प्रसन्नराघवम् : रामकथेवर आधारित सात अंकी संस्कृत नाटक. नाटकाचा कर्ता जयदेव. तुलसीदासांच्या रामचरितमानसामध्ये नाटकातील अनेक पद्य जशीच्या तशी स्वीकारली आहेत. तर भवभूतीच्या उत्तररामचरिताचा या नाटकावर प्रभाव दिसून येतो. नैषधीयचरितकर्ता श्रीहर्षाचा उल्लेख जयदेवाने केलेला आहे. श्रीहर्षाचा काळ १२व्या शतकाचा उत्तरार्ध समजला जातो. शार्ङ्गधर पद्धती (इ.स.१३६३) आणि १६व्या शतकातील अलङ्कार शेखर या कृतींमध्ये प्रसन्नराघवचे उल्लेख मिळतात. यावरून या नाटकाचा काळ १२ते १३ वे शतक असावा. जयदेव स्वतःचा निर्देश कौण्डिन्य गोत्री असा करतो, यावरून तो विदर्भातील कौंडिण्यपूरचा रहिवासी असावा. गीतगोविन्दकार जयदेव आणि प्रसन्नराघव कर्ता जयदेव हे एक नसल्याचे अभ्यासकांचे मत आहे. ११व्या शतकात वङ्गदेशात राज्य करणाऱ्या लक्ष्मणसेन राजाच्या शिलालेखात गीतगोविन्दकार जयदेवाचे नाव प्रामुख्याने आढळते. गीतगोविन्दमध्ये जयदेव त्याच्या काळातील इतर कवींचाही उल्लेख करतो, यावरून ११-१२वे शतक हा गीतगोविन्दकार जयदेवाचा काळ असला पाहिजे. म्हणजे प्रसन्नराघव कर्ता जयदेव वेगळा असावा असे लक्षात येते.

पहिल्या अंकामध्ये राजा जनक कन्येसाठी स्वयंवर आयोजित करतो. रूप पालटून रावण प्रवेश करतो. बाणसूरही पोहोचतो. अहंकाराने उन्मत्त होऊन, सीता ही आपलीच होणार या इराद्याने रावण शिवधनुष्य उचलायचा प्रयत्न करतो. परंतु त्या दोघांनाही ते शक्य होत नाही. दुसऱ्या अंकात विश्वामित्र, राम, लक्ष्मण मिथिलेत प्रवेश करतात. उपवनामध्ये श्रीरामांच्या कानावर नूपुरांचे मंजूळ स्वर पडतात. परक्या स्त्रीला पाहणे उचित ठरणार नाही, असे वाटत असतानाच ती राजकुमारी असल्याचे समजते. झाडाआडून सीतेचे सौंदर्य न्याहाळत असताना सीतेलाही त्यांचे दर्शन होते. हा अतिशय हळूवार प्रसंग श्रीराम आणि सीतेमध्ये नाजूक बंध विणतो.

तिसऱ्या अंकात श्रीराम आणि लक्ष्मण विश्वामित्र ऋषींबरोबर जनकाच्या दरबारी येतात. शिवधनुष्य भंगाचा पण श्रीराम जिंकतात. सीतेशी त्यांचे स्वयंवर होते. चौथ्या अंकात श्रीरामांनी धनुष्य भग्न केल्यामुळे परशुराम क्रोधित होतात. श्रीरामांविरुद्ध लढण्यासाठी सज्ज होतात. श्रीराम त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा उद्धटपणे परशुराम गुरु विश्वामित्र यांच्याविषयी अभद्र बोलतात. पाचव्या अंकात कैकेयी भरताला राज्याभिषेक करून श्रीरामांना वनवासाला पाठविण्यासाठी गळ दशरथाला घालते. श्रीराम वनात जायला निघतात. सीता व लक्ष्मण देखिल वनात प्रस्थान करण्यास निघतात. हा अंक शूर्पणखेचे नाक कापणे, दशरथाचा पुत्रवियोगाने मृत्यू, सीतेचे अपहरण इत्यादी प्रसंगांनी चित्रित केला आहे. सहाव्या अंकात रावण सीतेशी कसा वागतो, हनुमान सीतेशी काय संवाद साधतो लंकेतील हा वृत्तांत विद्याधराने रचलेल्या इन्द्रजालाने श्रीराम आणि लक्ष्मण पाहू शकतात. त्रिजटा ही राक्षसीण काय घडले ते सीतेला सांगते. शेवटच्या सातव्या अंकात घनघोर युद्ध होऊन रावण पराभूत होतो. सीतेची सुटका होते. सुग्रीव आणि बिभिषणाला राज्य मिळते. श्रीराम, सीता, लक्ष्मण, सुग्रीव आणि बिभीषण पुष्पक विमानातून अयोध्येत प्रवेश करतात.

प्रसन्नराघव मधील श्रीरामचंद्र हे धीरोदात्त नायक आहेत. पुलस्त्य कुळात जन्मलेला रावण म्हणजे अहंकार आणि दुर्वर्तन याचे भांडार आहे. नाटकाकाराने त्रिलोकामध्ये उत्कृष्ट, देवांनाही पराजित करणारा योद्धा म्हणून  श्रीरामांची ख्याती सांगितली आहे. श्रीरामांप्रती निर्व्याज भक्ती असणारा धाकटा बंधू लक्ष्मण बिभिषणावर आलेला बाण आपल्या अंगावर घेतो. १४ वर्षे वनवास, दुःखी झालेल्या श्रीरामांना सांभाळून घेण्याचे त्याचे धैर्य प्रशंसनीय आहे.

जयदेवाच्या काळातील संस्कृत विद्वान न्यायशास्त्रात देखील प्रवीण पाहिजे ह्या विचारामुळे जयदेवाने स्वतःला ‘प्रमाणप्रवीण’ म्हटले आहे. सुकुमार शब्दरचनेने युक्त हे रीतिप्रधान नाटक आहे. सरस आणि अर्थपूर्ण वाक्यांबरोबरच शब्दांची वक्रता आणि कठिणता असूनही शब्दांच्या कोमलतेला हानी पोहोचत नाही.नाटकात कुठेकुठे क्वचित अवास्तविकता, अस्वाभाविकता दिसून येते. भुंगे-नदी, पक्ष्यांमधील संवाद असे प्रसंग थोडा रसभंग करतात. इन्द्रजाल, अभिचारिक शक्ति, चन्द्रोदय-सूर्योदयाचे दैत्याकार वर्णन असे प्रसंगही कथेचा ओघ नाहीसा करतात. असे असले तरीही  प्रसाद, माधुर्य, सुकुमारता आणि कांती ही प्रमुख वैशिष्ट्ये या नाटकाच्या निवेदनातून दिसून येतात.

संदर्भ : त्रिपाठी, रमाकांत, प्रसन्नराघवम्, चौखम्बा अमरभारती प्रकाशन, वाराणसी, १९७७.

समीक्षक : नीलिमा पटवर्धन