण्यात रंग भरणे) ही त्यांच्या गायनाची वैशिष्ट्ये. बनारसी किंवा पूरबी ढंगाची ठुमरी त्या गात. त्या बनारसी गायनप्रकारातील गुल, बैत, नक़्श, रूबाई, धरू, कौल कलवाना हे दुर्मीळ प्रकारही शिकल्या होत्या व त्याचे सादरीकरणही त्या करीत. ठुमरीच्या अभिजात शास्त्रीय परंपरेला धक्का न लावता त्यांनी आपल्या गायकीने त्या परंपरेत भर घातली. ठुमरीला रसिकजनात मानाचे स्थान मिळवून देण्यात व लोकप्रिय करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. ठुमरी, कजरी, चैती या उपशास्त्रीय संगीत प्रकारांबरोबरच त्यांनी रागदारी संगीताचे प्रभावशाली सादरीकरण केले.
गिरिजादेवींना अनेक मानसन्मान लाभले. त्यामध्ये संगीत सरस्वती, ठुमरीची राणी, संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९७७), आईटीसी सन्मान पुरस्कार (२००३), संगीत नाटक अकादमी रतिन सदस्या (अधिछात्रवृत्ती २००७), संगीत नाटक अकादमी छात्रवृत्ती (२०१०), यांचा समावेश होतो. त्यांच्या सांगीतिक कार्याची सन्मानपूर्वक दखल घेऊन भारत सरकारने त्यांना पद्मश्री (१९७२), पद्मभूषण (१९८९) आणि पद्मविभूषण (२०१६) हे पुरस्कार दिले तसेच त्यांची प्रतिमा असलेले पाच रुपयांचे टपाल तिकिट काढले. त्यांच्या सांगीतिक जीवनावर आधारित गिरिजा :अ लाइफटाइम इन म्यूझिक हा लघुपट त्यांच्या विद्यार्थ्यांनी तयार केला आहे. त्यांच्या शिष्यसमुदायात दलाया राहत, सुनंदा शर्मा, मालिनी अवस्थी, पूर्णिमा चौधरी, सत्यनारायण मिश्रा, रीता देब, मंजू सुंदरम् यांचा उल्लेख होतो.
गिरिजादेवींचे वयाच्या ८८ व्या वर्षी ह्रदयविकाराने कोलकाता येथे निधन झाले.
न्यू ग्रोव्ह डिक्शनरी ऑफ म्युझिक अँड म्युझिशियन्समध्ये गिरिजादेवींच्या शास्त्रोक्त संगीतसाधनेविषयी गौरवपर उद्गार असून त्यांच्या निमशास्त्रीय गायनामध्ये बिहार व उत्तरप्रदेशातील प्रादेशिक वैशिष्ट्ये खूप ठळकपणे दिसून येतात असे म्हटले आहे.
संदर्भ :
- झा, मोहनानंद, भारत के महान संगीतज्ञ, २०१२, दिल्ली.
समीक्षण : देशपांडे, सु. र.