द नॅशनल इंटरेस्ट या परराष्ट्र धोरणासंबंधित नियतकालिकाच्या १९८९च्या उन्हाळी आवृत्तीत अमेरिकन नवरूढिवादी राज्यशास्त्रज्ञ फ्रान्सिस फुकुयामा यांनी लिहिलेला ‘इतिहासाचा अंत’ (एंड ऑफ हिस्टरी) हा जगभरातील सर्वांत बहुचर्चित लेखांपैकी एक आहे. फुकुयामा अमेरिकन प्रशासकीय विभागाच्या धोरण नियोजन समितीचे उपसंचालक होते. लेखानंतरच्या काही आठवड्यांतच ते एक सुप्रसिद्ध लेखक म्हणून नावाजले गेले. त्या लेखाला भरपूर ‘प्रतिक्रिया’ मिळाल्या. प्रख्यात नवरूढिवादी अमेरिकन पत्रकार आयर्व्हिंग क्रिस्टॉल, तत्त्वज्ञानाचे अभ्यासक ॲलन ब्लूम, अमेरिकन सिनेटचे सदस्य डॅनियल पॅट्रिक मोयनिहान आणि इतर विचारवंतांचा त्यात समावेश होता. बहुतांश लोकांच्या मते तो लेख योग्य वेळी प्रकाशित झाला होता. फुकुयामाचा सिद्धांत अमान्य करणे अवघड होते. जागतिक घडामोडी हेच दर्शवत होत्या की, वृद्धिंगत होत चाललेल्या जागतिकीकरणाच्या युगात केवळ उदारमतवादी लोकशाहीमध्येच लोकांचा उत्कर्ष होण्यासाठी पोषक वातावरण होते, जिथले लोक दडपशाही आणि दुर्भिक्षता यांपासून मुक्त असे शांततामय जीवन जगत होते.

 

बर्लिनची भिंत नेस्तनाबूद होणे, साम्यवादविरोधातील चळवळी आणि सोव्हिएट युनियनचे विभाजन या एकामागून एक घडणाऱ्या घटनांमुळे शीतयुद्धाच्या समाप्तीची भलामण करणाऱ्या विचारवंतांच्या लेखांचा पाऊस पडला. जागतिक इतिहासाला मिळालेली ही मूलभूत कलाटणी आणि त्यानंतर लिहिले गेलेले साहित्य यांचे फ्रान्सिस फुकुयामा यांनी सूक्ष्म निरीक्षण केले. त्याची प्रतिक्रिया किंवा उत्तर म्हणजेच ‘इतिहासाचा अंत’ हा दीर्घ निबंध होय. नंतर १९९२ मध्ये त्यांनी त्यांच्या लेखाच्या टीकाकारांना प्रत्युत्तर देण्यासाठी एंड ऑफ हिस्टरी अँड दि लास्ट मॅन हे पुस्तक लिहिले, जे आज अभिजात साहित्य म्हणून ओळखले जाते.

फुकुयामांनी त्यांच्या निबंधात असा मुद्दा मांडला की, पूर्व आणि पश्चिमेमधील महत्त्वाचे वैचारिक मतभेद संपुष्टात आले होते आणि पाश्चिमात्य उदारमतवादी भांडवलदार लोकशाहीचा विजय झाला होता. पाश्चिमात्य उदारमतवादाचा विजय हा सर्वप्रथम सोव्हिएट युनियन कोसळण्यात दिसून येतो आणि नंतर जगातील आणखीन एक सर्वांत मोठा साम्यवादी देश, चीनमध्ये होत असलेल्या वैचारिक वातावरणातील महत्त्वाच्या बदलांमधून आणि सुधारणा-चळवळीतून दिसतो; त्याशिवाय जगभरात पसरत चाललेल्या ग्राहकवादी पाश्चिमात्य संस्कृतीतूनही दिसून येतो. यातूनच त्यांनी असे विधान केले की, “आज जग जे अनुभवत आहे, ते केवळ शीतयुद्धाची समाप्ती किंवा युद्धानंतरच्या विशिष्ट कालखंडातील संक्रमण नसून तो आहे इतिहासाचा अंत; म्हणजेच मानवजातीच्या वैचारिक उत्क्रांतीचा शेवट आणि पाश्चिमात्य उदारमतवादी लोकशाहीचे जागतिकीकरण जे लोकशाहीचे अंतिम स्वरूप असेल.” फुकुयामा हे घटनांपेक्षा जास्त भर कल्पनांवर देत होते. त्यांनी इतर वैचारिक सिद्धांतांवर उदारमतवादाने मिळविलेल्या विजयाचे कौतुक केले. त्यांच्या म्हणण्यानुसार इतर सर्व प्रकारच्या राज्यपद्धतींवर लोकशाही विजय मिळवेल; कारण शांती आणि समृद्धी मिळविण्याच्या नैसर्गिक इच्छाशक्तीमुळे सर्व राष्ट्रे प्रगतिपथाच्या दिशेने वाटचाल करू लागतील आणि त्यापासून त्यांना परावृत्त करणे अशक्य असेल.

