नेमन, जे. (१६ एप्रिल १८९४ – ५ ऑगस्ट १९८१)

नेमन जेर्झी यांचा जन्म रशियन साम्राज्यातील बेन्दर (Bender) या शहरामधील एका पोलिश कुटुंबात झाला. Kamieniec Podolski Gubernial Gymnasium for Boys या शिक्षण संस्थेतून ते पदवीधर झाले. त्यांनी खारकॉव्ह (Kharkov) विद्यापीठात आपले पुढील शिक्षण घेतले. तेथे त्यांना रशियन संभाव्यता शास्त्रज्ञ सेर्गेई बर्नस्टाइन (Sergei Bernstein) यांनी शिकवले. हेन्री लेब्स्गुये (Henri Lebsgue) यांचे संकलनावरचे पाठ (lessons on integration) आणि आदिम फल (primitive function) यावरचे संशोधन वाचल्यावर नेमन हे संकलन आणि मान (measure) या विषयाकडे आकर्षित झाले.

शेतीमधील प्रयोगांसाठी संभाव्यता सिद्धांताचा उपयोग या प्रबंधावर पोलंडमधील वॉर्सा (Warsaw) विद्यापीठातून नेमन पीएच.डी. झाले. नेमन यांनी त्यानंतर त्यांना मिळालेल्या छात्रवृत्तीचा उपयोग लंडनमध्ये एगॉन पिअर्सन (Egon Pearson) आणि पॅरीसमध्ये एमिले बोरेल (Emile Borel) यांच्यासोबत संख्याशास्त्र शिकण्यासाठी केला. पोलंडला परतल्यावर नेमन यांनी वॉर्सा येथील नेन्च्की प्रायोगिक जीवशास्त्र संस्थेमध्ये (Nencki Institute of Experimental Biology) जीवसंख्याशास्त्र (Biometric) प्रयोगशाळा सुरू केली. नेमन अमेरिकतील बर्कले (Berkeley) येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात (University of California) प्राध्यापक म्हणून आले आणि त्यांनी आपले उर्वरित आयुष्य तेथेच व्यतीत केले. नेमन यांच्या मार्गदर्शनाखाली ३९ जणांना पीएच.डी. पदवी मिळाली.

नेमन यांचे महत्त्वाचे योगदान म्हणजे त्यांनी यादृच्छिक प्रयोगाची (random experiment) संकल्पना मांडली आणि तिचा विकास केला. तसेच रॉयल संख्याशास्त्र मंडळासमोर (Royal Statistical Society) प्रातिनिधिक पद्धतींची (Sampling Methods) स्तरीत नमुना निवड (Stratified Sampling) आणि सहेतुक नमुना निवड (Purposive Sampling) या दोन बाजू दाखविणारा शोधनिबंध सादर केला. यामुळे आधुनिक शास्त्रीय नमुना निवडीचा पाया घातला गेला.

नेमन यांनी संख्याशास्त्रीय परिकल्पना चाचणीमध्ये (hypothesis testing) निष्फळ परिकल्पना (null hypothesis) आणि विश्वास अंतराळ (confidence interval) या संकल्पना सर्व प्रथम मांडल्या. नेमन आणि एगॉन पिअर्सन यांनी विकसित केलेले साहाय्यक प्रमेय (lemma) परिकल्पना चाचणीमध्ये अतिशय महत्वाचे ठरले. हे साहाय्यक प्रमेय परिकल्पना चाचणीची संख्याशास्त्रीय प्रबलता (statistical power) दाखवते. ही प्रबलता म्हणजे पर्यायी परिकल्पना सत्य असताना निष्फळ परिकल्पना नाकारणे, हे चाचणी बरोबर दाखवत असल्याची संभाव्यता असते (this power is the probability of rejecting the null hypothesis rightly, when the alternative hypothesis is true). त्याशिवाय निष्फळ परिकल्पना नाकारणे यासाठी इष्टतम त्यजन क्षेत्र (rejection region) निवडण्यास, नेमन-पिअर्सन प्रमेय मार्गदर्शन करते. नेमन यांनी एगॉन पिअर्सन यांच्यासोबत परिकल्पना कसोटी (hypothesis testing) या विषयाचा विस्तार करणारे अनेक महत्त्वाचे शोधलेख प्रसिद्ध केले.

नेमन यांच्या कामाचा दूरगामी परिणाम संख्याशास्त्राबाहेरील अनेक क्षेत्रांत झाला आहे, जसे की अर्थशास्त्रात जमिनीचे मूल्य निर्धारित करणे (land economics), किंमती माहीत असल्यास ग्राहकाचे मागणी फल काढणे (consumer theory), इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीमध्ये विशेषत: रडार, अंकीय संदेशन संहती (digital communication systems) व संकेत प्रक्रियेच्या संहती (signal processing systems) यांची आखणी तसेच उपयोग आणि भौतिकशास्त्रात प्रोटॉनसंबधीच्या नव्या प्रतिकृतीं तपासणे. त्याशिवाय नेमन यांनी अमेरिकेतील अन्न व औषधे खाते त्यावेळी वापरत असलेल्या चाचण्यांसाठी मार्गदर्शक पद्धती तयार केल्या.

नेमन यांनी संख्याशास्त्रावर अनेक पुस्तके लिहिली. त्यांतील काही महत्त्वाची पुस्तके पुढीलप्रमाणे : १. Lectures and Conferences on Mathematical Statistics and Probability, १९५२. २. Bernoulli 1713, Bayes 1763, Laplace 1813: Anniversary Volumes, १९६५. ३. Mathematical Statistics and Probability: Darwinian, Neo-Darwinian and Non-Darwinian Evolution, १९७२.

नेमन यांना रॉयल संख्याशास्त्र मंडळाचे गाय सुवर्णपदक तसेच अमेरिकेचे राष्ट्रीय पदकाने सन्मानित करण्यात आले.

संदर्भ :

                                                                                               समीक्षक : विवेक पाटकर