मत्तविलास : संस्कृत नाटक. पल्लव वंशीय राजा महेन्द्रविक्रम वर्मा रचित मत्तविलास हे प्रहसन सर्वात प्राचीन समजले जाते. साधारणपणे महेन्द्रविक्रम वर्माचा काळ हा सातव्या शतकाच्या सुरुवातीचा मानला जातो. महेन्द्रविक्रम वर्मा हा पल्लववंशीय राजा सिंहविष्णुवर्मा याचा पुत्र असल्याचे निर्देश मिळतात. सिंहविष्णुवर्माचा कालावधी इ. स. ५७५ ते इ. स. ६०० असा ओळखला जातो. सिंहविष्णुवर्मानंतर लगेचच पुत्र राजा महेन्द्रविक्रम वर्मा गादीवर आला. महेन्द्रविक्रम वर्माचा कालावधी हा इ. स. ६०० ते इ. स. ६३० असल्याचे विद्वानांचे म्हणणे आहे. मामण्डूर येथील शिलालेखात भगवदज्जुकमत्तविलासादि असा उल्लेख मिळाल्याने मत्तविलास या प्रहसनाबरोबरच भगवदज्जुकीय हे प्रहसन देखिल महेन्द्रविक्रम वर्माचीच साहित्यकृती असल्याचे म्हणले जाते.
महेन्द्रविक्रम वर्मा हा अत्यंत सुयोग्य शासक होता तसेच संस्कृत साहित्यातील मर्मज्ञ, अत्यंत बुद्धिवान, दानशील, पराक्रमी आणि अत्यंत विनयशील होता. त्याच्यामधील बरेचसे गुण मत्तविलास या प्रहसनामध्ये दिसतात. तो आपल्या राज्यातील कला कौशल्यांचा, गुणांचा आदर करत असे त्यामुळे त्याला गुणभर अशा नावाने संबोधित केल्याचे दिसते. उत्तम संगीतज्ञ असलेल्या या राजाने दक्षिणचित्र या संगीत विषयक ग्रंथाची रचना केल्याचेही उल्लेख मिळतात; परंतु हा ग्रंथ कुठेही उपलब्ध नाही.
मत्तविलास या प्रहसनामध्ये त्या काळातील सामाजिक स्थितीचे चित्रण केले गेले आहे. विप्र, संन्यासी यांच्या माध्यमातून हास्य रस दाखवला गेला असल्याने हे शुद्ध प्रहसन म्हणून ओळखले जाते. त्याकाळातील शैव धर्माचा होत असलेला उत्कर्ष त्याचबरोबर बौद्ध धर्माचा होत असलेला ह्रास यात चित्रित केला आहे. दोन्ही धर्मातील काही चालीरीतिंवर, संवादातून तर क्वचित प्रसंगी आचरणातून टिपणी करत हास्यरसाची निर्मिती केली आहे. देवसोमेला बघून शाक्य भिक्षूचे मोहित होणे हे त्याचेच सूचक असावे.
प्रहसनाच्या सुरुवातीलाच कपाली एका स्त्रीसह प्रवेश करतो. पूर्ण काञ्चीपुरी नगरामध्ये ते दोघेही मदिरापान करून भ्रमण करत आहेत अशीच कथानकाची सुरुवात होते. या दोन्ही पात्रांच्या माध्यमातून प्रहसनाचा मुख्य विषय फ़ुलवला गेला आहे.अति मदिरापानामुळे त्यांचा तोल ढासळू लागतो. त्यामुळे त्यांचे वागणे, बोलणे विनोद निर्माण करते. स्वतः महेन्द्रविक्रम वर्माने बौद्ध धर्म सोडून शैव धर्माचा अवलंब केला होता. त्यामुळे त्याची प्रजा देखील त्याच मार्गावर गेली असायची शक्यता असल्याचे या प्रहसनातून प्रतीत होते.
या दोन्ही पात्रांबरोबर अजून एक तिसरे पात्र आहे ते आहे शाक्य भिक्षूचे. या भिक्षूच्या प्रवेशानंतर हास्य रस प्रभावीपणे मांडण्यात लेखकाला यश आले आहे. या प्रहसनाच्या निर्मितीच्या वेळी समाज स्थिती ही कशी होती, हे अत्यंत योग्य शब्दात मांडले आहे. पात्रांच्या तोंडची वाक्ये, क्वचित प्रसंगी एखादी घटना, तसेच वेषभूषा यांच्या माध्यमातून रचलेले राजा महेन्द्रविक्रम वर्माचे हे प्रहसन हे निश्चितच हास्य रसाला प्राधान्य देणारे ठरते.
संदर्भ : उन्नी, एन.पी., मत्तविलासप्रहसनम्, नाग पब्लिशर्स, नवी दिल्ली, १९९८.
समीक्षक : सुनीला गोंधळेकर