फुकुयामा यांचा हा सिद्धांत पूर्णतः नवीन होता का? नाही; कारण त्यापूर्वीच्या पाश्चिमात्य राजकीय विचारवंतांनी, अगदी प्लेटोनेसुद्धा शासन चालविण्याचा सर्वांत उत्कृष्ट प्रकार कोणता? या प्रश्नाचे उत्तर दिले होते आणि फुकुयामा यांनीसुद्धा त्यांच्या निबंधात मान्य केले होते की, ‘इतिहासाचा अंत’ ही त्यांची संकल्पना सर्वस्वी अभिनव नव्हती. ही संकल्पना सर्वप्रथम जी.डब्ल्यू.एफ. हेगेल यांनी वापरली होती. त्यांच्या कल्पनांपासून फुकुयामा यांना प्रेरणा मिळाली. हेगेल यांच्यानुसार इतिहास ही एक द्वंद्वात्मक प्रक्रिया आहे; जिला सुरुवात, मध्य आणि शेवट आहे. मानवजात जेव्हा सगळ्या टप्प्यांतून जाऊन शेवटापर्यंत येते, तेव्हा समाजाचे आणि प्रशासनाचे तार्किक रूप विजयी होते. हेगेलपासून प्रेरणा घेऊन फुकुयामा यांनी असे मत प्रकट केले की, इतिहासाच्या अंताच्या वेळी जे समोर येईल, ते एक असे उदारमतवादी, लोकसत्ताक प्रशासन असेल, जे मानवाच्या मूलभूत स्वातंत्र्याच्या अधिकाराला कायदेशीर मार्गाने मान्यता आणि संरक्षण देईल.

फुकुयामा यांनी प्रश्न उपस्थित केला, आपण इतिहासाच्या अंताच्या जवळ पोहोचलो आहोत का? आधुनिक उदारमतवादाच्या चौकटीत राहून सोडवता येणार नाहीत, अशा काही मूलभूत विसंगती मानवी जीवनात आहेत का? त्यांच्या म्हणण्यानुसार उदारमतवादासमोर येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला उत्तर देणे हे त्यांचे मिशन नाही; पण ते जागतिक इतिहासामधील महत्त्वाच्या सामाजिक आणि राजकीय शक्तींचा परामर्श निश्चित घेतील. मागील शतकात उदारमतवादासमोर दोन महत्त्वाची आव्हाने होती ‒ कडवा राष्ट्रवादी पंथ आणि साम्यवाद. दुसऱ्या महायुद्धात कडव्या राष्ट्रवादी पंथाचा विनाश झाला; पण साम्यवादामुळे निर्माण झालेले वैचारिक आव्हान खूप गंभीर होते. हेगेलप्रमाणेच कार्ल मार्क्सनेही याच गोष्टीवर भर दिला की, उदारमतवादी समाजाची मूलभूत विसंगती ही भांडवलदार आणि कामगार वर्गांमध्ये आहे, जी कधीही दूर होऊ शकणार नाही. पण फुकुयामा यांच्या मते, वर्गभेदाचा प्रश्न पश्चिमेतून नाहीसा झाला आहे आणि आधुनिक अमेरिकेचा समतावाद एका वर्गरहित समाजाचे प्रतिनिधित्व करतो, जो मार्क्सला अभिप्रेत होता. ह्याचे स्पष्टीकरण देताना ते म्हणतात की, अमेरिकेतील कृष्णवर्णीयांची गरिबी ही मूलतः उदारमतवादामधून आलेली नसून ती गुलामी आणि वर्णभेदाच्या परंपरेतून आलेली आहे.

