फिशर, हर्बर्ट ॲल्बर्ट लॉरेन्स : (२१ मार्च १८६५ – १८ एप्रिल १९४०). एक ब्रिटिश इतिहासकार व शिक्षणतज्ज्ञ. लंडन येथील सधन घराण्यात जन्म. विंचेस्टर, न्यू कॉलेज (ऑक्सफर्ड विद्यापीठ), पॅरिस व गटिंगेन (फ्रान्स) येथे शिक्षण घेऊन न्यू कॉलेज येथे १८८९ मध्ये तो प्रथम अधिछात्र व पुढे पाठनिर्देशक झाला. १९१२ ते १९१६ च्या दरम्यान शेफिल्ड विद्यापीठाचा कुलगूरू म्हणून त्याने काम केले. पुढे लिबरल पक्षातर्फे तो ब्रिटिश संसदेवर निवडून आला (१९१६) आणि त्याची काही महिन्यांतच शिक्षणमंत्री म्हणून डेव्हिड लॉइड जॉर्जने आपल्या मंत्रिमंडळात नियुक्ती केली (१९१६–२२). १९१८ साली त्याने कॉम्प्रिहेन्सिव्ह एज्युकेशन ॲक्ट समंत करून घेतला व शिक्षणपद्धतीत उदारमतवादी तत्त्वांवर काही महत्त्वाचे बदल केले.

इतिहासाच्या अभ्यासासाठी तो फ्रान्स, जर्मनी इ. देशांत गेला. १९२० ते १९२२ च्या दरम्यान त्याला राष्ट्रसंघात ग्रेट ब्रिटनचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्याची न्यू कॉलेजचा वॉर्डन (प्रमुख) म्हणून निवड झाली. अखेरपर्यंत तो या पदावर होता.

त्याने इतिहासासंबंधी विपुल लेखन केले. नेपोलियन व त्याचा काळ हा त्याच्या व्यासंगाचा प्रमुख विषय. त्याचा त्याने चिकित्सक अभ्यास केला आणि स्टडीज इन नेपोलियनिक स्टेट्समनशिप (१९०३), बोनापार्टिझम (१९०८) व नेपोलियन बोनापार्ट हे तीन ग्रंथ प्रसिद्ध केले. नेपोलियनविषयी तो काहीसा पूर्वग्रहदूषित असा नापसंतीचा दृष्टिकोन मांडतो. द मेडिईव्हल एम्पायर (२ खंड-१८९८), द हिस्टरी ऑफ इंग्‍लंड : १४८५-१५४० (१९०६), द रिपब्‍लिकन ट्रॅडिशन इन यूरोप (१९११), पोलिटिकल युनियन्स (१९११), व्हिग हिस्टोरियन्स (१९२८), हिस्टरी ऑफ यूरोप (३ खंड-१९३५) हे त्याचे इतर काही ग्रंथ. त्याचा हिस्टरी ऑफ यूरोप  हा ग्रंथ मान्यवर झाला. ब्रिटिश अकादमीचे अध्यक्षपदही त्याने भूषविले (१९२८–३२).

लंडन येथे त्याचे अपघातात निधन झाले.

जर्मन इतिहासकारांनी अवलंबलेली इतिहासलेखनपद्धती त्यास मान्य नव्हती. इतिहासकार म्हणून त्याने राजकीय व धार्मिक घटकांवर आर्थिक बाबींपेक्षा अधिक भर दिला. व्यापक व उदारमतवादी दृष्टिकोनातून इतिहासाकडे पाहावे, असे त्याचे मत होते. अन्‌फिनिश्ड ॲटोबायॉग्रफी हे त्याचे अपूर्ण आत्मचरित्र १९४१ साली प्रसिद्ध झाले.

संदर्भ :

  • Ogg, David, Herbert Fisher: 1865–1940, A short Biography, New York, 1947.