पद्मनाभपूरम् राजवाडा
सोळाव्या शतकात पद्मनाभपूरम ही त्रावणकोर संस्थानाची राजधानी होती. तेथील राजांचे निवासस्थान म्हणून केरळी वास्तुशैलीत ‘पद्मनाभपूरम् राजवाडा’ बांधण्यात आला. हा राजवाडा पद्मनाभपूरम् किल्ल्याच्या (१८५ एकर विस्तार) आतील भागात वसला आहे. या परिसरात लाकूड मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे ६.५ एकर इतका विस्तार असलेल्या या राजवाड्याच्या बांधकामासाठी मुख्यत्वे लाकडाचा वापर केलेला आहे. याचबरोबर वास्तूंचे चौथरे व काही ठराविक भिंतींसाठी जांभा या स्थानिक दगडाचा वापर करण्यात आला आहे. येथील सर्व बांधकाम हे पारंपारिक आणि वर्षानुवर्षांच्या अनुभवातून विकसित झालेल्या सुतारकामविज्ञान म्हणजेच टाकसशास्त्रानुसार (Taccusastra) करण्यात आले आहे. त्यामुळे हा राजवाडा म्हणजे लाकडी बांधकामाचे तंत्रज्ञान आणि कौशल्य या दोन्हींचा उत्तम नमुना समजला जातो. १५९०-१८०० या कालखंडात या वास्तू समूहामध्ये अनेक इमारती बांधण्यात आल्या.
थाई कोट्टारम (राणीचा महाल), पूर (घरे), मलिका (वाडे) आणि विलासम (मंडप) हे या वास्तू समूहाचे मुख्य भाग आहेत. राजवाड्याच्या पश्चिमेस मुख्य प्रवेशद्वार (पदीपूर) आहे. आतील बाजूस ‘पूमुखम’ (स्वागतकक्ष) आहे. त्याच्या वरच्या मजल्यावर ‘मंत्रशाळा’ म्हणजे राजपरिषदेचे सभागृह आहे, त्याला रंगीत अभ्रकाच्या खिडक्या आहेत. या भागावरील गडद रंगाचे गुळगुळीत तळजमीन / तळपाट (flooring) प्रसिद्ध आहे. ऑक्साईड, नारळाची करवंटी, अंड्याची टरफले यांसारख्या घटकांच्या मिश्रणातून ही तळजमीन / तळपाट तयार केले आहे. हे येथील पारंपारिक तंत्र आहे जे केरळी वास्तुकलेत पाहायला मिळते. तसेच या सभागृहाच्या बाजूने असलेली लाकडी ‘जाळी’ महत्वपूर्ण आहे, त्यामुळे आतील प्रकाश नियंत्रित राहतो व तापमान तुलनेने थंड राहते. येथील इतर इमारतींमध्ये देखील या प्रकारच्या लाकडी जाळीचा समावेश करण्यात आला आहे. पुमुखमच्या आवाराच्या डावीकडे ३०० वर्षे जुनी ‘मणीमलिका’ (Clock Tower) आहे. राजपरिषदेनंतर येथे ‘उत्तुपूरा’ म्हणजे भोजनशाळा आहे. तेथे ७२ X ९ मी. आकाराची दोन सभागृहे आहेत, ज्यात सुमारे २००० लोक सामावले जाऊ शकतात. त्याचबरोबर या परिसरात ‘उप्पिरिका मलिका’ ही चार माजली इमारत येथील सर्वांत उंच वास्तु आहे. यात अनुक्रमे कोषागार, राजाचे निवास व अभ्यासिका, तसेच शस्त्रागार हे सर्व सामावलेले आहे. सर्वात वरच्या मजल्यावर राजघराण्याचे देवघर आहे. त्याच्या भिंतीवर १८ व्या शतकातील भित्तीचित्रे आहेत. त्या भित्तीचित्रात देवदेवतांसोबतच त्या काळातील सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचे वर्णन केलेले दिसते.
