वर्मा, माणिक : (१६ मे १९२६ – १० नोव्हेंबर १९९६). सुप्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत व सुगमसंगीत गायिका. त्यांचा जन्म पुणे येथे हिराबाई व बळवंत दादरकर या दांपत्यापोटी झाला. त्यांच्या मातोश्री हिराबाई या संगीताच्या उत्तम जाणकार व कलावंत होत्या. त्यांना दत्तूबुवा बागलकोटकर, बापूराव केतकर, बशीर खाँ यांच्याकडून संगीताची तालीम मिळाली. आपल्या मुलीने सुविद्य गायिका व्हावे असा त्यांचा पहिल्यापासूनचा आग्रह.

माणिकताईंचे शालेय शिक्षण पुण्याच्या सेवासदनमध्ये झाले. पुढे सर परशुरामभाऊ महाविद्यालयातील कलाशाखेतून त्यांनी तर्कशास्त्र हा विषय घेऊन बी. ए. ची पदवी संपादन केली (१९४६). माणिकताईंना संगीताचे बाळकडू त्यांच्या आईकडून मिळाले. त्यांच्या आईव्यतिरिक्त आप्पासाहेब भोपे, बापूराव केतकर, किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक सुरेशबाबू माने, उ. इनायत खाँ, अजमत हुसेन खाँ व नंतर आग्रा घराण्याचे ‘गुणिदास’ पं. जगन्नाथबुवा पुरोहित यांच्याकडून त्यांनी गाण्याची तालीम घेतली. अलाहाबादचे पं. भोलानाथ भट्ट यांच्याकडूनही त्या सुंदर बंदिशी शिकल्या. सुप्रसिद्ध गायिका हिराबाई बडोदेकर या त्यांच्या आदर्श. माणिकताईंनी प्रथम किराणा घराण्याची मूळ पीठिका उचलली असली तरी,  आवाजाचा लगाव, आलापांचा शिस्तशीरपणा व तानक्रियेची निर्मळता या तीन बाबतींत त्यांनी किराणा घराण्याच्या परंपरेबाहेर यशस्वीपणे पदार्पण केले व स्वत:ची एक स्वतंत्र गायनशैली निर्माण केली. माणिकताईंच्या गायनाची पहिली ध्वनीमुद्रिका ‘बहरली जणु लतिका कलिका’ ही दत्ता डावजेकर यांच्या संगीतदिग्दर्शनाखाली एच. एम. व्ही. (हिज मास्टर्स व्हॉइस) या कंपनीतर्फे निघाली (१९३९).  वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी त्यांनी गणपती उत्सवात पहिला जाहीर कार्यक्रम सादर केला.

१९४७ मध्ये कोलकत्त्याच्या (कलकत्त्याच्या) प्रसिद्ध तानसेन संगीत संमेलनात गायची संधी त्यांना मिळाली. १९५० – ५५ या कालावधीत पुणे आकाशवाणी केंद्रावरून गोविंदराव टेंबे यांनी सादर केलेल्या महाश्वेता  या संगीतिकेत गायिका म्हणून माणिकताईंचा समावेश होता. १९५५-५६ साली आकाशवाणीवरून प्रसारित झालेल्या गीत रामायण  या सुप्रसिद्ध संगीत मालिकेमध्ये सात गाणी त्यांनी गायली. भावगीत गायिका म्हणून त्यांचे नाव खूप लवकर झाले. त्यांच्या भावगीत गायनात सहजता, सुरेलता, संयम इत्यादी गुणांचा आढळ होतो. सुधीर फडके, पु. ल. देशपांडे, पुरुषोत्तम सोळांकूरकर, दशरथ पुजारी, गोविंद पोवळे, मधुकर गोळवलकर, श्रीनिवास खळे, प्रभाकर जोग, बाळ माटे, विठ्ठल शिंदे, गजानन वाटवे, वसंत पवार इत्यादी मान्यवर संगीत दिग्दर्शकांकडे माणिकताईंना गाण्याची संधी मिळाली. शास्त्रीय संगीताबरोबरच अनेक भावगीते, भक्तिगीते, नाट्यगीते, चित्रपटगीते अशी वेगवेगळ्या प्रकारची गीते माणिकताईंनी गायली. त्यांपैकी काही प्रसिद्ध गीते पुढीलप्रमाणे : ‘सावळाच रंग तुझा’, ‘घननीळा लडिवाळा’, ‘हसले मनी चांदणे’, ‘त्या चित्तचोरट्याला’ इत्यादी भावगीते; ‘कौसल्येचा राम बाई’, ‘सगुण निर्गुण’, ‘अमृताहूनी गोड’ इत्यादी  भक्तिगीते आणि ‘नाथ हा माझा’, ‘स्वकुल तारकसुता’, ‘नरवर कृष्णासमान’ इत्यादी नाट्यगीते. देव पावला, गुळाचा गणपती, शेवग्याच्या शेंगा, बोलविता धनी  इत्यादी चित्रपटांसाठी त्यांनी गायलेली गीतेही खूप गाजली.  बनारसी बाजाची ठुमरी त्या भारदस्तपणे व संयमित अंदाजाने सादर करीत. देशविदेशातील अनेक स्वरमंचासह आकाशवाणी, दूरदर्शन इत्यादी माध्यमांतून त्यांचे गाणे रसिकप्रिय झाले.

