हिमांशी शेलट : (८ जानेवारी १९४७).भारतीय साहित्यातील प्रसिद्ध गुजराती लेखिका.गुजराती कथासाहित्यात त्यांचे नाव आदराने व अग्रक्रमाने घेतल्या जाते.कथालेखनासह नाटक,ललितनिबंधलेखन,कादंबरी आणि समीक्षा या प्रकारामध्येही त्यांनी योगदान दिले आहे. सुरतमध्ये एका सुशिक्षित कुटुंबात जन्मलेल्या हिमांशी ह्यांनी तेथीलच जीवनभारती या प्रसिद्ध शाळेमध्ये आपले प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेतले.एक सिद्धहस्त पत्रकार आणि विद्वान लेखक असलेल्या आजोबांकडून आणि चोखंदळ वाचक असलेल्या आईकडून त्यांना लेखनाचा वारसा लाभला.यामुळे एक समृद्ध व परिपक्व लेखिका म्हणून त्यांचा विकास झाला.
इंग्रजी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर १९६८ पासून सुरतच्या एम टी बी महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी आचार्य पदवीसाठी विद्याधर नायपॉल यांच्या कादंबरीवर अभ्यासपूर्ण संशोधन केले आहे. गुजराती मधील स्थानिक नियतकालिकांत स्तंभलेखक म्हणूनही त्यांनी कार्य केले. नवनीत या नियतकालिकामध्ये त्यांची पहिली कथा प्रकाशित झाली होती. हिमांशी शेलट यांचे साहित्य : कथासंग्रह : अंतराळ (१९८७), अंधारी गरिमा सफेद टपका (१९९२), ई लोको (१९९७), वार्ता श्रुष्टी सांज नो समय (२००२),पांच वायाका (२००३), खंडनीया मान माथून (२००४) ; प्रवास वर्णन : प्लॅटफॉर्म नंबर चार (१९९८); निबंधसंग्रह : व्हिक्टर नी चकली ओ (२००४) ; कादंबरी : क्यारी मान आकाश पुष्प आने काला पतंगीया (२००६),आथ मो रंग (२०००); समीक्षा : मोनोग्राफ अबाउट सररियलीझम (१९८७), गुजराती कथा साहित्य मी नारी चेतना इत्यादी त्यांची लेखन संपदा प्रसिद्ध आहे. इंग्रजी साहित्यातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले असले तरी त्यांना मातृभाषा असलेल्या गुजराती भाषेची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. मातृभाषेच्या प्रेमापोटी त्यांनी गुजराती भाषेतून विपुल कथा लेखन केले आहे. त्यांच्या कथा लेखनामध्ये त्यांनी तंत्रशुद्धतेला खूप महत्त्व देऊन त्याचे काटेकोर पालन केले आहे. सोबतच तंत्रशुद्धतेचा त्यांनी त्यांच्या अभिव्यक्तीमध्ये अडथळा होऊ दिला नाही.दैनंदिन जीवनातील विषयाला घेऊन लिहिलेल्या त्यांच्या कथा विशेष गाजल्या आहेत. प्रशासकीय असंवेदनशीलतेला बळी पडलेले लोक हा त्यांच्या कथेतील मुख्य विषय आहे.जातीयवाद,राजकीय गुन्हेगारी या निमित्ताने सर्वसामान्यांना येणारी हतबलता आणि भीती त्यांनी त्यांच्या कथांतून मांडली आहे. या विषयांच्या निवेदनातूनही वाचकांची उत्सुकता सतत टिकवून ठेवण्यामध्ये त्या यशस्वी झाल्या आहेत. त्याचे कथासाहित्य हे विविध भाषांमध्ये भाषांतरित झाले आहे.गुजराती लघुकथेला एक वैभवशाली परंपरा निर्माण करण्यामध्येही त्यांचा सिंहाचा वाटा आहे. हिमांशी यांच्या लेखनाची  फक्त प्रादेशिक विभागात नव्हे तर राष्ट्रीय पातळीवरील त्यांची ओळख निर्माण झाली आहे.गाणी आणि ललित कला हा त्यांचा छंद वाखाणण्याजोगा आहे.अनाथ आणि पोरकी झालेली मुले आणि लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या मुली यांच्या पुनर्वसनाचे कामही त्यांनी केले आहे. उमाशंकर जोशी गुजराती साहित्य परिषद पुरस्कार (१९९३),धुमकेतू पुरस्कार (१९९४),गुजराती साहित्य अकादमी पुरस्कार (१९९६), केंद्रीय साहित्य अकादमी पुरस्कार इत्यादी महत्वाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
संदर्भ :