नेपोलियन, तिसरा : (२० एप्रिल १८०८ – ९ जानेवारी १८७३). फ्रान्सचा १८५२–७० च्या दरम्यानचा बादशाह व पहिल्या नेपोलियनचा पुतण्या. त्याचे पूर्ण नाव शार्ल ल्वी नपॉलेआँ बॉनपार्त; पण तो लुई नेपोलियन या नावाने प्रसिद्ध होता. त्याचा जन्म पॅरिस येथे झाला. त्याचा पिता ल्वी बोनापार्ट हा पहिल्या नेपोलियनचा धाकटा भाऊ व हॉलंडचा राजा (१८०६–१०) आणि आई ऑरतान्स द बोआर्ने ही पहिल्या नेपोलियनच्या जोझेफीन पत्नीची पहिल्या लग्नापासून झालेली मुलगी. नेपोलियनच्या पराभवानंतर (१८१५) हद्दपारीत तो आपल्या आईबरोबर जर्मनी, स्वित्झर्लंड व इटली या देशांत वाढला. ऑक्सबुर्ख येथील व्यायाम शाळेतील शिक्षण सोडता त्यास पारंपरिक किंवा औपचारिक असे फारसे शिक्षण मिळाले नाही. म्हणून पुढे त्याने लष्करी शिक्षण घेतले आणि स्विस सैन्यात त्याने कॅप्टनचा हुद्दा मिळविला (१८३४). तत्पूर्वी १८३१ मध्ये त्याने आपल्या भावासह पोपसत्तेविरुद्ध अवचित सत्तांतराचा अयशस्वी प्रयत्‍न केला. यात त्याचा भाऊ मरण पावला व नंतर काही दिवसांनी चुलतभाऊ (पहिल्या नेपोलियनचा मुलगा) मरण पावला. तेव्हा आपणच फ्रान्सच्या सम्राटपदाचे एकमेव वारस आहोत, असे त्याने गृहीत धरून नेपोलियन या नावाचा भावी आयुष्यात उपयोग करून घेतला. त्याने पुन्हा ३० ऑक्टोबर १८३६ रोजी स्ट्रॅसबर्ग येथे क्रांती केली. या वेळी त्यास अमेरिकेत हद्दपार केले. यापूर्वी त्याने अनेक पुस्तिका प्रसिद्ध करून आपली भूमिका व फ्रान्सची गरज लोकांसमोर मांडली.

अमेरिकेतून तो इंग्‍लंडमध्ये येऊन स्थायिक झाला. त्याने नेपोलिनिक आयडिया या नावाचे पुस्तक इंग्रजी आणि फ्रेंच भाषांत लिहिले (१८३८). यात त्याने आपली ध्येयधोरणे अधिक तपशीलवार मांडली. पुन्हा त्याने १८४० मध्ये क्रांती करण्याचा अयशस्वी प्रयत्‍न केला. त्यास जन्मठेपेची शिक्षा झाली. तुरुंगात त्याने राजकारणाचा अभ्यास केला आणि पुढे ‘इक्स्टिंक्शन ऑफ पॉव्हर्टी’ (इं. शी.) हा निबंध १८४४ मध्ये लिहिला. यामुळे कामगार वर्गात तो लोकप्रिय झाला. २६ मे १८४६ रोजी तो तुरुंगातून निसटला आणि इंग्‍लंडमध्ये आला. यानंतर फ्रान्समधील क्रांतीनंतर (१८४८) निर्माण झालेल्या दुसऱ्या प्रजासत्ताकाचा अध्यक्ष म्हणून त्याची बहुमताने निवड झाली. त्याने १८५१ मध्ये संसद विसर्जित करून विरोधकांना पकडले आणि नवीन संविधान सार्वमताद्वारे संमत करून अध्यक्षाची सत्ता व मुदत दहा वर्षांसाठी वाढविली. यानंतर २ डिसेंबर १८५२ रोजी त्याने सम्राटपद  धारण केले आणि तिसरा नेपोलियन हे नाव धारण करून सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याचे मुख्य उद्दिष्ट फ्रान्सचे वैभव व प्रतिष्ठा वाढविणे हे होते. त्यासाठी त्याने विरोध करणाऱ्या व्हिक्टर ह्यूगो प्रभृती तसेच वृत्तपत्र संपादकांस कैदेत टाकले. फ्रान्सची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अनेकविध योजना आखल्या आणि प्रतिष्ठेसाठी आक्रमक परराष्ट्रीय धोरण अवलंबिले.

