ब्रायन, मॅगी : (१२ एप्रिल १९३०—२६ जुलै २०१९). ब्रिटिश तत्त्वज्ञ, राजनीतिज्ञ आणि लेखक. त्यांचा जन्म लंडन येथे एडगर फ्रेडरिक व शीला लिंच या दांपत्यापोटी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. वडील फारसे शिकलेले नव्हते; परंतु डावी विचारसरणी मानणारे होते. त्यांना अभिजात संगीताची, नाटकांची व एकूणच कलाप्रकारांची आवड होती आणि आईला नावड. वडिलांच्या प्रोत्साहनामुळे शाळकरी वयात मॅगींना हाइड पार्कवरील ‘स्पीकर्स कॉर्नर’ला जाऊन राजकीय नेत्यांची भाषणे ऐकावयाचा छंद जडला. मोठेपणी निवडणूका जिंकून १९७४−८३ दरम्यान त्यांनी राजकारणात सक्रिय सहभाग घेतला. १९८३ मध्ये पराभूत झाल्यावर पुन्हा केवळ लेखनकार्यास व तत्त्वप्रसारास वाहून घेतले. ”आय राइट, देअरफोर आय एम” हे त्यांचे म्हणणे त्यांचे जीवनसूत्र मानता येईल.

ऑक्सफर्ड येथील केबल महाविद्यालयात त्यांनी इतिहास, तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र व अर्थशास्त्र या विषयांचे अध्ययन केले. पुढे अमेरिकेतील येल विद्यापीठात पदव्युत्तर संशोधन केले. तेथे सुसान लँगरमुळे कांट व शोपेनहौअर शिकण्याची त्यांना गोडी लागली. मग हे तत्त्वज्ञ वाचण्यासाठी त्यांनी जर्मन भाषा शिकून घेतली. अमेरिकेतील समान संधी पुरविणाऱ्या वातावरणामुळे त्यांना अमेरिका आवडली. १९५८ मध्ये त्यांनी गो वेस्ट, यंग मेन या ग्रंथातून युवकांना दिलेला संदेश प्रसिद्ध आहे. तत्पूर्वी १९५४ मध्ये स्वीडन येथे इनग्रिड सोदरलंडशी ते विवाहबद्ध झाले. हा विवाह अल्पकाळ टिकला; पण त्यातून झालेल्या गनेला ह्या कन्येला पुढे तीन अपत्ये व चार नातवंडे झालेली त्यांनी पाहिली. दरवर्षीच्या भेटीगाठींचा ठेवा त्यांच्यासाठी अनमोल असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. मुख्य म्हणजे, नातेवाईक किंवा मित्रमंडळी यांपेक्षा मॅगी तत्त्वज्ञांसोबत व त्यांनी मांडलेल्या तत्त्वांमध्येच अधिक रमले. काव्य, चित्रपट, राजकारण, पत्रकारिता, शिक्षण, संगीत अशा निरनिराळ्या क्षेत्रांत मुशाफिरी केली असली, तरीही मुळात त्यांचा पिंड विचारवंताचा होता. मात्र तत्त्वज्ञान हस्तिदंती मनोऱ्यात बंदिस्त न करता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याची त्यांना तळमळ होती. तत्त्वांचा निव्वळ कीस काढण्यात किंवा काथ्याकूट करण्यात त्यांना रस नव्हता. मानवी जीवन अधिक संपन्न करणे, हे तत्त्वज्ञानाचे कार्य मानून त्यांनी १९७०-७१ दरम्यान ‘कॉन्व्हर्सेशन्स विथ फिलॉसॉफर्स’ व १९७८ मध्ये ‘मेन ऑफ आयडियाज’ या कार्यक्रमात त्यांनी एथर, चॉम्स्की, पॉपर, रसेल अशा मान्यवर तत्त्वज्ञांच्या मुलाखती घेऊन त्यांना आपले तत्त्वज्ञान सर्वसामान्यांसमक्ष मांडावयास प्रवृत्त केले. तसेच प्राचीन तत्त्वज्ञानाचा वेध घेत तत्त्वज्ञानाचे स्वरूप स्पष्ट केले. तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातील त्यांचे योगदान वरवरचे किंवा चटपटीत स्वरूपाचे नाही, हे त्यांच्या पॉपर व विशेषत: शोपेनहौअरवरील ग्रंथांतून दिसून येते. १९८३ मधील प्रथमावृत्तीची सुधारित आवृत्ती १९९७ मध्ये प्रसिद्ध झाली. मात्र आपण पॉपर, रसेल यांच्या तोडीचे कार्य करू शकत नसल्याची सल अखेरपर्यंत त्यांच्या मनात होती. तशी कबुली त्यांनी कन्फेशन्स (१९९७) ह्या आपल्या आत्मचरित्रपर ग्रंथात दिली आहे व तत्त्वज्ञानाच्या प्रांतातील आपली जडणघडण स्पष्ट केली आहे. तत्त्वज्ञानातील मूलभूत समस्यांची हाताळणी मी ज्या प्रकारे केली, त्यापेक्षा उच्च दर्जाची अभिनव रीतीने करून पॉपर-रसेलप्रमाणे ठोस भूमिका मी मांडू शकलो नाही, ही खंत त्यांना कायम होती (‘व्हॉट आय बिलिव्ह’ ह्या लेखात अज्ञेयवादाकडे झुकणाऱ्या भूमिकेचे सूचन आढळते, तो अपवाद). त्याचप्रमाणे ब्रेक्झिटच्या बाजूने दिलेला कौल ही आपली घोडचूक होती, हेही काळाच्या ओघात अधिक विचारांती त्यांच्या लक्षात आले. तो ‘ऐतिहासिक प्रमाद’ (Historical Mistake) असल्याचे त्यांनी ह्या संदर्भात नमूद केले आहे.

