बाजारात एकाच नावाची अनेक उत्पादने असतात, पण ती निरनिराळ्या ठिकाणाहून आलेली असतात. त्यांच्या उगमस्थानाप्रमाणे त्यांचे गुण व दर्जाही निरनिराळे असतात. अशा वेळी ग्राहकांचा गोंधळ होऊ नये, म्हणून ते उत्पादन कोणत्या ठिकाणाहून आलेले आहे याची माहिती असणे गरजेचे ठरते. उदा., बाजारात आसाम, दार्जिलिंग, पश्चिम घाट, पूर्व घाट आदि ठिकाणाहून चहा आलेला असतो; जर गिऱ्हाईकाला त्याच्या पसंतीचा चहा हवा असेल, तर चहाच्या नमुन्याबरोबर त्याच्या उगमस्थानाचे नावही देणे जरुरीचे असते.

उत्कृष्ट दर्जाच्या उत्पादनाऐवजी इतर गुण-दर्जाचे उत्पादन मिळाल्यास गिऱ्हाईकाची फसवणूक तर होतेच; शिवाय उच्च दर्जाच्या उत्पादकाचे नुकसानही होते. असे होऊ नये म्हणून जागतिक व्यापार परिषदेने उत्पादकाला त्याचा कायदेशीर फायदा मिळावा, या उद्देशाने उत्पादनाला भौगोलिक ओळख देणे सुरू केले. अशा ओळखीला व्यापारविषयक बौद्धिक संपत्ती हक्क (Trade Related Intellectual Property rights; TRIPS) प्रदान करून उत्पादकाला त्याच्या उत्पादनाच्या व्यापारात संरक्षण मिळते.

भारतात सर्वप्रथम भौगोलिक ओळख दार्जिलिंग चहाला दिली गेली, तर भौगोलिक ओळखीच्या यादीत ऑक्टोबर २०१८ मध्ये रत्नागिरी हापूसचा समावेश करण्यात आला. राज्यातील व देशातील मान्यताप्राप्त भौगोलिक ओळख असलेल्या कृषी उत्पादनांची नावे खालीलप्रमाणे –

राज्यातील मान्यताप्राप्त कृषी उत्पादनांची भौगोलिक ओळख : १) संत्री : नागपूर, २) स्ट्रोबेरी : महाबळेश्वर (सातारा), ३) द्राक्षे : नाशिक, ४) डाळिंब : सोलापूर, ५) कांदे : लासलगाव (नाशिक), ६) ज्वारी : मंगळवेढा, ७) कोकम तांदूळ : सिंधुदुर्ग-रत्नागिरी, ८) हळद : वायगाव (वर्धा), ९) मिरची : भिवापूर (नागपूर), १०) तुरडाळ : नवापूर (नंदुरबार), ११) वाघ्या घेवडा : कोरेगाव (सातारा), १२) आंबेमोहोर तांदूळ : मावळ (पुणे), १३) काजू : वेंगुर्ला (सिंधुदुर्ग), १४) बेदाणे : सांगली, १५) सीताफळ : बीड, १६) मोसंबी : जालना, १७) केळी : जळगाव, १८) केसर आंबा : मराठवाडा, १९) अंजीर : पुरंदर (पुणे), २०) भरीत वांगे :  जळगाव, २१) चिकू : डहाणू-घोलवड, २२) हापूस आंबा : रत्नागिरी-सिंधुदुर्ग.

भारतातील मान्यताप्राप्त कृषी उत्पादनांची भौगोलिक ओळख : १) दार्जिलिंग चहा : पश्चिम बंगाल, २) कांग्रा  चहा  : हिमाचल प्रदेश,  ३) खासी मंडारीन : मेघालय, ४) कचाई लिंबू : मणिपूर, ५) कूर्ग संत्री : कर्नाटक, ६) मैसूर (विड्याचे) पान : कर्नाटक, ७) मैसूर मोगरा : कर्नाटक, ८) उडुपी मोगरा : कर्नाटक, ९) हादागली मोगरा : कर्नाटक, १०) नावर भात : केरळ, ११) पालाक्कादन भत्ता भात : केरळ, १२) मलबार मिरी : कर्नाटक, १३) मलबार अरेबिक कॉफी : कर्नाटक, १४) हिरवी अलेपी मिरची : केरळ,१५) हिरवी कूर्ग वेलची : कर्नाटक, १६) इथामोझी उंच नारळ : तमिळनाडू, १७) अलाहाबाद सुरखा पेरू : उत्तर प्रदेश, १८) नंजनगुड केळी : कर्नाटक, १९) तेलीचेरी मिरी : केरळ, २०) पोक्काली तांदूळ : केरळ,२१) लक्ष्मण भोग आंबा : पश्चिम बंगाल, २२) हिमसागर आंबा : पश्चिम बंगाल,२३) फाजली आंबा ऑफ माल्डा : पश्चिम बंगाल, २४) नाग मिरची : नागालँड, २५) विरूपाक्षी केळी : तमिळनाडू, २६) सिरुमालाई केळी : तमिळनाडू, २७) मालीहाबादी दशहरी आंबा : उत्तर प्रदेश, २८) अप्पेमिडी आंबा : कर्नाटक, २९) वाझाकुलम अननस : केरळ, ३०) कामाल्पूर लाल केळी : कर्नाटक, ३१) देवनहळ्ळी पोमेलो : कर्नाटक, ३२) गुंटूर संनम मिरची : आंध्र प्रदेश, ३३) वायनाड जीराकसला तांदूळ : केरळ, ३४) वायनाड गंधकसला तांदूळ : केरळ, ३५) ब्याडगी मिरची : कर्नाटक, ३६) गीर केसर आंबा : गुजरात, ३७) भालीया  गहू : गुजरात, ३८) कैपाद तांदूळ : केरळ, ३९) उडुपी मत्तू गुल्ला वांगे : कर्नाटक, ४०) गंजम केवडा फुले : ओडिशा, ४१) बंगलोर निळी द्राक्षे : कर्नाटक, ४१) कालानामक तांदूळ : उत्तर प्रदेश, ४३) विरुपाक्ष हिल केळी : तमिळनाडू, ४४) बंगलोर गुलाबी कांदा : कर्नाटक, ४५) बांगणपल्ली आंबा : आंध्र प्रदेश, ४६) अरुणाचल संत्री : अरुणाचल प्रदेश, ४७) नाग ट्री टोमॅटो : नागालँड, ४८) मिझो मिरची : मिझोराम, ४९) सिक्कीम मोठी वेलची : सिक्कीम, ५०) तेझपूर लिची : आसाम, ५१) त्रिपुरा क्वीन अननस : त्रिपुरा, ५२) जोहा भात ; आसाम.

 समीक्षक : डॉ. बाळ फोंडके.