पर्स, चार्ल्स सँडर्स : (१० सप्टेंबर १८३९—१९ एप्रिल १९१४). प्रसिद्ध अमेरिकन तत्त्वज्ञ आणि फलप्रामाण्यवाद ह्या तत्त्वज्ञानातील विचारपंथाचा एक संस्थापक. जन्म केंब्रिज (मॅसॅचूसेट्स) येथे. वडील बेंजामिन पर्स हे हार्व्हर्ड विद्यापीठात गणित व ज्योतिषशास्त्र ह्या विषयांचे प्राध्यापक होते. त्यांच्या हाताखाली चार्ल्स पर्सला विज्ञानाचे, विशेषत: गणित आणि भौतिकीचे, उत्कृष्ट शिक्षण लाभले होते. हार्व्हर्ड विद्यापीठात प्रारंभीचे उच्च शिक्षण घेऊन नंतर लॉरेन्स सायंटिफिक स्कूल ह्या संस्थेतून रसायनशास्त्र ह्या विषयात त्याने १८६३ मध्ये पदवी संपादन केली. पुढील पंधरा वर्षे हार्व्हर्डच्या वेधशाळेत ज्योतिषशास्त्रज्ञ म्हणून त्याने काम केले. याच वेळी अमेरिकेच्या किनारा आणि भूपृष्ठीय सर्वेक्षण ह्या खात्यात भौतिक शास्त्रज्ञ म्हणूनही त्याने काम केले. ह्या दोन्ही पदांवरून त्याने मोलाची कामगिरी बजावली. शिवाय ह्याच काळात तत्त्वज्ञान आणि विशेषतः तर्कशास्त्र ह्या विषयांतील आपले मूलगामी संशोधन मांडणारे लिखाण त्याने प्रसिद्ध केले. १८७९ मध्ये बाल्टिमोर येथे नव्याने सुरू झालेल्या जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठात तर्कशास्त्राचा अधिव्याख्याता म्हणून त्याची नेमणूक झाली. तेथे तो १८८४ पर्यंत होता; पण किनारा आणि भूपृष्ठीय सर्वेक्षण ह्या खात्याशी असलेला आपला संबंध त्याने १८९१ पर्यंत चालूच ठेवला. १८८७ मध्ये तो सार्वजनिक जीवनातून निवृत्त होऊन पेनसिल्व्हेनियातील मिलफर्ड येथे राहू लागला. उर्वरित काळ त्याने मिलफर्ड येथेच एकांतवासात घालविला. त्याने दोनदा विवाह केला होता. त्याला अपत्य नव्हते.

पर्सची सर्वांत महत्त्वाची कामगिरी तर्कशास्त्राच्या प्रांतात आहे. संबधांचे (Relations) तर्कशास्त्र आणि संबंधांचे कलन (Calculus) ही त्याने नव्याने निर्माण केली असे म्हणता येईल. संबंधांच्या कलनाचा गणितात कसा उपयोग करता येतो, हेही त्याने दाखवून दिले. तसेच संख्यापनाचाही (Quantification) शोध त्याने लावला. आधुनिक तर्कशास्त्राच्या प्रवर्तकांमध्ये पर्सला महत्त्वाचे स्थान आहे.

पर्सच्या विचारांची झेप विलक्षण होती. ज्ञानमीमांसा, वैज्ञानिक पद्धती, तत्त्वमीमांसा, वस्तुमीमांसा, विश्वरचनाशास्त्र, चिन्हशात्र (Semiotics) ह्या तत्त्वज्ञानाच्या शाखांवर त्याने विपुल व मौलिक लिखाण केले आहे. तसेच नीतिशास्त्र, सौंदर्यशास्त्र, धर्म इ. विषयांवरही त्याने आपले म्हत्त्वाचे विचार मांडले आहेत. इमॅन्युएल कांट (१७२४‒१८०४) याच्या तत्त्वज्ञानाचा त्याच्यावर खोल प्रभाव होता. कांटपासून त्याने दोन महत्त्वाचे विचार स्वीकारले होते. एक, कोणतेही ज्ञान घेतले, तर ते ज्ञान असल्यामुळेच त्याची एक विशिष्ट घडण असते व ह्या घडणीमुळे कोणत्याही ज्ञानाच्या ठिकाणी काही अंगभूत वैशिष्ट्ये असतात. दोन, ही घडण तार्किक असते. तर्कशास्त्रात विधानांचे जे आकार स्पष्ट करण्यात येतात, त्यांच्यापासून कोणत्याही ज्ञानाची जी अनिवार्य घडण असते ती निष्पन्न होते. पर्सने हा सिद्धांत ठामपणे स्वीकारला असल्यामुळे तर्कशास्त्राविषयीचे त्याचे सिद्धांत जसजसे बदलत गेले, तसतसे त्याचे तत्त्वज्ञानही बदलत आणि विकसित होत गेले.