माणिकताईंच्या आवाजात गोडवा होता. तालावरील प्रभुत्व, शब्दांची योग्य जाणीव, योग्य तालीम, बहुश्रुतता, स्वत:चा मोठा व्यासंग व अखंड चिंतन-मनन यांमुळे त्यांनी आपले गायन रंजक बनविले. स्वरांमुळे वाहून न जाता व तानेबरोबर न भरकटता त्या एक संयत आविष्कार उभा करीत व कोणत्याही प्रदर्शनवृत्तीस बळी न पडता त्याचे सादरीकरण करीत. त्यांच्या आविष्कारामध्ये एक प्रकारची सौम्य समावेशकता आहे. त्यांच्या गायकीचा असर दिसला नाही तरी वृत्तीचा दिसतो. त्यांच्या पद्धतीने गाताना मूलभूत मूल्यांबाबत तडजोड करावी लागत नाही याचा प्रत्यय येतो. यातच माणिकताईंचे माणिकपण सामावलेलं आहे, असं म्हणता येईल.

माणिकताईंचा विवाह गीतकार अमर वर्मा यांच्याशी झाला(१९४८). राणी वर्मा, भारती आचरेकर, वंदना गुप्ते आणि अरुणा जयप्रकाश या त्यांच्या चार कन्या. राणी व भारती यांच्याकडे त्यांच्या संगीताचा वारसा आलेला असून वंदना गुप्ते या प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहेत. गायिका सुनीता खाडिलकर या त्यांच्या कनिष्ठ भगिनी. आशा खाडिलकर, आरती  अंकलीकर-टिकेकर, अर्चना कान्हेरे, शैला दातार या त्यांच्या शिष्यांनी त्यांच्या गायनशैलीचा वारसा जपला आहे.

किती रंगला खेळ हे त्यांचे प्रसिद्ध आत्मचरित्र (१९९२) होय. अलीकडेच एच्. एम्. व्ही. कंपनीने अमृताहूनी गोड या नावाने त्यांच्या निवडक मराठी गीतांची एक ध्वनिफीत प्रसिद्ध केली आहे. देशविदेशातील अनेक स्वरमंचासह आकाशवाणी, दूरदर्शन इत्यादी माध्यमांतून त्यांचे गाणे रसिकप्रिय झाले.

भारत सरकारतर्फे पद्मश्री (१९७४), संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९८६), महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार (१९९०), लता मंगेशकर पुरस्कार (१९९२) (या पुरस्काराच्या पहिल्या मानकरी), गदिमा प्रतिष्ठान पुरस्कार (१९९५) इत्यादी अनेक पुरस्कार व मानसन्मान त्यांना लाभले. क्लीव्हलँड, ओहायओ येथे १६ मे हा त्यांचा जन्मदिवस  ‘माणिक वर्मा दिन’ म्हणून घोषित करून त्यांना सन्मानित करण्यात आले.

वृद्धापकाळाने मुंबई येथे माणिकताईंचे निधन झाले. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मुंबई येथे माणिक वर्मा प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली असून प्रतिष्ठानतर्फे कार्यक्रम आयोजित केले जातात. गायनामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस ‘माणिकरत्न’ पुरस्कार दिला जातो.

संदर्भ :

  • दीक्षित, कृ. द. अत्तरसुगंध, सगुण निर्गुण
  •  देशपांडे, पु. ल. मैत्र, शरदाचे चांदणे
  • रानडे, अशोक, मला भावलेले संगीतकार

समीक्षक – मनीषा पोळ

प्रतिक्रिया व्यक्त करा