रागरचना व रागसंकल्पना हे भारतीय संगीताचे वैशिष्ट्यपूर्ण लक्षण असल्यामुळे हिंदुस्थानी व कर्नाटक या दोन्ही संगीतपद्धतींत रागरचना महत्त्वाची आहे. परंतु रागाच्या अभिव्यक्तिच्या आणि लक्षणांच्या बाबतींत काही फरक आढळतो, तो तपासला तर या दोन्ही पद्धतींच्या रागांमध्ये साम्य-भेद आढळतात, हे दिसून येते.
थाट, जाती, पकड, वादी वगैरे रागलक्षणांपैकी काही विशेष लक्षणांवर भर दिल्यामुळे उत्तर हिंदुस्थानी व कर्नाटक पद्धतींमध्ये रागाच्या अभिव्यक्तिमध्ये फरक पडतो. हिंदुस्थानी संगीतात थाट, पकड व न्यास-अपन्यास या तत्त्वांवर विशेष भर आहे; तर कर्नाटक संगीतात थाट, जाती आणि वादी अर्थात जीवस्वर यांवर विशेष भर आहे. यामुळे एखाद्या ओडव-ओडव जातीच्या रागाचे कर्नाटक संगीतात एकच रूप होईल; तर हिंदुस्थानी संगीतात वेगवेगळ्या स्वरसंगतीमुळे ३ रूपेही होतील. उदा., म आणि न वर्जित अशा सारेगपधसा या शुद्ध स्वरांनी बनलेला ओडव राग कर्नाटक संगीतात ‘मोहनम्’ असा एकच असेल; तर या ओडव रचनेतून हिंदुस्थानी संगीतात भूप, देसकार, जैतकल्याण असे तीन वेगवगळे राग, विशिष्ट पकडीमुळे सिद्ध होतील. थोडक्यात, रागजाती हे कर्नाटक संगीताचे प्रधानतत्त्व; तर पकड हे हिंदुस्थानी संगीताचे खास वैशिष्ट्य आहे.
याशिवाय या दोन पद्धतींमध्ये रागांच्या अभिव्यक्तीमध्ये फरक पडण्याचे कारण, रागांमध्ये प्रयुक्त स्वरांचा विशिष्ट लगाव हे आहे. हिंदुस्थानी संगीतात स्वर सामान्यत: स्थिर लगावाने लागतो; तर कर्नाटक संगीतात स्वर सामान्यत: गमकयुक्त आणि हलणारा असा असतो. गमकांचा प्रयोग हिंदुस्थानी संगीतातही आहे, पण त्याचा वापर मर्यादित स्वरूपाचा आहे; तर कर्नाटक संगीतात गमकयुक्त स्वरलगाव हे प्रमुख तत्त्व आहे. यामुळे एकच राग असला, तरी या दोन पद्धतींमध्ये त्याची अभिव्यक्ती भिन्न तऱ्हेने होते.
राग संकल्पना एकच असली, तरी अभिव्यक्तीमध्ये आणि रागगायनामध्ये फरक पडण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण असे दिसते, की कर्नाटक पद्धतीमध्ये सप्तकातील स्वरांची पहिली अवस्था ही शुद्ध व त्या व्यतिरिक्त स्वर हा विकृत, अशी परिभाषा आहे. म्हणून कर्नाटक शुद्ध रे, हा हिंदुस्थानी कोमल रे असतो. म्हणजे सध्या हिंदुस्थानी शुद्ध सप्तक सारेगमपधनीसा हे बिलावल सदृश असून कर्नाटक संगीताचे शुद्ध सप्तक सारे रे म पध ध सा हे कनकांगी सदृश आहे. ज्याला कर्नाटक संगीतात सा रे ग म पध नी सा असेच म्हटले जाते. या स्वरनावांच्या भेदामुळेही दोन पद्धतींतील राग वेगळे संबोधले जातात. उदा., जोगिया आणि शुद्ध सावेरी वगैरे.
या शिवाय कर्नाटक संगीतात आणि हिंदुस्थानी संगीतात रागाभिव्यक्तीसाठी योजिलेले गीतप्रकार हे भिन्न स्वरूपाचे असल्यामुळेही एकाच रागाचा वेगवेगळा आविष्कार आढळतो. आणखी एक गोष्ट म्हणजे, कर्नाटक संगीतात राग व समय यांचा संबंध आवश्यक नाही; तर हिंदुस्थानी संगीतात परंपरेनुसार राग व समय यांचा संबंध मानला गेला आहे. या बाबींपुरता कर्नाटक संगीतात व हिंदुस्थानी संगीतात वेगळेपणा आढळला; तरी रागसंकल्पना, तिच्यामागचा विचार, या संकल्पनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी या दोन्ही संगीतपद्धतींमध्ये सारखीच आहे. एवढेच नव्हे तर, हिंदुस्थानी संगीताचा व कर्नाटक संगीताचाही आधारस्तंभ संगीतरत्नाकर हा एकच आहे.
संदर्भ :
- Clements, E.The Ragas of Tanjore, London, 1920.
- Danielou, Alain,The Ragas of Northern Indian Music, London, 1968.
- Kaufmann, Walter, The Ragas of North India, Bombay, 1968.
- Prajnananda, Swami, A Historical Study of Indian Music, New Delhi, 1981.
- Sambamoorthy, P. South Indian Music, Book III, IV, Madras, 1963, 1964.
- Sastoi, Subrahmanya S. Ragavibodha of Somanatha, Madras, 1945.
- आचरेकर, बा.गं. भारतीय संगीत व संगीतशास्त्र, मुंबई, १९७४.
- घोष, निखिल; अनु.पारसनीस, मु. रा. राग-तालाची मूलतत्त्वे आणि अभिनव स्वरलेखन पद्धती, मुंबई, १९७२.
- टेंकशे, शंकर अनंत, नव-राग निर्मिती, मुंबई, १९७३.
- टेंकशे, शं. अ. राग वर्गीकरण, मुंबई, १९७४.
- प्रतापसिंह देव, सवाई संगीतसार, पुणे, १९१०.
- भातखंडे, वि. ना. भातखंडे संगीतशास्त्र (हिंदुस्थानी संगीत-पद्धती), भाग १, २, ३, ४, हाथरस, १९५६,१९५७.
- रातंजनकर, श्री. ना. संगीत परिभाषा, पुणे, १९७३.
- शार्ङ्गदेव; अनु. तारळेकर, ग. ह. संगीतरत्नाकर, मुंबई, १९७५.
#आसावरी थाटातील राग#कल्याण थाटातील राग#काफी थाटातील राग#खमाज थाटातील राग#तोडी थाटातील राग#नाट्यशास्त्र#पूर्वी थाटातील राग#बिलावल थाटातील राग#भाषांगराग#भैरव थाटातील राग#भैरवी थाटातील राग#मारवा थाटातील राग#रागमाला चित्रे#रागमालिका#लक्षणगीत#संगीत, कर्नाटक#संगीत, हिंदुस्थानी#सरगम#सुगम शास्त्रीय संगीत#स्वरसप्तक
समीक्षण : सुधीर पोटे