भारतीय संगीतामध्ये रागसंकल्पना ही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. या संकल्पनेमुळेच भारतीय संगीत इतर संगीतापासून वेगळे प्रतीत होते आणि म्हणूनच रागतत्त्व भारतीय संगीताचा प्राण आहे, असे मानले जाते. तेव्हा या संकल्पनेचे स्वरूप काय आहे, भारतीय संगीतात त्याचे स्थान काय आहे व ते कसे सर्वत्र व्यापून राहिले आहे, याची चर्चा करणे म्हणजेच रागविचार होय.
व्युत्पत्तीच्या दृष्टीने पाहिले असता राग हा शब्द रंजनापासून निर्माण झाला आहे. जो रंजन करतो तो राग. ‘रंजयति इति राग:|’ अशी त्याची उपपत्ती दिली जाते. पण संगीतात राग हा ‘योग रूढ’ म्हणजे विशेष अर्थाने वापरण्यात येणारा शब्द आहे. संगीतात रंजन करणाऱ्या अनेक बाबी असूनसुद्धा त्यांना राग म्हणता येत नाही. एखाद्या विशिष्ट सांगीतिक तत्त्वालाच ‘राग’ म्हणतात. या शब्दाला एक विशिष्ट अर्थ प्राप्त झाला आहे, कारण त्याच्यामागे एक विशिष्ट संकल्पना आहे. ती संकल्पना रागाची जी व्याख्या करण्यात आली आहे, त्यावरून समजू शकते.
ऐतिहासिक दृष्ट्या ‘राग’ ही संकल्पना बृहद्देशी ह्या संगीतशास्त्रावरील ग्रंथाचे निर्माते मतंगांच्या काळापासून (सु. सातवे शतक) अस्तित्वात आली, असे आढळून येते. त्यापूर्वीच्या काळी भरतांच्या नाट्यशास्त्रात जातिराग, ग्रामराग असे उल्लेख मिळतात. पण आजच्या रागसंकल्पनेचे स्वरूप आणि जातिराग किंवा ग्रामराग यांचे स्वरूप सारखे नसावे, असे विद्वानांचे म्हणणे आहे. आजच्या रागस्वरूपाच्या बीजरूपासारखे ते असावे. कारण जातिराग व ग्रामराग यांमधूनच राग ही संकल्पना निर्माण झाली, असे तज्ञांचे म्हणणे आहे. याला पुरावा म्हणून बृहद्देशी ग्रंथातील मतंगांचे पुढील वचन उद्धृत करतात :
‘रागमार्गस्य यद्रूपं यन्नोक्तं भरतादिभि: |
निरुप्यते तदस्माभि: लक्ष्यलक्षण संयुतम् ||’
यावरून राग या शब्दाची व्याख्या व स्वरूप मतंगाने प्रथम स्पष्ट केले, असे कळते. मग प्रश्न निर्माण होतो, की जातिराग, ग्रामराग वगैरे जे उल्लेख भरतांच्या नाट्यशास्त्रात आढळतात, त्याचे काय? याबद्दल अनेक विद्वानांनी केलेल्या अभ्यासाचा निष्कर्ष थोडक्यात असा नमूद करता येईल, की ग्रह, अंश, तार, मंद्र, न्यास, अपन्यास वगैरे दहा लक्षणांनी युक्त व रंजक अशा जातींचे गायन होत असे. जातिराग किंवा जाति या विशिष्ट लक्षणांनी युक्त अशा त्या बांधलेल्या स्वररचना असत व विशिष्ट बंधने पाळून त्या गायल्या जात असत. बांधलेल्या चाली गाण्यासारखे त्याचे स्वरूप होते. या जातिगायनांतूनच रागगायन निर्माण झाले, असे मानतात. कारण या जातिगायनाची पुढली पायरी रागगायन आहे, असे मानतात. रागगायनात कलावंताला स्वररचनेला शृंगारित करण्याचे स्वातंत्र्य असते. राग शब्दाची जी व्याख्या मतंगांनी दिली आहे, त्यावरून हे समजू शकेल. ती व्याख्या अशी :
‘योऽसौध्वनिविशेषस्तु स्वरवर्ण विभूषित: |
रंजकोजनचित्तानां स राग: कध्यतेबुधै: ||’
