बेशरा,दमयंती : प्रसिद्ध भारतीय ओडिया आणि संथाळी साहित्यिक, प्राधान्याने संथाळी भाषा आणि साहित्य यातील योगदानासाठी दमयंती बेशरा यांना साहित्यविश्वात ओळख आहे. जन्म ओदिशातील मयूरभंज जिल्ह्यात. सूदूरवर्ती अशा क्षेत्रात जन्म आणि जीवयापन असतानाही त्यांनी उत्कृष्ट अशी शैक्षणिक कामगिरी केली आहे. माध्यमिक शिक्षणासाठी त्या रायरंगपूर बालिकाश्रम येथे निवासी होत्या. येथेच त्यांना काव्यलेखनाची आवड निर्माण झाली.

पुढील शिक्षणासाठी त्यांचे काका फागुराम मांझी यांनी त्यांना रमादेवी महिला महाविद्यालयात पुढील उच्च शिक्षणासाठी दाखल केले. रोजच्या शैक्षणिक खर्चही भागविण्यासाठी त्यांना बराच संघर्ष करावा लागला. त्यांची अभ्यासाप्रती असणारी ओढ बघून या संघर्षात त्यांना काही शिक्षक,सहाध्यायी यांनी मदत केली. अशा परिस्थितीत त्यांनी उत्कल विद्यापीठातून भाषाशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. एम्. ए., एम. फिल.,आणि पीएच. डी., पर्यंतचे शिक्षण त्यांनी मोठ्या अडचणीतून घेतले आहे. लोकसेवा आयोगाकडून नियुक्त होऊन त्या महाराजा पूर्णचंद्र कॉलेज, बारीपाडा येथे अधिव्याख्याता म्हणून नियुक्त झाल्या. सांप्रत ओडिया भाषेतील सहयोगी प्राध्यापक म्हणून ते कार्यरत आहेत.

दमयंती बशेरा यांनी कविता, निबंध, समीक्षा, व्याकरण, कथा, संशोधनपद्धती आणि अनुवाद या विभिन्न साहित्यप्रकारात लेखन केले आहे. कवितासंग्रहसंथालीजीवी झरना (१९९४), ओ ओत ओग ओल आर जूरी जीता (१९९५), कुइंदी मिम (२००४), से सहेद (२००६); निबंधसंग्रहसागेन साओनहेद (१९९५), पारसी साओनटा साओनहेद (२००९); कथासंग्रहगीद्रभूलाव कहाणी (२०१०); भाषाशास्त्रीय लेखन रानोर तुपलाग (२००८), संथाली साओनहेद रेयाग नगम, गुरू गोमकेयाग झेनेल आर झनालाग (२००६), रोर सानेस (२०१२). याशिवाय त्यांनी ओडिया भाषेतही समीक्षात्मक लेखन केले आहे. अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिसंवादांमध्ये त्यांनी संथाली आणि ओडिया भाषेत साहित्याविषयी शोधनिबंध सादर केले आहेत.

दमयंती बशेरा यांचे साहित्य हे विचारप्रवृत्त करणारे साहित्य आहे. संथाली भाषा आणि त्यानिमित्ताने दिसून येणारे मानवी जीवन हे आदिवासी आणि शोषित गटाचे प्रतिनिधित्व करते. या शोषित आणि सुदूरवर्ती गटाचे दु:ख, विचारविश्व त्यांनी त्यांच्या साहित्य आणि संशोधनातून मांडले आहे. मयूरभंज या परिसरातील संथाली जमात हा दमयंती बशेरा यांच्या विचारविश्वाचा पहिला घटक आहे.त्यांचे भाषाशास्त्रीय लेखन हे संथाली भाषा आणि साहित्य यांच्या परिवर्धनासाठी झाले आहे. संथाली भाषेच्या लिपी पासून ते सर्व अभिव्यक्ती माध्यमाच्या सूसूत्रीकरणासाठी त्यांनी त्यांचे भाषाशास्त्रीय लेखन केले आहे.

अखिल भारतीय संथाली लेखक संस्थेचा पीअर ऑफ द इयर अवॉर्ड (१९९४), साहित्य अकादमी पुरस्कार, तांत्ररासूणी पुरस्कार (२०१०) असे काही पुरस्कार त्यांनी प्राप्त आहेत.

संदर्भ : http://sahitya-akademi.gov.in/library/meettheauthor/damayanti_beshra.pdf