प्रथम त्याने फ्रान्सच्या आर्थिक प्रगतीसाठी काही योजना आखल्या. हा काळ औद्योगिक क्रांतीचा होता. त्याचा फायदा त्याने घेतला व यांत्रिकी सुधारणांद्वारे उत्पादनात वाढ केली. पॅरिस शहरात अनेक सुंदर वास्तू बांधल्या आणि ते सुंदर केले. रेल्वे व इतर मार्गांची आखणी करून दळणवळण वाढविले. खराब जमिनी लागवडीखाली आणल्या आणि बंदरांचे महत्त्व वाढविले. तसेच नाविक दलात सुधारणा केल्या. खुल्या व्यापाराद्वारे आर्थिक परिस्थिती सुधारली. बँका व इतर पतपेढ्या यांच्या व्यवहारांत सुधारणा केल्या. या सर्वांमुळे फ्रान्सला काही काळ अंतर्गत सुस्थिरता लाभली; पण त्याचे परराष्ट्रीय धोरण धरसोडीचे, विसंगत व वैयक्तिक स्वार्थावर आधारित होते. फ्रान्सच्या प्रतिष्ठेसाठी त्याने तुर्कस्तान–इंग्‍लंडच्या बाजूने रशियाविरुद्ध क्रिमियन युद्धात भाग घेतला आणि यश मिळविले. इटलीच्या एकीकरणात व राष्ट्रवादी चळवळीत त्यास आस्था होती. त्याने १८५८ मध्ये काव्हूरला मदत करून सव्हॉय व नीस मिळविले; पण पुढे हेच धोरण बदलून काव्हूरचा विश्वासघात केला. सॉलफेरीनो येथील पराभवाने तो गांगरला व काव्हूरच्या संमतीशिवाय त्याने ऑस्ट्रियाशी व्हीलाफ्रांका येथे तह केला. या तहामुळे इटली व तेथील जनता यांचा नेपोलियनवरील विश्वास उडाला. यानंतरच्या मेक्सिको प्रकरणामध्येही त्याचे धोरण पूर्णतया अयशस्वी झाले. त्याने मेक्सिकोवर इंग्‍लंड व स्पेन यांसह संयुक्त मोहीम उघडली; पण इंग्‍लंड व स्पेन यांनी तीतून अंग काढून घेतले, तरी त्याने मेक्सिको काबीज केले आणि ऑस्ट्रियाच्या मॅक्सिमिलिअन यास मेक्सिकोचे सम्राटपद दिले. पुढे आपली फौज तेथून काढून घेतल्यामुळे मॅक्सिमिलिअनचा आधार संपला व त्याचा खून झाला आणि फ्रेंचांचे वर्चस्व संपुष्टात आले (१८६७). यानंतर बिस्मार्कने त्यास फ्रँको-जर्मन युद्धास प्रवृत्त केले. त्यात त्याचा पूर्ण पराभव झाला (१८७०). २ सप्टेंबर १८७० रोजी सडॅनच्या लढाईत तो जर्मनांच्या हाती सापडला. त्यास पदच्युत करण्यात आले. शस्त्रसंधीनंतर त्याची मुक्तता झाली (१८७१). उर्वरित आयुष्य त्याने इंग्‍लंडमध्ये चिझलहर्स्ट येथे व्यतीत केले. अखेरच्या दिवसांतही त्याने फ्रान्सचे सम्राटपद पुन्हा मिळविण्याची आशा सोडली नव्हती.

मूत्रपिंडाच्या विकाराने चिझलहर्स्ट येथे तो मृत्यू पावला.

तिसऱ्या नेपोलियनमध्ये पहिल्या नेपोलियनसारखे धाडस, कुशाग्र बुद्धिमत्ता आणि सैनिकी पराक्रम नव्हता; शिवाय राज्यकर्त्या पुरुषास आवश्यक असे मुत्सद्देगिरी, डावपेच व राजकारणपटुत्व नव्हते; यांमुळे बिस्मार्कने त्याचा पराभव केला. विसंगत, धरसोडीचे परराष्ट्रीय धोरण, लहान पराभवानंतर मनोधैर्य खचणे या दोषांमुळे संघटनाचातुर्य आणि प्रचारतंत्र हे गुण असूनही अखेर त्याचा पराभव झाला.

संदर्भ :

  • Corley, T. A. B. Democratic Despot: A Life of Napoleon III, New York, 1961.
  • Payne, H. C. The Police State of Louis Napoleon Bonaparte, 1851–1860, London, 1966.