गुंदेकर, श्रीराम रावसाहेब  : (१२ ऑक्टोंबर १९५५ – १२ जानेवारी २०१८). मराठीतील  ग्रामीण साहित्यिक, समीक्षक, सत्यशोधकी साहित्याचे अभ्यासक, संशोधक, भाष्यकार. बीड जवळील आंबेसावळी येथे एका शेतकरी कुटुंबात जन्म. महात्मा फुले यांच्या विचारांच्या साहित्यप्रभावातून त्यांचे वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व घडत गेले.

गुंदेकर यांची साहित्य संपदा : कथासंग्रहउचल (१९९०), लगाम (१९९९); समीक्षाग्रामीण साहित्यः प्रेरणा आणि प्रयोजन (१९९९), महात्मा जोतिबा फुलेः विचार आणि वाङ्मय- भागः१ आणि २ (१९९२),म. जोतिबा फुलेः साहित्य आणि साहित्यमूल्ये (२००२), सत्यशोधकी साहित्यः परंपरा आणि स्वरूप (२००३); चरित्रग्रंथ : महाराष्ट्राचे शिल्पकार सम्यक क्रांतीचे प्रणेते सत्यशोधक म. जोतिबा फुले (२००४), महात्मा फुले यांची अखंड रचना (२००५), सत्यशोधकी साहित्याचा इतिहासः खंड १: प्रारंभ ते १९२० (२०१०); संपादन : बळीबा पाटील : कृष्णराव भालेकर यांची कादंबरी (१९९८), ढढ्ढाशास्त्री परान्ने : मुकुंदराज पाटील यांची कादंबरी (२००१), देशभक्त लीलासार : मुकुंदराव पाटील यांचे खंडकाव्य (२००३), सत्यशोधकी निबंध (२००१) इत्यादी.

उचल  या कथासंग्रहात शिक्षण, राजकारण, दुष्काळ, सहकारी साखर कारखाना यांच्यात पिचलेला गावगाडा यांचे संघर्षमय जगणे मांडलेले आहे. लगाम  या कथासंग्रहात राजकीय कार्यकर्त्याचे चित्रण येते. कार्यकर्ते विशिष्ट विचाराने भारावलेले असतात, त्यामुळे खोटे, दांभिक, स्वार्थी आणि कार्यकर्त्याचे सोंग घेतलेली माणसे उघडी पडतात. किंबहुना त्यांचा खोटेपणा उघड करणे हा श्रीराम गुंदेकरांच्या कथामधला एक महत्त्वाचा अनुभव असतो. अर्थात कार्यकर्त्यांच्या जगाबरोबर सामान्य माणसांचे एक प्रामाणिक जगही त्यांना आकर्षित करते. म्हणूनच सामान्य माणसांची सुख दुःखे त्यांनी फार समरसून रेखाटली आहेत. शोषण करणारा वर्ग आणि शोषित वर्ग यांच्यातील अंतःसंघर्ष कमालीच्या सामर्थ्याने आणि टोकदारपणे त्यांची कथा टिपते. ग्रामीण साहित्यः प्रेरणा आणि प्रयोजन  या ग्रंथात ग्रामीण साहित्याची प्रेरणा व प्रयोजन या विषयी भाष्य करून ग्रामीण साहित्याची चळवळ, तिचा विकास व भूमिका त्यांनी मांडली आहे. म. फुले यांच्या नाटकाचे विवेचन आणि विविध प्रकारच्या काव्यलेखनाचे स्वरूप त्यांनी त्यांच्या समीक्षात्मक ग्रंथांतून स्पष्ट केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वसामान्य लोकांना जवळ करून राज्य उभे केले. म. फुले यांनी लावलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचा हा अन्वयार्थ गुंदेकरांनी त्यांच्या समीक्षणात्मक लेखनातून स्पष्ट केला. सत्यशोधकांनी जनसामान्यांना आपल्या साहित्याचा नायक बनवले. म्हणून सर्वार्थाने हा साहित्य प्रवाह क्रांतिकारक आहे. वेदना, विद्रोह आणि नकार या प्रेरणा या प्रवाहात आहेत. या सर्वांची मांडणी त्यांनी सत्यशोधक समाजाचा इतिहास लिहिताना केली आहे.

त्यांच्या साहित्य सेवेबद्दल भि.ग. रोहमाने पुरस्कार (१९९०), नरहर कुरूंदकर पुरस्कार (१९९२), सुशील प्रधान बालसाहित्य पुरस्कार (१९९९), महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार (१९९९-२०००), सुदाम सावरकर जनसारस्वत साहित्य पुरस्कार (२००२), सेवाभूमी साहित्य पुरस्कार (२००३) इत्यादी विविध पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. ते अखिल भारतीय सत्यशोधकी साहित्य संशोधन परिषदेचे काही काळ अध्यक्ष होते. सातारा येथे आयोजित सहाव्या सत्यशोधकी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.

संदर्भ :

  • गुंदेकर, श्रीराम रावसाहेब, सत्यशोधकी साहित्याचा इतिहास ,खंड २ (१९२१-१९५० ), लातूर, २०१३.