महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी (ता. भुदरगड) येथील एक विद्यापीठवजा शिक्षणसंस्था. ही संस्था इ. स. १९४६ मध्ये ‘मौनी विद्यामंदीर’ या नावाने गारगोटी येथे ग्रामीण शाळेच्या स्वरूपात स्थापन झाली. याचे श्रेय प्रिन्स शिवाजी एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर, गोविंदराव कोरगावकर धर्मादाय संस्था कोल्हापूर आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन, पुणे यांना दिले जाते. महात्मा गांधी यांच्या शैक्षणिक विचारांचा वसा घेवून शिक्षणतज्ज्ञ जे. पी. नाईक आणि व्ही. टी. पाटील उर्फ काकाजी यांनी ‘मौनी विद्यापीठ’ नावाने १९५२ मध्ये सार्वजनिक ट्रस्ट स्थापन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरूंपैकी एक श्री. मौनी महाराज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विद्यापीठास ‘मौनी विद्यापीठ’ असे नाव देण्यात आले. या संस्थेस अजून विद्यापीठाचा कायदेशीर दर्जा देण्यात आलेला नाही. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाशी मौनी विद्यापीठाच्या उच्च शिक्षणसंस्था संलग्न आहेत. शिक्षणाद्वारे मौनी महाराजांचे विचार आत्मसात करण्यासाठी ‘ज्ञान सेवा त्याग’ हे विद्यापीठाचे ब्रीदवाक्य ठरविण्यात आले. ‘ग्रामीण पुनर्रचनेतून शिक्षण आणि शिक्षणातून ग्रामीण पुनर्रचना’ तसेच ‘शिक्षणातून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करणे’ हे विद्यापीठाचे ध्येय यशस्वी केल्याचे पाहायला मिळते.
मौनी विद्यापीठ ही ग्रामीण शिक्षणसंस्था ६५ एकर क्षेत्रात पसरलेली आहे. याचे संस्थापक, पदाधिकारी, विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी हे विद्यापीठाच्या ब्रीदवाक्याने प्रेरित होवून सेवा करतात. ‘ज्ञानासाठी आत या, सेवेसाठी बाहेर पडा व त्याग करा’ ही शिकवण मौनी विद्यापीठ देते. ग्रामीण शिक्षणात विविध प्रयोग राबविण्याच्या दृष्टीने पंचक्रोशीतील १०० हून अधिक गावे, धनगर व इतर वाड्या-वस्तींत राहणाऱ्या जनसमुदायांच्या जीवनात सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक क्रांती घडविण्याचे ध्येय उराशी बाळगून श्री मौनी विद्यापीठाची घटना तयार करण्यात आली आहे.
उद्दिष्ट्ये :
- परिसरातील जनसामान्यांचे ज्ञान, दृष्टिकोण आणि कौशल्य यांत बदल घडवून त्यांच्या जीवनाची पुनर्रचना करणे.
- सर्व स्तरांवरील शिक्षणसंस्था व प्रशिक्षण केंद्राचे सूत्रसंचालन करणे आणि युवकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोण तसेच लोकशाही मूल्यांचा विकास घडवून आणणे.
- ग्रामीण पुनर्रचनेच्या कार्यात आवश्यक नेतृत्व, समाजकार्य आणि विकासकार्य यांसाठी शिक्षकांना प्रशिक्षण देणे.
- ग्रामीण पुनर्रचनेसाठी ग्रामीण जीवनाच्या विविध पैलूंवर प्रयोग आणि संशोधन करणे.
- वरील उद्दिष्टांच्या संदर्भात ज्या क्षेत्रात नवीन प्रयोग व संशोधने होत असतील, ते लोकांपर्यंत पोहोचविणे.
- ग्रामीण समस्यांची उकल करण्यासाठी वैज्ञानिक ज्ञान आणि वैज्ञानिक तंत्रांचे उपयोजन करून शैक्षणिक विकासाद्वारे ग्रामीण समाजाला सेवा देणे.
प्रशासन व्यवस्था : मौनी विद्यापीठाने आपल्या प्रशासन व्यवस्थेत लोकशाही प्रणालीचा अवलंब केला आहे. गव्हर्निंग कौन्सिल, व्यवस्थापन समिती आणि सल्लागार मंडळ या तीन प्रमुख समित्यांद्वारे संस्थेचे कार्य चालते. गव्हर्निंग कौन्सिलचे प्रमुख हे संस्थेचे अध्यक्ष असतात, तर व्यवस्थापन समितीमधून चेअरमन यांची निवड केली जाते. संस्थेचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी संचालकाची नियुक्ती केली जाते. संस्थेचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी सल्लागार मंडळाचे मार्गदर्शन घेतले जाते. सल्लागार मंडळामध्ये विद्यापीठाच्या सर्व संस्थांचे प्रमुख हे सदस्य असतात. सल्लागार मंडळातून अध्यक्ष, सचिव, खजिनदार यांची निवड केली जाते. डॉ. डी. वाय. पाटील अध्यक्ष असताना विद्यापीठाचा नावलौकिक राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत जावून पोहोचला. विद्यमान अध्यक्ष मा. सतेच (बंटी) डी. पाटील यांच्या कुशल नेतृत्वाखाली मौनी विद्यापीठांतर्गत सुरू असलेल्या शाळा, महाविद्यालये, वसतीगृहे बांधकाम, नवनवीन अभ्यासक्रमांना तसेच विद्यापीठाच्या शासन मान्यताप्राप्त विनाअनुदानित संस्थांना केंद्रशासन व महाराष्ट्र शासनाचे अनुदान मिळाले आहे. त्याच प्रमाणे विद्यापीठातील ग्रंथालय, प्रयोगशाळा, कर्मचारी निवासस्थाने यांचे नुतनीकरण, रस्ते, पाणीपुरवठा इत्यादी पायाभूत सुधारणा झाल्या व अजूनही होत आहेत.