फलप्रामाण्यवाद : संबधांच्या तर्कशास्त्रावर आधारलेली पदार्थप्रकारांविषयीची एक नवीन उपपत्ती पर्सने मांडली; पण त्याचे नाव विशेष प्रसिद्ध आहे, ते फलप्रामाण्यवादाचे एक जनक म्हणून. पर्सचा फलप्रामाण्यवाद थोडक्यात असा मांडता येईल : कोणताही जीव जर आपल्या परिसरात तगून राहायचा असेल, तर त्याच्या गरजांचे समाधान ज्यांच्यामुळे होईल, अशा सवयी त्याच्या अंगी बाणलेल्या असल्या पाहिजेत. अशा प्राण्याने दृढपणे स्वीकारलेल्या सवयींना पर्स त्याचे विश्वास (समजुती) म्हणतो. आता विश्वास धारण केलेला असणे ही सुखद अवस्था असते; कारण त्यामुळे आपल्या गरजांचे समाधान कसे करावे, हे त्या प्राण्याला माहीत असते; उलट, संशयाची किंवा अविश्वासाची अवस्था दुःखद असते; कारण ह्या अवस्थेत इष्ट वस्तू साध्य कशी करावी, हे अनिश्चित असते. तेव्हा प्राणी संशयापासून विश्वासाकडे येऊन ठेपण्याचा प्रयत्न करीत असतो. ह्या प्रक्रियेला पर्स ‘चौकशी’ (Enquiry) म्हणतो. विश्वास प्राप्त करून घेण्याचे अनेक मार्ग, म्हण़जे चौकशीचे अनेक प्रकार असतात. ह्यातून ज्या मार्गाने स्थिर असे विश्वास, म्हणजे दूरवरच्या भविष्यापर्यंतही टिकून राहतील असे विश्वास, प्राप्त होतील तो मार्ग सर्वोत्कृष्ट असतो, असे म्हणता येईल. हा मार्ग म्हणजे वैज्ञानिक पद्धती. ह्या दृष्टिकोनातून पर्सने ‘अर्था’ची (Meaning) फलप्रामाण्यवादी उपपत्ती पुढे मांडली. एखाद्या वस्तूविषयीची आपली जी संकल्पना असते, तिचा अर्थ म्हणजे त्या वस्तूविषयीच्या आपल्या सर्व सवयींचा संच. दुसऱ्‍या शब्दांत एखाद्या वस्तूविषयीच्या आपल्या संकल्पनेचा अर्थ म्हणजे, ती वस्तू वेगवेगळ्या परिस्थितींत कसकशी वागेल, ह्याविषयीचे आपण मान्य केलेले नियम. पर्सचा फलप्रामाण्यवाद म्हणजे संकल्पनांच्या अर्थाविषयीची उपपत्ती आहे; विधानांच्या सत्यतेविषयीची उपपत्ती नाही, हे ध्यानात घेतले पाहिजे. चौकशीच्या द्वारा आपण स्थिर मते प्राप्त करून घेऊ शकतो, ह्यावरून विश्व आणि मन ह्यांचा परस्परसंबंध कसा असला पाहिजे, ह्या प्रश्नाच्या पर्सने केलेल्या विवेचनालाही त्याच्या तत्त्वज्ञानात महत्त्वाचे स्थान आहे.

सत्ताशास्त्र : तीन मूलभूत सत्ताशास्त्रीय पदार्थांपैकी पहिला पदार्थ म्हणजे पहिलेपणा (Firstness). ज्याला कशाचीच अपेक्षा नाही त्याच्या कल्पनेला पहिलेपणा म्हणावे. थोडक्यात पहिलेपणा म्हणजे भावनेचा गुण. गुण अस्तित्वात असण्यासाठी इतर कशाची अपेक्षा असण्याचे पर्सच्या वास्तववादाला कारण नाही. दुसरा पदार्थ दुसरेपणा (Secondness). ह्याला घटनेमधील प्रतिक्रिया म्हणता येईल. कशाशी तरी संबंध असण्याची कल्पना ह्यात आहे. तिसरा पदार्थ म्हणजे तिसरेपणा (Thirdness). दुसरेपणा व पहिलेपणा यांतील मध्यस्थ म्हणजे तिसरेपणा. याला घटनेचे प्रतिनिधित्व म्हणता येईल. तिसरेपणात एकत्र आणण्याची कल्पना आहे.

पर्सचे चान्स, लव्ह अँड लॉजिक : फिलॉसॉफिकल एसेज (१९२३), द कलेक्टेड पेपर्स ऑफ सी. एस. पर्स (खंड‒१ ते ८; १९३१‒१९३५) आणि चार्ल्स एस. पर्सेस लेटर्स टु लेडी वेल्बाय (१९५३) हे ग्रंथ प्रकाशित असून त्यांपैकी द कलेक्टेड पेपर्स… हा ग्रंथ विशेष उल्लेखनीय होय.

https://www.youtube.com/watch?v=8PyecngCp1U

संदर्भ :

  • Hartshorne, Charles Weiss, Paul, Ed. The Collected Papers of Charles Sanders Peirce, Vols.I-VI, Cambridge, 1931-35.
  • Murphey, M. G. The Development of Peirce’s Philosophy, Cambridge, 1961.
  • https://plato.stanford.edu/entries/peirce/
  • https://www.iep.utm.edu/peircebi/
  • http://www.peirce.org/
  • https://www.informationphilosopher.com/solutions/philosophers/peirce/
  • https://alchetron.com/Charles-Sanders-Peirce
  • https://www.youtube.com/watch?v=dMFka-MvteU