रातंजनकर, श्रीकृष्ण नारायण : (३१ डिसेंबर १९०० – १४ फेब्रुवारी १९७४). हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे पंडित, संगीत गुरू व आग्रा घराण्याचे अध्वर्यू संगीतकार. ते आण्णासाहेब या नावाने अधिक परिचित होते. त्यांचा जन्म मुंबईमधील भटवाडीमध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांच्या आई लक्ष्मीबाईंचे ते बारा वर्षांचे असतानाच निधन झाले. त्यांचे वडील नारायण हे मुंबईत पोलिस खात्यात अधिकारी होते. ते उत्तम सतार वाजवीत असत. त्यांनी पाणिनीचे अष्टाध्यायी  व सिद्धांत कौमुदी या प्राचीन संस्कृत ग्रंथांचे अध्ययन केले होते आणि हिंदु, ख्रिस्ती व बौद्ध धर्मांचा आणि ब्रह्मविद्येचा तुलनात्मक अभ्यासही केला होता. त्यांचे मूळ आडनाव जावळगावकर-कुलकर्णी; पण सोलापूर जिल्ह्यातील रातंजन (बार्शी तालुका) येथील रहिवासी म्हणून ते रातंजनकर झाले. श्रीकृष्ण दहा भावंडांपैकी सातवे अपत्य होय.

श्रीकृष्ण यांचे शालेय शिक्षण एलफिन्स्टन हायस्कूल (मुंबई) येथे झाले. वयाच्या सातव्या वर्षी त्यांचे संगीताचे प्रारंभिक शिक्षण पतियाळा घराण्यातील उस्ताद कालेखाँ यांचे शिष्य कृष्णभट्ट होनावर यांच्याकडे सुरू झाले. त्यानंतर १९०८ पासून त्यांना ग्वाल्हेर घराण्याचे पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे शिष्य पं. अनंत मनोहर जोशी ऊर्फ अंतुबुवा यांची तालीम मिळाली (पं. गजाननराव जोशी यांचे वडील). पुढे पं. विष्णु नारायण भातखंडे यांची नियमित तालीम सुरू झाली (१९११).

मुंबईमध्ये ताडदेव येथे पारशी मंडळींनी ‘गायनोत्तेजक मंडळी’ ही पहिली शास्त्रीय संगीत शिकविणारी संस्था स्थापन (१८७०) केलेली होती. तेथे पं. भातखंडे श्रीकृष्ण यांना रोज ३-४ तास तालीम देत असत. त्यांच्या वडिलांची अहमदनगर येथे बदली झाली. त्या काळात (१९१४-१७) श्रीकृष्णांचे शालेय शिक्षण व संगीताचा अभ्यास पुढे चालू राहिला. अहमदनगर येथे बालकलाकार म्हणून त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली.

बडोद्यात पहिली ‘अखिल भारतीय संगीत परिषद’ भरली (१९१६). तेथे श्रीकृष्ण यांना आपले गुरू पं. भातखंडे यांच्यासोबत संपूर्ण परिषदेत हजर राहून नामांकित गायक-वादकांचे गायन-वादन व चर्चा ऐकण्यास मिळाली. तेथे त्यांना बडोदा संस्थानची शिष्यवृत्ती मिळाली व फलस्वरूप उस्ताद फैयाजखाँ यांच्याकडून संगीतशिक्षण घेण्याची संधीही मिळाली (१९१६-२२).  १९१८, १९२०, १९२४ अनुक्रमे दिल्ली, बनारस व लखनौ येथे अखिल भारतीय संगीत परिषदा भरविण्यात आल्या. या सर्व परिषदांमध्ये राग-स्वरूपांबद्दल व बंदिशींबद्दलच्या चर्चा ऐकण्याची सुवर्णसंधी रातंजनकरांना लाभली. पुढच्या व अखेरच्या लखनौमधील परिषदेत (१९२५) संगीतशिक्षण केंद्राची स्थापना करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर झाला आणि ‘मॅरिस कॉलेज ऑफ हिंदुस्थानी म्युझिक’ (आताचे ‘भातखंडे विद्यापीठ’) या संगीत महाविद्यालयाची स्थापना झाली (१९२६). यादरम्यान रातंजनकर विल्सन कॉलेजमधून बी. ए. झाले होते. त्यांनाही या महाविद्यालयात शिकविण्यासाठी पाचारण करण्यात आले. पुढे पं. भातखंडे यांनी रातंजनकरांची तेथील प्राचार्यपदी नेमणूक केली (१९२८). या पदावर त्यांनी १९५७ पर्यंत काम केले. १९४७ मध्ये भातखंडे संगीत विद्यालयाचे भातखंडे विद्यापीठ असे नामकरण झाले. या विद्यापीठाचे मुख्य संचालक म्हणून त्यांची निवड झाली. मुंबई येथील भारतीय विद्या भवनात भारतीय संगीत व नर्तन शिक्षापीठाची स्थापना झाली (१९४६). या शिक्षापीठाच्या सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी त्यांची नेमणूक झाली. ते अखेरपर्यंत या पदावर कार्यरत होते (१९७४). त्यांची खैरगढ (छत्तीसगड राज्य) येथील इंदिरा संगीत कलाविश्वविद्यालयाचे कुलगुरू म्हणून निवड झाली (१९६१). मुंबईतील श्रीवल्लभ संगीत विद्यालयाचे ते सन्मान्य संचालक होते (१९६२ ते १९७४). मध्यंतरीच्या काळात त्यांना एक-दोन वर्षे भातखंडे म्युझिक कॉलेजची (लखनऊ) जबाबदारी देण्यात आली.

