बक्षी, झोरावर चंद : (२१ ऑक्टोबर १९२१—२४ मे २०१८). भारतीय भूसेनेतील एक धाडसी, शूर सैनिक आणि महावीरचक्र या लष्करी पदकाचे मानकरी. त्यांचा जन्म लष्करी परंपरा असलेल्या कुटुंबात पाकिस्तानच्या रावळपिंडी जिल्ह्यातील गुलयाना या खेड्यात झाला. वडील बहादुर बक्षी लाल लौ हे भारतीय हिंदी सैन्यात होते. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर त्यांचे कुटुंब भारतात स्थायिक झाले. त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण रावळपिंडीतील गॉर्डेन कॉलेज येथे झाले (१९४२). त्यानंतर त्यांनी भारतीय सैनिकी प्रबोधिनीत प्रवेश घेतला.

जून १९४३ साली त्यांनी १६/१० बलूच पलटनमध्ये मध्ये त्यांनी कमिशन घेतले आणि दुसऱ्या महायुद्धात सहभाग घेतला. बर्मामधील आराकान येथील लष्करी कारवायांमधील त्यांच्या उत्तम कामगिरीबद्दल त्यांना ‘मेन्शन इन डिसपॅचेस’ हा गौरव प्रदान करण्यात आला. फाळणीनंतर त्यांची बदली ५ गुरखा रायफल्समध्ये झाली. १६३ इन्फन्ट्री ब्रिगेडमध्ये ब्रिगेड मेजर या प्रतिष्ठित पदावर ते रुजू झाले. या पदासाठी आवश्यक स्टाफ कॉलेज कोर्स न करताही हा पदभार त्यांना देण्यात आला, हे उल्लेखनीय आहे. काश्मीर खोऱ्यातील घुसखोऱ्यांना पळवून लावून तेथील तिथवाल पुन्हा काबीज करण्याची कामगिरी या ब्रिगेडवर सोपविण्यात आली होती. ब्रिगेडियर बक्षींनी आपल्या असामान्य शौर्य आणि नेतृत्वाचे प्रदर्शन दाखवून एक महत्त्वाची भूमिका निभावली. त्यांच्या या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना वीरचक्र हा बहुमूल्य गौरव प्रदान करण्यात आला (१९४८). एका स्टाफ ऑफिसरला हा गौरव प्राप्त होणे हे विशेष होते. त्यानंतर तिबेटमध्ये त्यांनी सामरिक-लष्करी टेहळणीची महत्त्वाची कामगिरी पार पाडली. त्यासाठी त्यांनी बौद्ध भिक्षुकाचे वेषांतर करून ८० दिवसांत ४०० किमी.चा प्रदेश पिंजून काढला. या कामगिरीसाठी त्यांना मॅकग्रेगोर मेमोरियल पदक प्रदान करण्यात आले (१९४९).

