भारतातील केरळ राज्यातील तिरुअनंतपुरम् शहरातील पुरातन वास्तुकलेचा वारसा असणाऱ्या ‘ईस्ट फोर्ट’ भागात असलेले श्री पद्मनाभस्वामी मंदिर’ म्हणजे या शहराची ओळख! हे मंदिर भक्तजन आणि पर्यटक या दोघांचेही मुख्य आकर्षण आहे. दरवर्षी हजारो लोक या मंदिराला भेट देतात. या मंदिरातील शेषशायी विष्णू म्हणजे येथील त्रावणकोर संस्थानाचे मुख्य दैवत असून इथला राजा हा या देवस्थानाचा प्रमुख विश्वस्त आहे. या शहराचे नाव देखील या देवाचा संदर्भ घेऊनच ठरले.’अनंत शयनं’ या स्थितीमध्ये असलेल्या विष्णूचे पवित्र निवासस्थान म्हणून त्रावणकोरच्या या राजधानीला नाव मिळाले ‘तिरु अनंत  पुरम्’!, त्यामुळे अर्थातच हे मंदिर म्हणजे या संस्थांनाचा केंद्रबिंदू ठरले आणि त्यानंतर हे सर्व गाव या मंदिराच्या चहुबाजूंनी विस्तारत गेले.

पद्मनाभस्वामी मंदिर

ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाची असणारी ही वास्तू द्रविड आणि केरळी या दोन्ही शैलींतील वास्तुकलेचा मिलाफ आहे. ब्रह्मपुराण, भागवतपुराण तसेच महाभारत यांसारख्या प्राचीन ग्रंथामध्ये या मंदिरांचा उल्लेख आढळतो. संदर्भग्रंथ असे सांगतो की, याची प्रतिष्ठापना कलियुगाचा आरंभ झाल्यानंतर ९६४ व्या दिवशी दिवाकर मुनी नावाच्या तुलू ब्राह्मणाकडून केली गेली. स्थापत्यशास्त्रानुसार सांगायचे  झाले, तर साधारपणे ८ व्या शतकात या मंदिराचा संदर्भ आढळतो. त्यावेळी अस्त‍ित्वात असणारी वास्तू म्हणजे लहानसा गाभारा असलेले साधे असे केरळी शैलीतील छोटेसे मंदिर. त्यानंतर बदलत्या राजवटीनुसार या मंदिराचा विस्तार होत गेला. १५६६ रोजी या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बांधकामास सुरुवात झाली. पद्मनाभस्वामी मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे गोपुर (दक्षिण भारतीय शैलीतील मंदिराचे प्रवेशद्वार). पद्मनाभस्वामी मंदिरातील गोपुर हे पांडीयन शैलीतील असून १०० फूट उंच आणि ७ मजले असलेले पूर्वाभिमुख आहे. दुर्दैवाने, १७व्या शतकात या परिसरात आग लागली व त्यात या मंदिराचे अनेक भाग आगीत नष्ट झाले. पण त्यानंतर १८व्या शतकाच्या सुरुवातीच्या काही वर्षात त्रावणकोरचा राजा अनीयन तिरुनाल मार्तान्ड वर्मा याच्या राजवटीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या मंदिराचे नुतनीकरण केले गेले.  त्यावेळी या मंदिराच्या परिघीय भिंती तशाच ठेऊन आतल्या जागेतच गर्भगृहाचा विस्तार केला गेला. वास्तुशास्त्रानुसार ८x८ अशा चौरसांच्या जाळीचा ग्रीड (grid) वापर करण्याऐवजी राजाने ९x९ ही ग्रीड (grid) वापरली. त्या जाळीच्या केंद्रातील ३x३ चौरसात मुख्य मंदिर आहे. मुख्यत्वे दगड आणि कांस्य यातून या मंदिराचे बांधकाम केले गेले. ग्रॅनाइट दगडात ‘ओट्टाकाल मंडप’ म्हणजे गर्भगृहाच्या खालचा चौथरा बांधला गेला. एका दगडातून कोरलेला हा ओट्टाकाल मंडप हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. याचबरोबर मुख्य मंदिराच्या चारही बाजूस मार्गिका (corridors) बांधले आहेत. ३६० खांब असलेले ग्रॅनाइटमधील मार्गिकांवर वर सुंदर कोरीव काम केले आहे. व्याल, यक्ष यांसारख्या आकृती त्यावर कोरल्या आहेत. तसेच पूर्व भागात एक नृत्य मंडप आहे ज्याला ‘नाटक शाळा’ असे संबोधले जाते. मंदिरामध्ये वर्षातून एकदा १० दिवसांचा उत्सव साजरा करतात. त्यावेळी या मंडपामध्ये कथकली या पारंपरिक  नृत्याप्रकाराचे प्रदर्शन करतात.