रातंजनकर यांनी आपल्या सांगीतिक जीवनात भारतीय अभिजात रागदारी संगीताचे अध्ययन करणाऱ्यांसाठी खूप साहित्य जमा केले व नवीन निर्मिती केली. त्यांनी ‘सुजन’ या टोपणनावाने रचलेल्या ८०० बंदिशी अभिनव गीतमंजिरी  (तीन भाग) यात संकलित आहेत. याशिवाय त्यांचे २१ स्वनिर्मित राग, संगीत नाटके व काही प्राचीन ग्रंथांचे अनुवाद इत्यादी साहित्य महत्त्वाचे आहे. त्यांनी शास्त्रीय संगीतावर केलेले विपुल लेखन मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांत आहे. त्यांतील काही पुढीलप्रमाणे :  तानसंग्रह (तीन भाग), वर्णमाला (हिंदुस्थानी आणि कर्नाटक रागांमध्ये संस्कृत भाषेत रचलेले वर्णम्), ताल लक्षणगीत संग्रह, हिंदुस्थानी संगीत पद्धती की स्वरलिपी, संगीताचार्य पं. विष्णु नारायण भातखंडे (पं. भातखंडे यांचे चरित्र – नॅशनल बुक ट्रस्ट व साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई यांच्याकडून प्रकाशित, १९७३) इत्यादी. त्यांनी विविध विद्यापीठांकरिता संगीत शिक्षा (दोन भाग), अभिनव संगीत शिक्षा (दोन भाग), संगीत परिभाषा विवेचन (हिंदी व मराठी) इत्यादी पाठ्यपुस्तके लिहिली आहेत. याशिवाय त्यांनी चतुर्दण्डिप्रकाशिका या व्यंकटमखीलिखित आणि स्वरमेलकलानिधि या पं. रामामात्यलिखित दोन संस्कृत ग्रंथांचे हिंदीत अनुवाद केले. तसेच श्रीमल्लक्ष्यसंगीतम् या भातखंडे यांच्या ग्रंथावर संस्कृतमध्ये लक्ष्य संगीतकार ही टीका लिहिली. संगीतरत्नाकर मधील स्वराध्याय व रागाध्याय या प्रकरणांचे इंग्रजी अनुवाद केले. या व्यतिरिक्त त्यांनी कुमारसंभव या कालिदासाच्या महाकाव्याचे शिव-मंगलम नामक संगीतनाटक लिहिले व त्याचे निर्देशनही केले. त्यांची गोवर्धन-उद्धार (ब्रजभाषिक) आणि झांशी की राणी लक्ष्मीबाई (हिंदी-खडी बोली) ही संगीत नाटके असून त्यांचे दिग्दर्शनही त्यांनीच केले होते. त्यांची भारतीय संगीतविषयक प्रात्यक्षिके, शास्त्रीय घटकांवरील टीका-टिपणी आणि प्रसंगोपात त्यांनी दिलेली व्याख्याने ईस्थटिक आस्पेक्ट ऑफ इंडियाज म्युझिकल हेरिटेज  (Aesthetic Aspects of India’s Musical Heritage) या इंग्रजी संकलित संग्रहात आहेत.

रातंजनकर यांना अनेक मानसन्मान लाभले, अखिल भारतीय आकाशवाणीच्या श्रुतीमंडळाचे उपाध्यक्ष, बहुतेक सर्व विद्यापीठांचे संगीत परीक्षक व अभ्यासक्रमांच्या समितीचे सदस्य, तसेच ते युनेस्कोचे सभासद झाले (१९४८). भातखंडे विद्यापीठाने ‘गायनाचार्य’ या पदवीने त्यांना सन्मानित केले (१९४८). केंद्र शासनाने त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कार दिला (१९५७); तर संगीत नाटक अकादमीने त्यांच्या संगीत विश्वातील योगदानाबद्दल संगीत नाटक अकादमी छात्रवृत्ती देऊन गौरविले (१९६३).

रातंजनकर यांच्या शिष्यांत कृष्णराव गिंडे, चिदानंद नगरकर, व्ही. जी. जोग, सुमती मुटाटकर, प्रभाकर चिंचोरे, सी. आर. व्यास, एस्. सी.आर्. भट्ट, दिनकर कायकिणी, गोविंदराव दंताळे, यशवंत महाले, चिन्मय लाहिरी व संगीत दिग्दर्शक रोशनलाल आदींचा समावेश होतो.

मुंबई येथे अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले.

समीक्षक : सु. र. देशपांडे