मुलभूत तत्त्वे :
- मौनी महाराजांच्या मौनवृत्ताची प्रेरणा घेवून ‘सर्वमानव समान आहेत’ या वृत्ताचे पालन करून आत्मशांती प्राप्त करणे.
- ज्ञान, सेवा, त्याग व नांगर हाकणारा शेतकरी हे घोषवाक्य व बोधचिन्ह यांनुसार कार्य करणे.
- ग्रामीण भागाचा शैक्षणिक प्रयोगाद्वारे विकास साधणे व ग्रामिण पुनर्रचनेला प्राधान्य देणे.
- शिक्षण हेच सर्वप्रकारच्या सुधारणांचे मूळ आहे, यावर विश्वास ठेवून कार्य करणे.
- प्राथमिक, माध्यामिक, उच्च माध्यमिक विद्यालये, महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षणातील एकलकोडेंपणाची दरी कमी करणे आणि सर्व प्रकारचे शिक्षण एका छताखाली व एकाच संकुलात सुरू करणे.
- विद्यापीठातील विद्यार्थी, कर्मचारी, शिक्षक, कार्यकर्ते यांच्या दैनंदिन कामांबरोबच, समाजसेवा, कार्यानुभवाद्वारे श्रमप्रतिष्ठा जोपासणे.
- सर्व संस्थामध्ये लोकशाही प्रणाली व लोकशाही प्रणित जीवनपद्धती अवलंबविणे.
- पुस्तकीज्ञानापेक्षा प्रात्यक्षिक ज्ञानावर भर देणे.
- गरजेनुसार नवीन शैक्षणिक प्रयोग, अध्यापन पद्धती, शेती, तंत्रज्ञान विकसित करण्यास स्वातंत्र्य देणे.
- मौनी विद्यापीठ हे कोणत्याही एका विशिष्ट पोथीबद्ध विचारांशी बांधील नसून नवनवीन मार्ग चोखाळून सृजनशिलतेस चालना देण्याचे कार्य जोपासते.
मौनी विद्यापीठाद्वारे बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, व्यावसायिक अभ्यासक्रम, अभियांत्रिकी, कृषिशिक्षण, बहुद्देशीय शिक्षण, शिक्षक प्रशिक्षण, कला, वाणिज्य, विज्ञान, एकात्मिक शिक्षक-प्रशिक्षण, संगणक शिक्षण इत्यादी अभ्यासक्रमांचे शिक्षण दिले जाते. त्याच बरोबर पंचायतराज प्रशिक्षण केंद्राद्वारे लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी व ग्रामसेवक यांना प्रशिक्षणही दिले जाते. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे बी. एड. अभ्यासकेंद्रसुद्धा मौनी विद्यापीठात आहे. विद्यापीठ परिसरामध्ये आस्थापना विभाग, मौनी सहकारी भांडार, पगारदार लोकांची सहकारी पतसंस्था, क्रिडा विभाग, जुडो कराटे प्रशिक्षण केंद्र, विद्यार्थी व विद्यार्थींनीच्या निवासासाठी सर्व सुविधा असलेले १३ वसतीगृहे, कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र क्वॉर्टर्स आहेत.
विद्यापीठाशी संलग्नित सस्थांमधून दरवर्षी हजारो विद्यार्थी भारतात व परदेशांत सेवेसाठी जातात. विद्यापीठाच्या पंचायतराज प्रशिक्षण केंद्र, ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र आणि संयुक्त प्रशिक्षण केंद्र या केंद्रांद्वारे दरवर्षी हजारो शासकीय व निमशासकीय कर्मचारी, शिक्षक, बालवाडी व अंगणवाडी सेविका यांना प्रशिक्षण दिले जाते. मौनी विद्यापीठात शिक्षण घेवून बाहेर पडलेले वैद्यक, अभियंते, शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य, शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक, शिक्षण संचालक, पोलिस खात्यातील अधिकारी, सैन्यदलातील अधिकारी इत्यादींद्वारा देशाच्या विकासाच्या सर्व टप्प्यांवर कुशल मनुष्यबळ पुरविण्याचे कार्य मौनी विद्यापीठ करते. भुदरगड तालुक्यातील १०० पेक्षा अधिक खेड्यांतील लोकांचे जीवनमान उंचविण्यात मौनी विद्यापीठाचे मोलाचे योगदान आहे.
समीक्षक ꞉ कविता साळुंके
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.