उदारमतवादाच्या वर्चस्वाबद्दल लिहिताना फुकुयामा म्हणतात की, दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकन लोकांनी जपानवर उदारमतवादी लोकशाही लादली. पाश्चिमात्य भांडवलशाही आणि उदारमतवाद जपानने स्वीकारला; पण ओळखू येण्यापलीकडे त्याच्यात बदल केले. वास्तविक जपानी परंपरांमध्ये आणि संस्थांमध्ये आर्थिक आणि राजकीय उदारमतवादाचे महत्त्वाचे घटक इतक्या खुबीने मिसळले आहेत की, फुकुयामा यांच्या मते पुढची अनेक वर्षे ते टिकून राहतील हे निश्चित आहे. त्याशिवाय संपूर्ण आशिया खंडात आर्थिक उदारमतवादाचा प्रसार करण्यात आणि त्या अनुषंगाने राजकीय उदारमतवादाचा पाया बळकट करण्यात जपानने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दुसऱ्या बाजूला चीनमध्ये मात्र उदारमतवाद काही अंशीच प्रभावी ठरला आहे. त्यामुळे तिथली लोकशाही ही उदारमतवादी लोकशाही म्हणून ओळखली जाऊ शकत नाही. सोव्हिएट युनियनच्या गार्बोचेव्ह कालखंडामधील बदलाचे विश्लेषणही त्यांनी केले आहे आणि ते करताना ते म्हणतात की, हे सर्व देश पूर्णतः उदारमतवादी म्हणून ओळखले जाऊ शकणार नाहीत. पण त्याचबरोबर फुकुयामा हेसुद्धा म्हणतात की, यापुढे नवे जागतिक बदल घडणारच नाहीत असे म्हणता येणार नाही किंवा जगात काही राष्ट्रे उदारमतवादी लोकशाहीप्रणालीचे समर्थक असतीलच असे नाही. ‘इतिहासाच्या अंता’च्या वेळी ते लिहितात, “सर्व संस्था यशस्वी उदारमतवादावर आधारित व्यवस्था होतीलच असे नाही; पण त्यांचे उच्च प्रकारचे वैचारिक मुखवटे संपुष्टात येतील.”

भविष्यकाळात धार्मिक कट्टरता आणि राष्ट्रवाद ही उदारमतवादासमोरची दोन वैचारिक आव्हाने असण्याची शक्यता ते नमूद करतात. समकालीन जगात उदारमतवादाला पर्याय म्हणून फक्त इस्लाम धर्माने धर्मसत्तेचा पुरस्कार केला आहे. पण इतर धर्मीयांना ही विचारप्रणाली फारशी रुचली नाही आणि त्यामुळे ह्या चळवळीला वैश्विक पातळीवर मान्यता मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. दुसरीकडे, यूरोपच्या जर्मनीसारख्या काही भागात राष्ट्रवाद हा उदारमतवादाला धोका निर्माण करत असल्याचा इतिहासातील दाखला असला, तरी आज असे पाहण्यात आले आहे की, जगातील बऱ्याचशा राष्ट्रवादी चळवळी प्रदीर्घ काळ टिकणार नाहीत; कारण त्यांचाकडे कोणतेही ठोस राजकीय, सामाजिक वा आर्थिक उद्दिष्ट नाही; आहे ती फक्त स्वातंत्र्याची नकारात्मक इच्छा. वांशिक विषय आणि कट्टर राष्ट्रवाद हे उदारमतवादी राज्यांमध्ये वादाचे कारण होत असले, तरीही ह्या वादाचा मूळ मुद्दा उदारमतवाद नाही, तर लोकांवर अनिच्छेने लादण्यात आलेल्या राजकीय सत्ता असतात; ज्यांना लोकांनी निवडलेले नसते, असेही ते स्पष्ट करतात.

