वैशिष्ट्यपूर्ण अशी भारतीय रागसंकल्पना, रागतत्त्वाचा जो पद्धतशीर विकास झाला त्यांतून निरनिराळ्या अवस्थांमधून परिवर्तित झाली आणि तिचे लक्ष्यस्वरूप निर्माण झाले. आजमितीला रागांची जी प्रमुख लक्षणे किंवा तत्त्वे मानली जातात, त्यांचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे.
रागनिर्मितीसाठी आवश्यक असे पहिले तत्त्व किंवा लक्षण म्हणजे थाट. थाट म्हणजे ज्यातून राग निर्माण करता येतो अशी स्वररचना. ‘मेल: स्वरसमूहोऽ स्यात् रागव्यंजनशक्तिमान्’ अशी मेल या संकल्पनेची व्याख्या केली आहे. थाट म्हणजे ज्यातून राग निर्माण करता येईल अशी स्वरांची रचना. थाट हा नेहमी संपूर्ण म्हणजे ७ स्वरांनी युक्त असा असतो. म्हणजे ‘सारेगमपधनिसा’ याप्रमाणे सातही स्वर त्यात असलेच पाहिजेत. अर्थात हिंदुस्थानी संगीतात सात शुद्ध व पाच विकृत स्वर मिळून बारा स्वरांचे असे सप्तकाचे क्षेत्र मानले गेल्यामुळे, गणित पद्धतीने या बारा स्वरांतून निरनिराळ्या पद्धतीने सात-सात स्वरांच्या अशा बत्तीस स्वररचना निर्माण होऊ शकतात. या बत्तीस स्वररचना म्हणजे थाट होत. कर्नाटक पद्धतीमध्ये स्वरांची संख्या एका सप्तकात बारा स्वीकारली गेली असली, तरी त्यांची नावे भिन्नभिन्न असल्यामुळे त्यांनी ७२ मेल वा थाट निर्माण करून त्या आधारावर रागरचना केली आहे.
परंतु एक गोष्ट मात्र निश्चित की, रागनिर्मितीस आवश्यक असे तत्त्व थाट हे आहे. थाट हा निश्चित झाल्यावर या थाटातील स्वरांमधून निरनिराळ्या तऱ्हेने रचना करून रागनिर्मिती करता येते. रागनिर्मितीस कमीतकमी पाच स्वर आवश्यक आहेत, असा नियम आहे. चार स्वरांचा राग होऊ शकत नाही. पाच स्वर घेणाऱ्या रागांना ‘ओडव’ जातीचे राग मानतात. अशा तऱ्हेने ‘ओडव’ (पाच स्वरांचा), ‘षाडव’ (सहा स्वरांचा), ‘संपूर्ण’ (सात स्वरांचा) अशा रागांच्या जाती मानल्या आहेत. स्वरांच्या वर्ज्यावर्ज्यतेवरून या जाती सिद्ध होतात. त्यांतून पुन्हा आरोहात अमुक स्वर व अवरोहात अमुक स्वर वर्ज्य अशा पद्धतीने ओडव-ओडव, ओडव-षाडव, ओडव-संपूर्ण, षाडव-ओडव, षाडव-संपूर्ण, षाडव-षाडव वगैरे पद्धतीने रागांच्या एकंदर नऊ जाती सिद्ध होतात. जाती हे रागांचे दुसरे महत्त्वाचे आणि आवश्यक लक्षण आहे.
रागांचे तिसरे लक्षण म्हणजे रागामध्ये येणाऱ्या स्वरांना विशिष्ट प्रमाणात महत्त्व असणे, हे होय. जो स्वर सर्वात महत्त्वाचा असतो, त्यास ‘वादी’ किंवा राजा-स्वर असे मानतात. त्याच्या खालोखाल महत्त्वाचा स्वर ‘संवादी’ किंवा प्रधान-स्वर म्हणून ओळखला जातो. इतर स्वरांना ‘अनुवादी’ म्हणतात व रागास शत्रूसमान असणारा स्वर ‘विवादी’ मानला जातो. सामान्यत: वादी-संवादी स्वर हे एकमेकांच्या षड्ज-पंचम किंवा षड्ज-मध्यम भावांत असतात आणि सारेगमप आणि मपधनिसा असे सप्तकाचे दोन अर्थ मानले गेले, तर वादी-संवादी हे वेगवेगळ्या सप्तकार्धात असतात. वादी स्वर ज्या सप्तकातील असेल त्यावरून त्या रागाला पूर्वांग राग किंवा उत्तरांग राग असे म्हणतात.
