शैक्षणिक दृष्ट्या मूल्यांकनाचे एक साधन. याला गुणांकन मार्गदर्शिकासुद्धा म्हणता येईल; कारण मूल्य अंकित करणे हे या श्रेणीचे मुख्य कार्य आहे. ज्ञान, संकल्पना, कौशल्य, गुण इत्यादीसंबंधी संपादन किंवा दर्चाचे मोल ठरविण्यासाठी/तपासण्यासाठी रूब्रिक्स मूल्यमापन श्रेणीचा उपयोग केला जातो. प्रत्येक कृती किंवा विहित कार्य यातील अपेक्षित गोष्टी अधोरेखांकित करण्यासाठीसुद्धा याचा वापर होऊ शकतो. रुब्रिक्स मूल्यमापन श्रेणी सामान्यत: विद्यार्थ्यांच्या विविध स्तरावरील कृती आणि गुणधर्म मोजण्यासाठीचे मानक/निकष/उद्दिष्टांशी संबंधित असतात. म्हणूनच प्रगतीचा मार्ग ठरविण्यासाठी हे रूब्रिक्स मूल्यमापन श्रेणी शिक्षक तसेच विद्यार्थी या दोघांसाठीही उपयुक्त ठरते. शिक्षकांना अभ्यासक्रमाची रचना करणे, उपक्रम वा स्वाध्यायासाठी प्रतवारीचे निकष स्थापित करणे आणि विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे/संपादानाचे मूल्यांकन करणे यांबाबतीत रूब्रिक्स मूल्यमापन श्रेणीचा उपयोग होतो; तर विद्यार्थ्यांना एखादा स्वाध्याय/कृती पूर्ण करताना त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे, याची कल्पना देण्यासाठी आणि त्यानुसार स्वयं-मूल्यमापन किंवा सहाध्यायी-समीक्षणासाठी ते उपयुक्त ठरते.

साधारणपणे रूब्रिक्स मूल्यमापन श्रेणी हे कोष्टकाच्या स्वरूपात मांडले जातात. कोष्टकात वेगवेगळ्या निकषांशी संबंधित विधाने मांडलेली असतात. त्यासमोरील रकान्यात प्रगत ते पारंपारिक अथवा ‘पूर्णपणे सहमत’ ते ‘पूर्णपणे असहमत’ अशा श्रेणी असतात. मूल्यमापनकर्ता कोणत्याही एका योग्य श्रेणीची निवड करतो. ज्या गोष्टीचे मापन करावयाचे आहे, त्याचे मानक विधानातून स्पष्टपणे अभिव्यक्त होणे गरजेचे असते. विधाने लांबलचक किंवा संदिग्ध नसावीत; जेणेकरून एकापेक्षा जास्त अर्थ लावता येणे शक्यच होणार नाही. प्रतिसादकांना विधानात वापरलेल्या संज्ञा आणि शब्द तसेच मूल्यमापन श्रेणी आकलनास स्पष्ट आहे का? याची खात्री करून घेण्यासाठी रूब्रिक्स मूल्यमापन श्रेणीची पथदर्शी चाचणी घेता येईल. एखादी संज्ञा स्पष्ट करण्यासाठी व्याख्या अथवा परिभाषा यांचा वापर करता येईल. काही रूब्रिक्स मूल्यमापन श्रेणीत प्रत्येक निवडीसोबत मूल्यांकन देता येतील. उदा., उत्कृष्ट (४), चांगले (३), साधारण/सरासरी (२), चांगले नाही (१) आणि निकृष्ट (०). स्वयंमूल्यमापन रूब्रिक्स खासकरून दूर शिक्षणातील स्वयंअध्ययन करणाऱ्यांना फार उपयुक्त ठरतात.