‘आत्मचिंतन’ हा मॅगींचा स्थायीभाव होता. त्यातून त्यांना ‘स्व’ जाणवत गेला आणि आत्मभान विकसित होत गेले. जीवनाच्या अर्थाविषयीची त्यांची मते, अल्टिमेट क्वेश्चन (२०१६) या ग्रंथात त्यांनी मांडली आहेत. २०१८ साली लिहिलेल्या मेकिंग द मोस्ट ऑफ इटमध्येही त्यांनी आयुष्याला सकारात्मक रीतीने सामोरे जाणे अधोरेखित केले आहे. शिवाय त्यांचे इतरही ग्रंथलेखन लेखन आहेत, ते असे : क्रूसिफिक्शन अँड अदर पोएम्स (१९५१), टू लिव्ह इन डेंजर (१९६०), द न्यू रॅडिकॅलिझम (१९६२), द डेमोक्रॅटिक रिव्हॅल्यूशन (१९६४), टुवर्ड्स २००० : द वर्ल्ड वुई मेक (१९६५), द टेलिव्हिजन इंटरविव्हर (१९६६), वन इन ट्वेंटी (१९६६), ॲस्पेक्ट्स ऑफ वॅग्नर (१९६८), मॉडर्न ब्रिटिश फिलॉसॉफी (१९७१), कार्ल पॉपर (१९७३), फेसिंग डेथ (१९७७), टॉकिंग फिलॉसॉफी : डायलॉग्ज विथ फिफ्टीन लिडिंग फिलॉसॉफर्स (१९७८), ऑन ब्लाइंडनेस : लेटर्स बिटविन ब्रायन मॅगी अँड मार्टिन मिलिगन (१९९६), द फिलॉसॉफी ऑफ शोपेनहौअर (१९९७), द ग्रेट फिलॉसॉफर्स : ॲन इंट्रोडक्शन टू वेस्टर्न फिलॉसॉफी (२०००), द ट्रिस्टन चॉर्ड : वॅग्नर अँड फिलॉसॉफी (२००१), द स्टोरी ऑफ फिलॉसॉफी (२००१), क्लाउड्स ऑफ ग्लोरी (२००४), ग्रोविंग अप इन अ वॉर (२००७).

निखळ अकादमीय तत्त्वज्ञानात रममाण होणाचा त्यांचा पिंड नसला, तरी अकादमीय आधार त्यांनी कधीही सोडला नाही. समाजाची नाळ तत्त्वज्ञानाशी कशी जुळलेली असते, हे त्यांनी जाणले होते. म्हणून समाजापर्यंत तत्त्वचर्चा पोहोचविण्याचे अजोड कार्य त्यांनी केले. ते करीत असताना तात्त्विक अधिष्ठानाचे भान त्यांनी कायम राखले, हे विशेष होय.

तत्त्वज्ञानाचा उगम विस्मयातून होत असेल, तर हा विस्मय गडद करण्याचे कार्य मॅगींनी केले, असे म्हटले जाते.

ऑक्फर्ड येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • https://www.ft.com/content/db735c68-bf32-11e9-89e2-41e555e96722
  • https://www.nytimes.com/2019/07/28/business/bryan-magee-dead.html
  • https://www.prospectmagazine.co.uk/philosophy/the-last-interview-with-bryan-magee-philosophy-great-philosophers

                                                                                                                                                                 समीक्षक : वृषाली कुलकर्णी