हा लेख इतिहासाच्या अंताचा आंतरराष्ट्रीय संबंधांवर होणाऱ्या परिणामाचेदेखील विवेचन करतो. फुकुयामा यांच्या मतानुसार जगाच्या ज्या भागात इतिहासाच्या अंताची वेळ आली आहे, तिथले आंतरराष्ट्रीय जीवन हे राजकीय किंवा धोरणात्मक बाबींपेक्षा आर्थिक बाबींनी जास्त व्यापलेले आहे. मार्क्सवाद आणि लेनिनवादाचा अंत म्हणजेच आंतरराष्ट्रीय संबंधांमधील वाढते ‘सर्वसाधारण बाजारीकरण’. त्या वेळी जग हे इतिहासपूर्व आणि इतिहासोत्तर भागांत विभागले गेले असेल. या दोन्हींमधील द्वंद्व तेव्हाही शक्य असेल. वांशिक, कडवा राष्ट्रवादी हिंसाचार आणि दहशतवाद सुरूच राहील. म्हणून ते पुन्हा ग्वाही देतात की, इतिहासाचा अंत एकाच वेळी संपूर्ण जगात अशक्य आहे. निरनिराळ्या देशांमध्ये विसंवाद चालूच राहतील आणि त्याचबरोबर नवनवीन आव्हानेसुद्धा उभी ठाकतील. ते यापुढे जाऊन म्हणतात की, इतिहासाचा असा अंत खूप दुःखदायी असेल; कारण अस्तित्वाच्या लढाईची जागा आर्थिक समीकरणे घेतील, आणि त्यातून अमर्याद तांत्रिक अडचणी आणि पर्यावरणासंबंधातली आव्हाने पुढे येतील. इतिहासाच्या अंतानंतरच्या कालखंडात कला, तत्त्वज्ञान काहीही नसेल. त्यामुळे लोकांच्या मनात इतिहासपूर्व काळासंबंधात प्रबळ आंतरिक ओढ निर्माण होईल आणि इतिहासोत्तर काळातील जगात काही काळाकरिता स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती होईल.

मूल्यमापन : फुकुयामा यांचा हा युक्तिवाद आज स्वीकारार्ह आहे का? इतिहास अजूनही जीवित आहे आणि उदारमतवाद आणि लोकशाही या दोन्हींचा तितकासा प्रभाव दिसत नाही. उलट, यूरोपमध्ये तर पेचप्रसंगच जास्त दिसत आहेत. उजव्या विचारसरणीच्या राष्ट्रवादाचा वाढता प्रभाव, बहुसंस्कृतिवादासंबंधातील पुनर्विचार, वर्णभेद, स्थलांतरितांच्या समस्या, आयसीसचा वाढता धोका हे सर्व हेच दर्शवतात की, यूरोप फुकुयामा यांच्या उदारमतवादाच्या सिद्धान्तापासून खूप दूर चालला आहे. शिवाय, जगाच्या कित्येक भागांमध्ये एकाधिकारशाहीने पुन्हा डोके काढले आहे. चीन आणि रशिया यांसारख्या एकाधिकारशाही राजवटींचा वाढता प्रभाव फुकुयामा यांनी विचारातच घेतला नव्हता. भांडवलशाही, लोकशाही आणि उदारमतवाद यांच्यातील दुवा, ज्याच्यावर फुकुयामा यांनी हा युक्तिवाद मांडला होता, तोच कुठेतरी सध्या विस्कळीत होताना दिसत आहे.

संदर्भ :

  • Fukuyama, Francis, ‘The End of History?’, The National Interest, Summer, 1989.
  • Fukuyama, Francis, The End of History and the Last Man, New York, 1992.

                                                                                                                                                                       समीक्षक : समीर पाटील