येथे ध्वनिविशेष म्हणजे धून, अथवा चाल, अथवा नगमा, किंवा विशिष्ट स्वरसंगती, स्वरवर्ण म्हणजे स्वरांची स्थायी, आरोही, अवरोही, संचारी वगैरे गानक्रिया. थोडक्यात, स्वरांच्या विविध क्रियांनी विस्तार करणे म्हणजे वर्ण. सारांश, जी चाल अथवा धून स्वरांच्या विविध क्रियांनी सुशोभित केली जाते व जी लोकांना रंजक वाटते, तो राग असा अर्थ या व्याख्येतून निघतो. पण ही वर्णक्रिया वाटेल तशी मन:पूर्त करायची नसून मूळ स्वररचनेची जी लक्षणे असतील त्यांना धरून करायची असते. जातिगायनामधून रागगायन निर्माण झाले, याचा अर्थ हा. तेव्हा एखाद्या स्वररचनेला विविध स्वरांच्या क्रियेने विशिष्ट लक्षणांनी युक्त अशा तऱ्हेने सुशोभित करणे व अशा तऱ्हेने संशोभित केलेला प्रकार रंजक होत असेल तर तो राग, अशी रागसंकल्पनेच्या स्वरूपाची फोड होऊ शकेल. हे स्वरूप समजल्यावर रागगायन हे एकीकडून बंधन असलेले व दुसरीकडे स्वातंत्र्य असलेले कसे आहे, याचा खुलासा होईल. या बंधनयुक्त स्वातंत्र्यामुळे प्रत्येक रागाचे स्वतंत्र असे वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्व निर्माण होते व ते निर्माण करण्यास कलावंताला स्वातंत्र्य असते. प्रत्येक रागाला व्यक्तिमत्त्व असते, याचा अर्थ हा असा आहे.
मतंगांच्या वचनानुसार रागसंकल्पनेची ही फोड केल्यावरसुद्धा एक शंका उरते ती ही, की जातिगायनात व रागगायनात काय साम्य व फरक आहे. शार्ङ्गदेवांच्या (शारंगदेवांच्या) संगीतरत्नाकरामध्ये (तेरावे शतक) जातिगायनाची काही उदाहरणे दिली आहेत. ती पाहिली असता असे दिसून येते, की जातिगायन हे रागगायनापेक्षा अधिक बंधनयुक्त आहे. जातिगायनात नियम म्हणजे ग्रह, अंश, न्यास वगैरे लक्षणे काटेकोरपणे पाळली जातात, तर रागगायनामध्ये विशिष्ट स्वरसंगती, ज्याला पकड म्हणतात, त्या आणि काही विशिष्ट कणयुक्त स्वरांचा वापर पूर्वनियोजित असतो. एखाद्या जातिगायनात अनेक रागांच्या छाया दिसू शकतात, कारण विशिष्ट स्वरसंगती आधारभूत करण्याची कल्पना त्यांत नसते; पण रागगायनात दुसऱ्या रागांची छाया अजाणता दिसल्यास दोष मानला जाईल. अर्थात जाणून आविर्भावतिरोभावाच्या तत्त्वाने विस्तार केल्यास तो दोष नव्हे, तर सौंदर्यमूलक तत्त्वही ठरेल आणि यामुळेच जातींची संख्या मर्यादित आहे; पण रागांची संख्या अमर्याद आहे. भरतांनी १८ जाती सांगितल्या; पण मतंगांनी सांगितलेले राग जरी घेतले, तरी बरीच मोठी संख्या होईल. भरतांनी १८ जाती ही मर्यादित संख्या आपल्या नाट्यशास्त्रात नमूद केली असल्यामुळे विद्वानांचे असेही मत आहे, की भरतकाली प्रचलित असलेल्या गीतांचे त्यांनी या १८ प्रकारच्या स्वरक्षेत्रांमध्ये (सप्तक अथवा स्केल) वर्गीकरण केले असावे आणि दहा लक्षणांनी युक्त अशा प्रकारे बंधने घालून त्यांचे गायन होत असावे. त्यामुळेच त्यात गायनामध्ये अनेक रागांच्या छाया आढळतात तर रागगायनामध्ये प्रत्येक रागाचे स्वतंत्र असे व्यक्तिमत्त्व आढळते.
