निष्कुळानंद : (जन्म इ. स. १८२२ – मृत्यू इ. स. १९०४).गुजरातमधील स्वामीनारायण संप्रदायाचे साधूकवी. सहजानंदांचे शिष्य. ज्ञाती गुर्जर सुतार. काष्ठ व आरसा कलाकारागिरीत निपुण. वडिलांचे नाव रामभाई, आईचे नाव अमृतबा. निष्कुळानंदांचे साहित्यसर्जन विपुल आहे व ते सर्व मुद्रित स्वरूपात उपलब्ध आहे. जवळजवळ ३००० पदांची रचना त्यांनी केली असे म्हटले जाते. संत-असंत लक्षण वर्णन करीत संतांचा आचारधर्म बोध करणारी चोसठपदी, निष्कुळानंदना पदो या त्यांच्या रचनेतून  प्रेमलक्षणाभक्ती, भक्तिवैराग्यबोध , मुग्ध शृंगारभाव, लोकजीवनातील विविध रंग या बाबी प्रकर्षाने प्रकट होतात . त्यांच्या दीर्घ कृतीत अनेक कृती सहजानंद स्वामींचे चरित्रचित्रण करणाऱ्या आहेत. पूर्वछाया, चोपाई आणि देशीबंधात रचलेले भक्तचिंतामणी, ५५ प्रकार नामक खंडात विभागलेले पुरुषोत्तमप्रकाश, हरिस्मृति इ. चरित्रातून सहजानंदांच्या जीवनातील अनेक प्रसंग, प्रवृत्ती, ग्रंथलेखन, धर्मकार्य, लोकसंघटन यांचे तपशीलवार चित्रण आले आहे. त्याचबरोबर पौराणिक कथाकथनाचा आश्रय घेणाऱ्या त्यांच्या ४ कृती आहेत. ध्रुव, प्रल्हाद इ. भक्तांचा कष्टप्रद मार्ग व त्याचा धैर्यपूर्वक सामना करताना दाखवलेली सहनशीलता कथन करणारे धीरजाख्यान; वचन बद्धता, त्याचे परिणाम रामावतार, कृष्णावतारातून दृष्टांतरूपाने कथन करणारे वचनविधी; भागवतातील उद्धवसंदेश प्रसंगरूपाने आलेखित करणारी स्नेह-गीता ही कृती; श्रीहरिचे ३१ अवतार, कर्मे विशद करणारी अवतार चिंतामणी या त्यांच्या रचना प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर यमदंड, मनगंजन, सारसिद्धी, हृदयप्रकाश, भक्तिनिधि,कल्याणनिर्णय ,अरजीविनय, गुणग्राहक इ. अनेक कृतीतून संयम नियमनाचे महत्त्व, अन्त:करणशुद्धी, भक्तिच्या विविध अंगांची तात्त्विक चर्चा, आत्मा परमात्मा संबंध, संतसेवा, भक्ति-वैराग्य  इ. चा बोध करण्यात आला आहे. याशिवाय हरिविचरण ही सहजानंदांच्या प्रत्येक विचरणाचे वर्णन करणारी त्यांची हिंदी रचनाही आहे.

 

संदर्भ :

  • मावजी, शेठ लक्ष्मणदास,( प्रका.),निष्कुळानंदकाव्य, इ. स. १९१२.

प्रतिक्रिया व्यक्त करा