या वास्तुंमध्ये सर्वांत पुरातन आणि महत्वाची वास्तू म्हणजे राज्यकर्त्या राणीचा महाल ‘थाई कोट्टारम’. या वास्तू समूहाच्या मध्यभागी दोन मजली उंच ‘थाई कोट्टारम’ बांधलेले आहे. ही येथील मुख्य आणि सर्वांत पुरातन वास्तू आहे. उर्वरित सर्व इमारती या महालाच्या बाजूने बांधल्या गेल्या आहेत. कोट्टारमची रचना पारंपारिक ‘नालकेत्टू’ प्रकारची आहे. मध्यभागी चार स्तंभांवर तोलून धरलेले, उतरत्या छपराने वेढलेले मोकळे अंगण आणि त्याच्या चारही बाजूस खोल्या बांधल्या आहेत. या वास्तुच्या नैऋत्य भागात ‘एकांत मंडप’ या नावाची लहानशी खोली आहे. त्या खोलीतील लाकडी कोरीवकाम, फुलांची नक्षी आणि विशेषतः फणसाच्या लाकडात कोरलेला स्तंभ प्रसिध्द आहेत.
आतील इमारती लहान-मोठ्या आवारांनी (courtyards) एकमेकांना जोडल्या गेल्या आहेत. ठराविक वास्तुंना एकांत मिळवून देण्यासाठी या आवारांचा वापर केला आहे. भोवतालच्या निसर्गासोबत जोडले जाईल अशाप्रकारे इमारतींचे आयोजन करणे हे येथील वास्तुकलेचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
येथील इमारतींची छप्परे इथल्या बांधकामातील वैशिष्ट्यपूर्ण घटक आहे. प्रत्येक वास्तुचे छत केरळी शैलीनुसार उतरते आहे, लाकडी तुळया व त्यावर भाजलेल्या मातीची कौले अशी त्यांची रचना आहे. प्रत्येक ठिकाणी उतरत्या छपरांमधून उभ्या खिडक्या काढलेल्या आहेत (roof dormers), या खिडक्या म्हणजे येथील स्थानिक वास्तुकलेचे वैशिष्ट्य आहे. प्रत्येक खिडकीवर अत्यंत नाजूक कोरीवकाम केलेले आढळते. तसेच या छतांची आतील बाजू देखील विलक्षण सुंदर आहे. लाकडी तुळयांची जाळी आणि त्यावर नक्षीकाम अशी रचना केली आहे.
ग्रानाईट दगडात बांधलेला नृत्यमंडप (नवरात्री मंडप) आणि सरस्वती मंदिर या वास्तू तुलनेने नंतरच्या आहेत, स्वाती तिरुनल राजाच्या काळात (१७४४) त्या बांधल्या गेल्या. तेथील वास्तुशैली बाकीच्या राजवाड्याच्या वास्तुशैलीपेक्षा निराळी आहे. सपाट छत, ग्रानाईटचे कोरीव स्तंभ आणि वासे, सुबक मूर्ती अशा सर्व गोष्टी स्थानिक केरळी वास्तुशैलीपेक्षा विजयनगरकालीन वास्तुकलेसोबत साधर्म्य दाखवतात. याचबरोबर येथे येणाऱ्या परकियांच्या निवासासाठी बांधलेला ‘इंद्रविलास’ महालावर डच व पोर्तुगीज वास्तुशैलीचा प्रभाव आढळतो. हा महाल १८ व्या शतकात बांधला गेला.
पद्मनाभपूरम् राजवाडा हा पारंपरिक लाकडी वास्तुकलेचा सर्वोच्च बिंदू समजला जातो. हा राजवाडा केरळी वास्तुकलेमधील जतन केली गेलेली भारतातील महत्वपूर्ण वास्तू आहे.
संदर्भ :
- http://whc.unesco.org/en/tentativelists/5897/
- http://arkistudentscorner.blogspot.in/2012/01/padmanabhapuram-palace.html
- http://archaeology.kerala.gov.in/index.php/museums/padmanabhapuram-palace
समीक्षक : श्रीपाद भालेराव