मानवाच्या आहारामध्ये पाऱ्याचे अत्यल्प प्रमाण असलेल्या वनस्पती, प्राणी व मासे यांचा समावेश अनिवार्यपणे होत आलेला आहे. तथापि कोळसा व खनिज तेल यांसारख्या इंधनांच्या अमर्याद वापरामुळे वातावरणातील पाऱ्याचे प्रमाण वाढत आहे. याशिवाय पीडकनाशके व कवकनाशके म्हणून पाऱ्याची विविध कार्बनी संयुगे वापरात आहेत. पाऱ्याची इतर संयुगे देखील बीजसंरक्षक व कवकनाशक म्हणून वापरण्यात येतात. या कारणांमुळे पर्यावरणातील पाऱ्याचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामध्ये मानवाला सर्वांत विषारी समजल्या जाणाऱ्या कार्बनी स्वरूपातील पाऱ्याचे प्रमाण अधिक आहे. जेव्हा जलावरणात मूलद्रव्यरूपी (किंवा अकार्बनी) पारा सोडला जातो, तेव्हा त्याचा पाण्यातील सजीवांमुळे मिथिल वा इतर कार्बनी शृंखलांद्वारे संयोग होऊन त्याचे पाऱ्याच्या कार्बनी संयुगांत रूपांतर होते, असे सिद्ध झाले आहे.

पारा व त्याची बहुतेक सर्व संयुगे मानवाला व प्राण्यांना विषारी आहेत. पाऱ्याचे बाष्प व धूळ नाकावाटे तसेच त्वचेवाटे शरीरात गेल्यास विपरीत परिणाम होतो. मर्क्युरिक आयन ज्या संयुगांमुळे शरीरातील कोशिकांमध्ये (पेशींमध्ये) तयार होतात ती संयुगे विषारी असतात. मर्क्युरिक क्लोराइड हे सर्वांत जास्त विषारी संयुग आहे. पाऱ्याचे शरीरावर अनेक विपरीत परिणाम होतात.

पार्श्वभूमी : १९५६ मध्ये मिनामाटा (जपान) येथील एका रूग्णामध्ये मर्क्युरी विषबाधेची (Poisoning) लक्षणे दिसून आली. यामध्ये रूग्णाच्या मज्जासंस्था आणि स्नायूंवर परिणाम झालेला दिसून आला. तसेच काही कालावधीमध्ये याच लक्षणांचे सु. २,५०० रूग्ण आढळून आले. स्थानिक रासायनिक कारखान्यातून येणाऱ्या सांडपाण्यातील पाऱ्याच्या अंशाने इतर जलसाठे प्रदूषित झाल्यामुळे ही विषबाधा झाली होती.

पाऱ्याचे संहतीकरण : नैसर्गिक अवस्थेत वाढविलेल्या अन्नपदार्थांमध्ये अत्यल्प प्रमाणात पारा असतो. अन्न म्हणून वापरण्यात येणाऱ्या मांसात सरासरी दशलक्ष भागांमध्ये ०.०१ भागापेक्षा कमी पारा असतो असे आढळून आले आहे (अन्नामध्ये ०.०५/दशलक्ष भाग ही मर्यादा पाऱ्याकरिता सर्वसामान्यपणे ग्राह्य मानण्यात येते). माशांमध्ये पाऱ्याचे प्रमाण याच्या दुप्पट व वनस्पतींमध्ये दीडपट असल्याचे दिसून येते. काही शैवलांमधील पाऱ्याचे प्रमाण ती ज्या सागरी पाण्यात वाढतात त्यातील पाऱ्याच्या प्रमाणापेक्षा १०० पट असते. ही शैवले खाणारे मासे हा पारा अधिक संहत करतात व या माशांवर जगणारे प्राणी त्याचे प्रमाण आणखी वाढवितात.

दीर्घकालीन विषबाधा : कारणे : पाऱ्याची दीर्घकालीन विषबाधा ही दीर्घकाल अल्प प्रमाणातील पाऱ्याशी सातत्याने संबंध येण्यामुळे होऊ शकते (उदा., ज्या उद्योगात पारा अथवा त्याची संयुगे वापरावी लागतात अशा उद्योगात).

लक्षणे : या विषबाधेमुळे हिरड्या लाल होऊन त्यांतून रक्त येणे, भूक मंदावणे, लाळ सुटणे, पचनक्रियेत अडथळा येणे, पांडुरोग (anaemia), मूत्रपिंडात बिघाड होणे, बहिरेपणा इ. लक्षणे आणि केंद्रिय तंत्रिका तंत्रात विकृती निर्माण झाल्याने बधिरता, अडखळती चाल, दृष्टिक्षेत्राचे आकुंचन (विवर दृष्टी), अस्पष्ट बोलणे व कापरे भरणे ही लक्षणे आढळून येतात.

उपचार : अशा रुग्णाला पाऱ्याच्या वा त्याच्या संयुगांच्या संपर्कापासून दूर ठेवणे व त्याच्या पचनक्रियेत सुधारणा करणे अत्यावश्यक असते. काही वेळा अशा चिकित्सेचा परिणाम फार हळूहळू दिसून येतो.

तीव्र विषबाधा : कारणे : पाऱ्याची विद्राव्य लवणे पोटात गेल्यास तीव्र विषबाधा होते. ही लवणे क्षोभकारक विषे असतात. मर्क्युरिक क्लोराइडाची विषबाधा झाल्यास शक्य तितक्या लवकर तज्ञ डॉक्टरांना बोलावणे इष्ट ठरते.

लक्षणे : मर्क्युरिक क्लोराइड ज्या प्रथिनांच्या संपर्कात येते त्या प्रथिनांचा अविद्राव्य साका बनतो आणि त्यामुळे तोंड व घसा राखी रंगाचे दिसू लागतात. हे लवण पोटात गेल्यावर सामान्यतः काही मिनिटांतच उलटी होते. उलटी होण्यापूर्वी गेलेला काळ व ती पुरती झालेली आहे की नाही हे चिकित्सा सुरू करण्यापूर्वी माहीत असणे आवश्यक असते.

उपचार : कच्च्या अंड्यातील बलक वा दूध यांच्या स्वरूपात प्रथिने देऊन नंतर पोटातील अद्याप शोषण न झालेल्या मर्क्युरिक आयनांचा निचरा करण्यासाठी अथवा ते निष्क्रिय करण्यासाठी उलटी होणारी औषधे देतात व पोट विशिष्ट नळीने साफ करतात. याकरिता प्राणिज कोळशाचाही उपयोग करतात. यानंतर सर्व शरीरावर होणाऱ्या विषबाधेच्या परिणामावर योग्य उपचार करावे लागतात.

उपाययोजना : पाऱ्याच्या विषबाधेचे प्रमाण कमी व्हावे तसेच पाऱ्याच्या विषबाधेची कारणे समूळ नष्ट व्हावीत, याकरिता राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर प्रयत्न आवश्यक आहेत. याकरिता पाऱ्यासोबत संबंध येणार नाही अशी काळजी घ्यावी; तसेच रासायनिक उद्योगांमधील पाऱ्याचा वापर टाळावा; पाऱ्याला पर्याय उपलब्ध करणे या धोरणाला प्रोत्साहन द्यावे. पाऱ्याच्या वापरावर असे निर्बंध अनेक देशांमध्ये करण्यात आले आहेत.

पहा : पारा, पारा निष्कर्षण, पारा संयुगे, मिनामाटा विकृती.

संदर्भ :  Bidstrup, P.L. Toxicity of Mercury and its Compounds, New York, 1964.