प्रकार : मूल्यांकन करणारे रूब्रिक्स विविध प्रकारचे असू शकतात. (१) समग्र विरुद्ध विश्लेषक रूब्रिक्स : समग्र अर्थात सर्वांगीण निकालासाठी जसे विद्यापीठांमध्ये सर्व गोष्टींचा एकत्रितपणे विचार करून श्रेणी दिल्या जातात. याउलट, एखादी विशिष्ट गोष्ट, विशिष्ट निकष/पैलुंचा संच सविस्तरपणे मोजमाप करायचे असल्यास विश्लेषक मूल्यांकन रूब्रिक्सचा वापर होतो. जसे की, भाषांचे अध्ययन जेथे शुद्ध लेखन, वाचन, व्याकरण किंवा उच्चारण या सगळ्या गोष्टींचे वेगवेगळे मूल्यमापन केले जाते.

(२) विकासात्मक विरुद्ध संख्यात्मक रूब्रिक्स : एखाद्या क्षमतेच्या विकासाच्या अखंडतेची पातळी मोजण्यासाठी विकासात्मक रूब्रिक्सचा उपयोग करता येतो. उदा., बौद्धिक विकास, अंतर आणि आंतर वैयक्तिक विकास. सर्वसाधारणपणे आकलनासाठीच्या अध्ययनाचे पुरावे सामायिक करता यावेत म्हणून स्पष्ट मानांकन श्रेणी म्हणजे संख्यात्मक रूब्रिक्स होय.

(३) सामान्यीकृत विरुद्ध विशिष्ट रूब्रिक्स : सामान्य रूब्रिक्सद्वारे विविध कार्यासाठी (उदा., लेखन, समस्या निराकरण) एकच निकष लागू करून मूल्यमापन करता येते; तर एकल किंवा एकाच विशिष्ट कार्याचे, विशिष्ट उत्तर अथवा एक विशिष्ट निष्कर्ष काढण्यासाठी विशिष्ट रूब्रिक्स उपयुक्त ठरू शकतात. उदा., ‘वैश्विक मानवी मूल्यांचे शिक्षण’ या संदर्भात तयार केलेले एक विश्लेषणात्मक रूब्रिक दिले आहे.

वर्ग मूल्यमापनाचे निकष म्हणून अध्ययन निष्पत्ति माझी संपादन श्रेणी
माहिती १. मला उद्य व विघटन या दोन समांतर चालणाऱ्या प्रक्रियांमध्ये उदाहरणासहित भेद करता येतो. उत्कृष्ट, चांगली, साधारण, अल्प
२. जागतिक संस्कृती निर्माण करण्यास असमर्थ असलेल्या नेत्याचे काही गुणधर्म मला सांगता येतील. उत्कृष्ट, चांगली, साधारण, अल्प
संकल्पना ३. मी नेतृत्वाच्या पुनर्व्याख्येला आरंभ करू शकते/शकतो. उत्कृष्ट, चांगली, साधारण, अल्प
४. सक्षमता म्हणजे काय, हे मी सांगू शकते/शकतो. उत्कृष्ट, चांगली, साधारण, अल्प
कौशल्ये

 

 

५. जगात बदल घडवून आणण्यासाठी, त्यासंबंधीच्या गुंतागुंतीच्या प्रश्नांचे विश्लेषण करण्यासाठी आवश्यक उच्च विचार कौशल्ये माझ्यात विकसित झालेली आहेत. उत्कृष्ट, चांगली, साधारण, अल्प
६. माझ्या व्यवसायासंबंधीच्या सक्षमता विकासाचे काही घटक मी ओळखू शकते/शकतो. उत्कृष्ट, चांगली, साधारण, अल्प
अभिवृत्ती ७. समाजाबाबत साधे-सोपे उत्तर शोधण्याच्या माझ्या प्रवृत्तीवर मी विजय मिळविला आहे. उत्कृष्ट, चांगली, साधारण, अल्प
८. प्रचलित प्रणालीमधील बरेच आवश्यक परिवर्तन घडवून आणण्याची मी जबाबदारी घेतली पाहिजे आहे, असे मला वाटते. उत्कृष्ट, चांगली, साधारण, अल्प

 

समीक्षक : अनंत जोशी