आणखी एका विशिष्ट सूत्रवचनाच्या आधारे राग ही संकल्पना स्पष्ट करता येईल. स्वर म्हणजे स्वत:च रंजन करणारा नाद. संगीतातले हे एक तत्त्व आहे. या प्रकारच्या स्वरांच्या रचनेने एक रचना आणि तीसुद्धा रंजक असली तर ती ‘जाति’ होते. ‘रंजक: स्वरसंदर्भ: गीत भित्यभिधीयते’ या वचनाप्रमाणे रंजक अशी विशिष्ट स्वररचना, विशिष्ट लक्षणांनी युक्त म्हणजे जाति असे म्हणता येईल आणि असा जो विशिष्ट स्वरसंदर्भ किंवा ध्वनिविशेष किंवा पकड तो स्वरवर्णाने विभूषित केला, तर राग निर्माण होतो. तेव्हा स्वर, जाती, विशिष्ट धून आणि राग अशी सोपान परंपरा आहे.
रागसंकल्पना भारतीय संगीताचा आत्मा आहे, हे जेव्हा मानण्यात येते तेव्हा एक विचार असाही आहे, की अन्य देशांच्या तुलनेत ही संकल्पना भारतात निर्माण होण्याचे काय कारण असावे. या संबंधात खोलवर पाहिले तर पुढील शक्यता वाटते, की भारतीय संस्कृती ही मूलत: अध्यात्मप्रवण आहे. सर्वसामान्यपणे स्थूलातून सूक्ष्माकडे, मूर्तातून अमूर्ताकडे जाण्याची भारतीय मन:प्रवृत्ती आहे. यामुळे विशिष्ट समूहरूपी बीजाला अंकुरित करून त्याचा विस्तार करून रागनिर्मिती करण्याची ही प्रवृत्ती जोपासली गेली असावी. थोडक्यात, कलावंताच्या अंतर्मुख प्रवृत्तीमधून रागसंकल्पना साकारली गेली असावी. म्हणून एच्. जे. कलरॉइटर या पाश्चात्त्य अभ्यासकाने म्हटल्याप्रमाणे, पाश्चात्त्य संगीत हे स्वराकृतींची बाह्यरचना, बहिर्शोध असून, रागसंकल्पना अंत:शोध आहे. हे विवचन क्षणभर बाजूला ठेवले, तरी एक गोष्ट निश्चित की, रागसंकल्पना हे भारतीय संगीताचे प्रमुख वैशिष्ट्य आहे; किंबहुना भारतीय संगीत म्हणजेच रागसंगीत, असेही समीकरण मांडता येईल.
संदर्भ :
- Clements, E.The Ragas of Tanjore, London, 1920.
- Danielou, Alain,The Ragas of Northern Indian Music, London, 1968.
- Kaufmann, Walter, The Ragas of North India, Bombay, 1968.
- Prajnananda, Swami, A Historical Study of Indian Music, New Delhi, 1981.
- Sambamoorthy, P. South Indian Music, Book III, IV, Madras, 1963, 1964.
- Sastoi, Subrahmanya S. Ragavibodha of Somanatha, Madras, 1945.
- आचरेकर, बा.गं. भारतीय संगीत व संगीतशास्त्र, मुंबई, १९७४.
- घोष, निखिल; अनु.पारसनीस, मु. रा. राग-तालाची मूलतत्त्वे आणि अभिनव स्वरलेखन पद्धती, मुंबई, १९७२.
- टेंकशे, शंकर अनंत, नव-राग निर्मिती, मुंबई, १९७३.
- टेंकशे, शं. अ. राग वर्गीकरण, मुंबई, १९७४.
- प्रतापसिंह देव, सवाई संगीतसार, पुणे, १९१०.
- भातखंडे, वि. ना. भातखंडे संगीतशास्त्र (हिंदुस्थानी संगीत-पद्धती), भाग १, २, ३, ४, हाथरस, १९५६,१९५७.
- रातंजनकर, श्री. ना. संगीत परिभाषा, पुणे, १९७३.
- शार्ङ्गदेव; अनु. तारळेकर, ग. ह. संगीतरत्नाकर, मुंबई, १९७५.
पहा : #आसावरी थाटातील राग#कल्याण थाटातील राग#काफी थाटातील राग#खमाज थाटातील राग#तोडी थाटातील राग#नाट्यशास्त्र#पूर्वी थाटातील राग#बिलावल थाटातील राग#भाषांगराग#भैरव थाटातील राग#भैरवी थाटातील राग#मारवा थाटातील राग#रागमाला चित्रे#रागमालिका#लक्षणगीत#संगीत, कर्नाटक#संगीत, हिंदुस्थानी#सरगम#सुगम शास्त्रीय संगीत#स्वरसप्तक
समीक्षक : सुधीर पोटे