जम्मू व काश्मीर राज्यातील एक विद्यापीठ. काश्मीर विभागाच्या तुलनेत जम्मू विभागातील पशुधन, कृषिप्रकार, पिकांचे स्वरूप इत्यादींमध्ये तफावत असून तेथील समस्यांचे स्वरूपही वेगळे आहे. त्यामुळे जम्मू विभागासाठी स्वतंत्र विद्यापीठाची मागणी वारंवार प्रकर्षाने केली जात होती. त्या मागणीचा विचार होऊन श्रीनगर येथील मूळ विद्यापीठाच्या नावानेच जम्मू व काश्मीर राज्याच्या विधानमंडळातील ऑगस्ट १९८२च्या आधिनियमानुसार जम्मू येथे २० सप्टेंबर १९९९ रोजी या स्वतंत्र विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. विद्यापीठाला जनाब शेख मोहम्मद अब्दुल्लाह या देशभक्ताचे नाव देण्यात आले. ते शेर-ए-काश्मीर म्हणून प्रसिद्ध आहेत. या विद्यापीठाचा प्रादेशिक विस्तार ४५५.६५ हेक्टर क्षेत्रावर झालेला आहे. राज्याचे राज्यपाल हे विद्यापीठाचे कुलपती असतात, तर दीपक के. शर्मा हे विद्यापीठाचे कुलगुरू आहेत.

जम्मू विभागातील कृषिक्षेत्रासाठी शिक्षण, संशोधन आणि विस्तारविषयक योजना राबविणे हा या विद्यापीठाच्या स्थापनेचा मुख्य उद्देश होता. त्याद्वारे या क्षेत्रासाठी उच्च दर्जाचे प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. विद्यापीठात कृषी उत्पादन आणि संलग्न क्षेत्रात (पशुधन आरोग्य सुधारणा व गुणवत्ता आधारित उत्पादन) मूलभूत व उपयोजित संशोधन केले जाते. जम्मूमधील चाथा येथे मुख्य विद्यापीठक्षेत्र असून तेथे वेगवेगळ्या विद्याशाखा आहेत. चाथा येथील कृषिविद्या शाखेचा विस्तार २३१.२ हेक्टर क्षेत्रावर, तर आर. एस. पुरा येथील पशुविकारविज्ञान व पशुसंवर्धन विभागाचा विस्तार ८४.१३ हेक्टर क्षेत्रावर आहे. जम्मू विभागातील वेगवेगळ्या कृषि-हवामान विभागांत आठ संशोधन केंद्रे/उपकेंद्रे आणि सात कृषिविज्ञान केंद्रे आहेत. नवीन तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी विद्यापीठ प्रशिक्षण व उजळणी कार्यक्रम आयोजित करते. कृषिविज्ञान केंद्रामार्फत नवीन तंत्रज्ञानाच्या वापरासंबंधी प्रात्यक्षिक कार्यक्रम घेतले जातात.

विद्यापीठ परिषदेद्वारे विद्यापीठाचे धोरण व कार्यक्रमांचे पुनरावलोकन करणे, विद्यापीठाचे भविष्यातील नियोजन करणे, विद्यापीठाच्या विकास व विस्तारासंबंधी सल्ला देणे, विद्यापीठाची वार्षिक खाती व वार्षिक लेखापरीक्षण अहवालाची तपासणी करणे इत्यादी जबाबदारी पार पाडली जाते. त्याचबरोबर राज्याच्या प्रगतीसाठी व विद्यापीठाच्या कामकाजासंबंधात शेतीचा प्रसार आणि त्याकरिता आवश्यक कार्यक्रम व धोरणे सूचित करण्याची जबाबदारी व्यवस्थापकीय मंडळाद्वारे पार पाडली जाते. विद्यापीठामार्फत शेतकऱ्यांना कृषिसंदर्भातील माहिती आणि हवामानाचा अंदाज या गोष्टींची माहिती तांत्रिक माध्यमे व मुद्रित पत्रके, दिनदर्शिका इत्यादींद्वारे देऊन तिचे प्रकाशन व जतन केले जाते.

विद्यापीठात बी. एससी. (कृषी), बी. एससी. (जैवतंत्रज्ञान), पशुविकार विज्ञान व पशुसंवर्धन (Faculty Of Veterinary Sciences And Animal Husbandry) या पदवीपर्यंतचे शिक्षण देणाऱ्या विद्याशाखा आहेत. कृषी व तत्संबंधित वेगवेगळ्या शाखांचे पदव्युत्तर शिक्षण येथे दिले जाते. पीएच.डी., एम. बी. ए. या शैक्षणिक सुविधाही येथे आहेत. यांशिवाय वेगवेगळ्या पदविका व प्रमाणपत्र परीक्षांचे अभ्यासक्रम येथे राबविले जातात. सध्या या विद्यापीठात कुलगुरू पासून ते शिपाईपर्यंत सुमारे ११३३ अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत.

समीक्षक – संतोष गेडाम

प्रतिक्रिया व्यक्त करा