‘निमिष’ हे प्राचीन काळचे कालमापनाचे एकक आहे. निमिष काल म्हणजे डोळ्याची पापणी मिटून उघडण्यासाठी लागणारा वेळ पूर्वी भारतीयांनी वेळेच्या प्रमाणाची मांडणी नैसर्गिक घटनांवर आधारित अशी घेतली होती. त्या मापनात सेकंदाएवढी निश्चितता आणि अचूकता नाही. निमिष ही कालगणना वेगवेगळ्या संदर्भात वेगेवेगळी आहे.

ऋग्वेदामध्ये प्रकाशाच्या गतीबद्दल एक श्लोक आहे. त्यात निमिष या शब्दाचा (कालमापनाचा) उल्लेख आहे. तो श्लोक पुढीलप्रमाणे :-

तथा च स्मर्यते योजनानां सहस्त्रं द्वे द्वे शते द्वे च योजने एकेन निमिषार्धेन क्रममाण नमोऽस्तुते॥

अर्थ : हे (सूर्या-तेजोनिधी) तुझ्याकडून आमच्याकडे ‘अर्ध्या निमिषात दोन हजार दोनशे दोन योजने’ या वेगाने तेज (उर्जा) विस्थापित केली जाते. त्याबद्दल तुला नमस्कार असो.

या श्लोकातील एक निमिष म्हणजे सुमारे \frac {1}{8.75} सेकंद होय (किंवा 1 निमिष = 0.114286 सेकंद) आणि एक योजन अंतर म्हणजे सुमारे 9.0625 मैल किंवा 14.68125 किलोमीटर होय. यावरून प्रकाशाचा वेग 299725.92 किलोमीटर प्रतिसेकंद असे निश्चित करता येते.

  • भारतीय ज्योतिष शास्त्राचा संदर्भ घेतला तर एक निमिष म्हणजे सुमारे \frac{4}{45} सेकंद (किंवा सुमारे 0.08888 सेकंद)
  • भारतीय संगीत ग्रंथांचा संदर्भ घेतला तर एक निमिष म्हणजे सुमारे \frac{1}{32} सेकंद (किंवा सुमारे 0.031 सेकंद) वेळ होय.
  • नाट्यशास्त्रानुसार एक निमिष म्हणजे अंदाजे \frac{1}{25}  सेकंद (किंवा सुमारे 0.04 सेकंद) वेळ होय.
  • नाडीचे ठोके मोजण्याच्या संदर्भात जेव्हा निमिष हा शब्द उपयोगात आणला जातो. तेव्हा एक निमिष म्हणजे सुमारे \frac{1}{18} सेकंद (किंवा 0.05555 सेकंद)

म्हणजे ‘निमिष’ या कालगणनेच्या एककाची किंमत ऊर्जा, ज्योतिष, संगीत, नाट्य आणि आरोग्यविज्ञान या संदर्भांमध्ये वेगवेगळी आहे.

 

समीक्षक : उल्हास दीक्षित


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.