भगत, प्रेमिंद्र सिंग : (१४ ऑक्टोबर १९१८—२३ मे १९७५). दुसऱ्या महायुद्धात व्हिक्टोरिया क्रॉसने सन्मानित केले गेलेले पहिले भारतीय लष्करी अधिकारी. त्यांचा जन्म गोरखपूर (उत्तर प्रदेश) येथे झाला. त्यांचे वडील सुरेंद्र सिंग भगत हे संयुक्त प्रांतात कार्यकारी अभियंता होते. प्रेमिंद्र सिंग नऊ वर्षांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी देहरादून येथील रॉयल इंडियन मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर त्यांनी आपले पुढील शिक्षण इंडियन मिलिटरी अकॅडमीत घेतले. येथे त्यांनी टेनिस आणि स्क्वॅश संघांचे नेतृत्व केले.
१५ जुलै १९३९ रोजी सेकंड लेफ्टनंट भगत यांना द रॉयल बाँबे सॅपर्समध्ये कमिशन मिळाल्यानंतर दुसऱ्या महायुद्धात त्यांनी सहभाग घेतला. ३१ जानेवारी १९४१ रोजी इथिओपियामधील मेतेम्माच्या पाडावानंतर इटालियन सैनिकांनी रस्त्यावर पुरून ठेवलेले भूसुरूंग नष्ट करण्याची जबाबदारी भगत यांच्यावर सोपविण्यात आली. त्याच रात्री त्यांनी पळून जाणाऱ्या शत्रूचा पाठलाग करीत असताना त्यानंतरच्या चार दिवसांत ५५ मैलाच्या प्रदेशातील १५ भूसुरूंगे शोधून काढून त्यांना निष्क्रिय केले. या काळात त्यांच्या वाहनांना दोनवेळा उडविण्यात आले आणि तिसऱ्यांदा त्यांच्यावर आकस्मिक हल्ला होऊन त्यांना शत्रूच्या गोळीबाराला तोंड द्यावे लागले. या अनुभवांमुळे आता आपण ही कारवाई यशस्वीपणे पार पाडू शकतो या त्यांच्यातील निर्माण झालेल्या आत्मविश्वासामुळे थकलेले असूनही विश्रांती न घेता त्यांनी कारवायांमध्ये खंड पाडू दिला नाही. कानांच्या पडद्याची अक्षरशः चाळण झालेली, शरीरातून रक्तस्त्राव होत असतानाही अन्नपाणी, विश्रांती, कशाचीही तमा न बाळगता त्यांनी ९६ तास अविरत काम केले. त्या वेळच्या अती कठीण परिस्थितीतही शांत चित्त, धैर्य, साहस आणि चिकाटी ठेवत केलेल्या अतुलनीय कामगिरीसाठी त्यांना व्हिक्टोरिया क्रॉस या अत्त्युच्च गौरवाने सन्मानित केले गेले.
लेफ्टनंट जनरल भगत यांनी त्यांच्या लष्करी कारकिर्दीत कित्येक महत्त्वाचे पदभार सांभाळले. त्यांतील उल्लेखनीय म्हणून बाँबे सॅपर्सचे कमांडंट, भारतीय सेनेच्या गुप्तचर विभागाचे (DMI) संचालक आणि इंडियन मिलिटरी अकॅडमी (IMA) चे कमांडंट हे नमूद करता येईल. १९६२ च्या भारत-चीन युद्धानंतर भारताला मिळालेल्या अपयशाच्या कारणमीमांसा आणि विश्लेषणासाठी भारत सरकारतर्फे नेमण्यात आलेल्या ‘हॅण्डरसन ब्रुक्स कमिटी’च्या सभासदपदी जनरल भगत यांची नियुक्ती करण्यात आली. अपयशाचे विश्लेषण करणाऱ्या ‘हॅण्डरसन ब्रुक्स-भगत अहवाला’चे ते सहलेखक होते. ९ माउंटन डिव्हिजनचे ते पहिले जीओसी होते. नंतर ते ११ कोअरचे कमांडर आणि १९७२ मध्ये नॉर्दर्न कमांडचे आर्मी कमांडर झाले. १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर जनरल भगत उत्तरीय विभागाचे आर्मी कमांडर असताना पाकिस्तानी सैन्य दलातील लेफ्टनंट जनरल अब्दुल हमीद खान यांच्याबरोबर भारत-पाकिस्तान सीमेवर नियंत्रण रेषा ठरविण्याची क्लिष्ट कामगिरी पार पडली. भारतीय लष्करातील अधिकारी आणि जवानांसाठी जनरल भगत हे नेहमी पूज्यस्थानी होते. अतिशय प्रामाणिक, तेजस्वी आणि वरिष्ठांबरोबर प्रसंगी स्पष्टवक्तेपणा ही त्यांच्या स्वभावातील वैशिष्ट्य म्हणता येतील.
फोर्जिंग द शील्ड (१९६५), शील्ड अँड द स्वर्ड (१९६७), ॲन आर्मी कमांडर्स रेड डायरी (१९८६) आणि विल्डींग द ऍथॉरिटी इन इमर्जिंग कंट्रीज (१९८६) या त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांतून त्यांचा दूरदर्शी आणि सखोल सामरिक दृष्टीकोन प्रतिबिंबित होतो. सैन्यातील निवृत्तीनंतर जनरल भगत यांना जवळजवळ डबघाईस आलेल्या दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन (DVC) या सार्वजनिक संघटनेच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले. अभियांत्रिकी ज्ञान, उच्च व्यवस्थापन कौशल्य आणि एका ठराविक साचेबंदाच्या पलीकडे जाऊन मानव संसाधन तंत्र वापरण्याची कला, या त्यांच्यातील गुणांमुळे १० महिन्यांच्या अल्पावधीतच त्यांनी दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनचे नशीबच बदलून टाकले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली केवळ एका महिन्यात ४५ मेगावॅट पुरवठा ८५ मेगावॅट इतका वाढविला गेला. ऑक्टोबर १९७४ पर्यंत हा पुरवठा ७०० मेगावॅट पेक्षाही अधिक इतका वाढविला गेला, तर डिसेंबर १९७४ पर्यंत संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये वीज वापरावरील निर्बंध उठविण्यात आले.
व्हिक्टोरिया क्रॉस या अत्युच्च सन्मानाखेरीज १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्धाच्या काळात त्यांच्या उच्चस्तरीय मार्गदर्शन आणि सहभागासाठी त्यांना पद्मविभूषण आणि परमविशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले.
कलकत्ता (कोलकाता) येथे त्यांचे निधन झाले.
संदर्भ :
- Varma, Ashali, The Victoria Cross : A Love Story, Pune, 2012.
- https://www.indianarmyveterans.gov.in/showfile.php?lang=1&level=2&&sublinkid=1448&lid=1043
- http://vconline.org.uk/premindra-singh-bhagat-vc/4587936095
भाषांतरकार : वसुधा माझगावकर
समीक्षक : अजय मुधोळकर