पद्मनाभस्वामी मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे भव्य आणि रेखीव विष्णू मूर्ती! मार्तान्ड वर्मा याच्याच काळात पद्मानाभाची लाकडी मूर्ती बदलून त्याऐवजी नेपाळमधील गंडकी नदीच्या पात्रातून आणलेल्या शाळीग्रामापासून बनवलेल्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. १२,००० शाळीग्रामांचा वापर करून तयार केलेली ही मूर्ती भारतातील सर्वात मोठ्या आणि सुंदर विष्णू मूर्तींपैकी एक आहे. शेषनागावर शयनस्थितीत असलेला विष्णू म्हणजे शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे. या मूर्तीचे एक वैशिष्ट्य म्हणजे ती एका नजरेत आपल्याला कधीच पाहता येत नाही. गाभाऱ्याला ३ द्वारे आहेत आणि प्रत्येकातून या मूर्तीचा एक एक भाग आपल्याला दिसतो. ही ३ दृश्ये एकत्र केल्यावर संपूर्ण मूर्ती कशी आहे याचे आकलन होते.

पद्मानाभस्वामी मंदिर आणखी एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे, ते म्हणजे येथील सुरेख भित्तीचित्रे. मूळ आकारातील (Life size) शेषशायी विष्णू, नरसिंह त्याचबरोबर गणपती तसेच  गजांत लक्ष्मी अतिशय नोंदनीय आहेत. या शैलीमधील चित्रे म्हणजे पारंपरिक केरळी चित्रकलेच उत्तम नमुना. तसेच या देवळातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ध्वजस्तंभ. गर्भगृहाच्या सरळ रेषेत स्थापन केलेला, सोन्याचा मुलामा दिलेला ८० फुटी ध्वजस्तंभ आपल्या नजरेत भरतो. या स्तंभाची संकल्पना इथल्या चर्चेस मध्ये पण पाहायला मिळते. हिंदू वास्तुकलेतील काही गोष्टी या चर्चेसच्या बांधणीत आत्मसात केल्या गेल्या आणि त्यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे ध्वजस्तंभ. या शहरातील बहुतांश मोठ्या चर्चेस मध्ये हे स्तंभ आढळून येतात.

पद्मनाभस्वामी मंदिर हे इतर द्रविड शैलीमधील मंदिरांच्या तुलनेत लहानसे आहे, पण हीच तर पारंपरिक केरळी शैलीची खासियत आहे. केरळमधील पारंपरिक वास्तुशैलीत इमारती या भव्य कधीच नसतात तर कायम लहान बांधणीच्या आजूबाजूच्या निसर्गात एकरूप होतील अशा असतात. हे  कारण म्हणजे इथल्या लोकांच्यामते इथला निसर्ग हा इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त भव्य आणि सुंदर आहे. पुरातन काळापासून इथल्या लोकांची जीवनशैली निसर्गाला अनुकूल होती. त्याचेच प्रतिबिंब वास्तुकलेत उमटले. त्यामुळे बांधकाम करताना वास्तू आणि निसर्ग यात कायम निसर्गाचे वर्चस्व राहायला हवे अशी येथील संकल्पना आहे. म्हणून इमारती या बाजूच्या निसर्गात मिसळून जातील अशा छोटेखानी बांधणीमध्ये केल्या आहेत. त्यामुळे पद्मनाभस्वामी मंदिर जरी इथले सर्वात मोठे मंदिर असले तरी लांबून पाहिल्यावर बाजूची हिरवीगार नारळाची झाडे आणि समोरचे निळे पद्मतीर्थ या सगळ्यामध्ये ते कधी एकरूप होते हे समजतच नाही.

समीक्षक : श्रीपाद भालेराव