या व्यतिरिक्त रागाचे अत्यंत महत्त्वाचे लक्षण म्हणजे ‘पकड’ हे होय. प्रत्येक रागात असा एक विशिष्ट स्वरसमुदाय असतो, की ज्यामुळे तो राग ओळखला जातो. प्राचीन रागव्याख्येत ‘ध्वनिविशेषस्तु’ म्हणून जो उल्लेख आहे, तीच स्वररचना ‘पकड’ म्हणून आजच्या काळात मानता येईल. ही विशिष्ट स्वरसंगती, विशिष्ट कणयुक्त स्वरांनी बनलेली असते आणि ती आढळली तरच रागाचे स्वरूप स्पष्ट होते. या पकडीचे महत्त्व हिंदुस्थानी संगीतात पराकोटीचे असते. ही विशिष्ट पकड विशिष्ट कणस्वर, स्वरांची सुरुवात व त्यांचा विराम-न्यास-अपन्यास ही तत्त्वे−यांवर अवलंबून असते, म्हणूनच रागांचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व उभे करते. या पकडीव्यतिरिक्त, काही विशिष्ट स्वरसंगती याही रागाचे एक लक्षण मानण्यात येते. कारण त्यांवाचून राग संपूर्ण व्यक्त होत नाही. सध्या रागनिर्मितीस आवश्यक आणि रागस्वरूपे व्यक्त करणारी तत्त्वे ही अशी आहेत.
संदर्भ :
- Clements, E. The Ragas of Tanjore, London, 1920.
- Danielou, Alain, The Ragas of Northern Indian Music, London, 1968.
- Kaufmann, Walter, The Ragas of North India, Bombay, 1968.
- Prajnananda, Swami, A Historical Study of Indian Music, New Delhi, 1981.
- Sambamoorthy, P. South Indian Music, Book III, IV, Madras, 1963, 1964.
- Sastoi, Subrahmanya S. Ragavibodha of Somanatha, Madras, 1945.
- आचरेकर, बा.गं. भारतीय संगीत व संगीतशास्त्र, मुंबई, १९७४.
- घोष, निखिल; अनु.पारसनीस, मु. रा., राग-तालाची मूलतत्त्वे आणि अभिनव स्वरलेखन पद्धती, मुंबई, १९७२.
- टेंकशे, शंकर अनंत, नव-राग निर्मिती, मुंबई, १९७३.
- टेंकशे, शं. अ. राग वर्गीकरण, मुंबई, १९७४.
- प्रतापसिंह देव, सवाई संगीतसार, पुणे, १९१०.
- भातखंडे, वि. ना., भातखंडे संगीतशास्त्र (हिंदुस्थानी संगीत-पद्धती), भाग १, २, ३, ४, हाथरस, १९५६,१९५७.
- रातंजनकर, श्री. ना., संगीत परिभाषा, पुणे, १९७३.
- शार्ङ्गदेव; अनु. तारळेकर, ग. ह., संगीतरत्नाकर, मुंबई, १९७५.
#आसावरी थाटातील राग#कल्याण थाटातील राग#काफी थाटातील राग#खमाज थाटातील राग#तोडी थाटातील राग#नाट्यशास्त्र#पूर्वी थाटातील राग#बिलावल थाटातील राग#भाषांगराग#भैरव थाटातील राग#भैरवी थाटातील राग#मारवा थाटातील राग#रागमाला चित्रे#रागमालिका#लक्षणगीत#संगीत, कर्नाटक#संगीत, हिंदुस्थानी#सरगम#सुगम शास्त्रीय संगीत#स्वरसप्तक
समीक्षक : सुधीर पोटे