लेफ्टनंट जनरल बक्षी यांची २/५ गुरखा रायफलचे कमांडिंग ऑफिसर म्हणून नियुक्ती झाली. या पलटनला संयुक्त राष्ट्र दलाचा एक भाग म्हणून काँगो येथे पाठविण्यात आले. काँगोमधील त्यांच्या विशेष कामगिरीसाठी त्यांना विशिष्ट सेवा पदक देण्यात आले (१९६३). १९६४ ते १९६५ मध्ये त्यांनी मिलिटरी ऑपरेशनच्या कार्यकारी संचालकपदाचा कार्यभार सांभाळला. जुलै १९६५ मध्ये काश्मीर खोऱ्यातील नवीन प्रस्थापित ६८ इन्फ्रंट्री ब्रिगेडची कमांड त्यांना देण्यात आली. ८,६५० फूट इतक्या उंचीवरील हाजीपीर पासवर कब्जा करण्याचे कठीण काम या ब्रिगेडवर सोपविण्यात आले होते. या कारवाईला ‘ऑपरेशन बक्षी’ असेही सांकेतिक नाव दिले गेले होते. अतिशय चातुर्यपूर्ण रणनीतीच्या आधारे त्यांनी हाजीपीर पासवर कब्जा मिळविला. आपल्या वरिष्ठांच्या परवानगीशिवाय ही कारवाई हातात घेण्याचा गंभीर धोका त्यांनी पत्करला. ही लढाई म्हणजे दृढ नेतृत्व, धैर्य आणि पराक्रम दर्शविणारी शौर्यगाथाच आहे. मेजर रणजीतसिंग दयाळ (नंतरचे लेफ्टनंट जनरल दयाळ) यांच्याजवळ त्यांनी काढलेले उद्गार, “यात तुला जर यश मिळाले, तर त्याचे श्रेय तुला; पण जर अपयश आले, तर त्याची पूर्णतः जबाबदारी माझी असेल” हे असामान्य होते. ह्या लढाईतील विजयी सहभागासाठी झोरावर चंद बक्षी आणि रणजित सिंग दयाळ या दोघांना महावीरचक्र प्रदान करण्यात आले (१९६५). त्या पश्चात रॉयल कॉलेज ऑफ डिफेन्स स्टडीज येथील यशस्वी अभ्यासक्रमानंतर त्यांनी ८ माउंटन डिव्हिजनच्या नेतृत्वपदाची धुरा सांभाळली. तेथील बंडखोरीला निपटून काढण्यात त्यांचा मोठा सहभाग होता. त्यानंतर त्यांना २६ इन्फन्ट्री डिव्हिजनची कमांड देण्यात आली. यावेळेस त्यांच्यावर अखनूरच्या दक्षिणेकडील ‘चिकन नेक’ (ज्याला आधी ‘डॅगर’ म्हणून ओळखण्यात येत असे) या प्रदेशावर कब्जा मिळविण्याची कामगिरी सोपविण्यात आली होती. या कारवायांमधील जनरल बक्षींचे अतिशय बुद्धिमान नियोजन, साहस आणि धैर्य यांमुळे शत्रूला पराभवाचा धक्का पत्करावा लागला. या त्यांच्या अतुलनीय कामगिरीसाठी त्यांना परम विशिष्ट सेवा पदक देण्यात आले (१९७१). त्यानंतर मिलिटरी ऑपरेशनच्या संचालकपदी त्यांची नियुक्ती झाली. नंतर १९७४ मध्ये त्यांची लेफ्टनंट जनरल पदावर उन्नती होऊन २ कोअरची सूत्रे त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. १ जानेवारी १९७९ रोजी ते सेवानिवृत्त झाले.

भारतीय सैन्यातील अनेक ख्यातनाम जनरलमध्ये लेफ्टनंट जनरल बक्षी यांचे नाव समाविष्ट आहे. कित्येक गौरवाचे मानकरी असलेले जनरल बक्षी हे अतिशय व्यावसायिक लष्करी अधिकारी होते. युद्धातील कुटिल डावपेच आणि कुशल रणनीती आणि एकदाही अपयश पदरी न पडणे, यातून त्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता जाणवते. जनरल बक्षी हे एक उत्तम लढवय्या आणि उत्तम विचारवंत यांचे दुर्मिळ समीकरण होते. युद्धभूमीवरील त्यांचे साहस आणि धैर्य याबरोबरच त्यांचा प्रामाणिकपणा, तत्त्वनिष्ठता आणि आपल्या कनिष्ठांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे त्यांचे गुण आदरणीय होते. ते भारतीय सैन्यात ‘झोरू’ म्हणून लोकप्रिय होते.

संदर्भ :

  • http://www.bharat-rakshak.com/ARMY/personnel/tributes/442-lt-gen-zorawar-chand-bakshi
  • https://theprint.in/theprint-profile/lt-gen-zorawar-chand-bakshi-the-greatest-wartime-hero-who-just-faded-away/63532/
  • https://www.thebetterindia.com/143243/zorawar-chand-bakshi-army-india-most-decorated-general/

                                                                                                                                                        भाषांतरकार : वसुधा माझगावकर

                                                                                                                                                                    समीक्षक : शशिकांत पित्रे