फ्रँको, फ्रॅन्सिस्को : (४ डिसेंबर १८९२ – २० नोव्हेंबर १९७५). स्पेनचा हुकूमशाह आणि सरसेनापती  (१९३९–७५). पूर्ण नाव पाउलि‌नो एर्मेनहेल्दो तेओदेलो. स्पेनच्या गॅलिशिया प्रांतात एल् फरॉल या गावी जन्म. त्याच्या आईचे नाव पिलर बॅहामाँदे व वडिलांचे नाव निकोलस फ्रँको. निकोलस फ्रँको हे नाविक दलात अधिकारी होते. ली आल्काथार (टोलीडो) येथील पायदळ अकादमीत सैनिकी प्रशिक्षणानंतर १९१० मध्ये फ्रँकोची सैन्यात नियुक्ती. १९२३ ते १९२७ या कालखंडात स्पेनच्या मोरोक्को वसाहतीत परदेशी सेनादलाचा प्रथम दुय्यम व पुढे त्या दलाचा सेनापती.

मोरोक्कोत असताना त्याने रिफ जमातीचा अब्द अल्-करीम याच्या नेतृत्वाखाली १९२५ साली झालेला उठाव दडपण्याच्या कारवाईत भाग घेतला. १९२७  ते १९३१ या काळात सॅरगॉसा सैनिकी अकादमीचा तो संचालक होता. तत्कालीन प्रजासत्ताक शासनाने ही अकादमी राजेशाही धार्जिणी असल्याने बंद केली (१९३१). १९३५ साली फ्रँकोला सेनादलाचा (जनरल स्टाफचा) प्रमुख म्हणून नेमण्यात आले. १९३६ साली स्पेनमध्ये समाजवादी प्रजासत्ताक सरकार सत्तेवर आले. त्या सरकारच्या अमदानीत स्पेनची आर्थिक तशीच राजकीय व सामाजिक परिस्थिती चिंताजनक झाली.  ही परिस्थिती काबूत आणण्यासाठी सरकारने आणीबाणी जाहीर करावी, असा सल्ला फ्रँकोने दिला. तथापि त्याचा सल्ला झिडकारण्यात आला. युद्ध पुकारून स्पेनमध्ये सैनिकी उठाव झाला. या उठावाला फ्रँकोने प्रजासत्ताकाविरुद्ध सक्रिय पाठिंबा दिला. त्यामुळे स्पेनमध्ये यादवी युद्ध सुरू झाले. फ्रँकोने राष्ट्रीय सरकार स्थापन केले आणि त्याला इटली व जर्मनी या देशांनी मान्यता दिली. १९३७ साली त्याने स्वतःला स्पेनचा राष्ट्रनेता (एल् काउदिल्यो) म्हणून जाहीर केले. १९३९ साली त्याच्या शासनाला ग्रेट ब्रिटन व फ्रान्स यांनीही मान्यता दिली.

स्पॅनिश यादवी युद्ध १९३९ साली संपले. त्या सालच्या सप्टेंबरमध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाले. प्रारंभी फ्रँकोची सहानुभूती जर्मनी व इटलीकडे होती. जिब्राल्टर व फ्रान्सची मोरोक्को वसाहत बळकावण्याची त्याने एक योजना आखली होती. पुढे मात्र महायुद्धाच्या संदर्भात स्पेनने तटस्थता जाहीर केली.  सोव्हिएट रशियाविरुद्ध  ब्रिटन व जर्मनीने एकजूट करावी, असे मत त्याने प्रतिपादन केले होते. १९४७ साली तहहयात प्रमुख म्हणून फ्रँकोला मान्यताही देण्यात आली. तसेच आपला वारस नेमण्याचा अधिकारही त्यास देण्यात आला.

फ्रँकोने स्पेनच्या अंमलाखालील मोरोक्कोला स्वातंत्र्य दिले. तसेच कायद्याचे सुसूत्रीकरण करून लोकांना धार्मिक स्वातंत्र्य दिले. संयुक्त राष्ट्रे या जागतिक संघटनेतील सदस्यत्वही त्याने स्पेनला मिळवून दिले. तथापि त्याने आपल्या हुकूमशाहीला विरोध करणाऱ्या आचारविचारांवर बंदी घातली होती. स्पेनमध्ये आणि स्पेनच्या ताब्यातील अटलांटिक बेटावर तळ स्थापन करण्यात त्याने अमेरिकेला सवलत दिली व तिच्या मोबदल्यात अमेरिकेकडून आर्थिक मदत मिळवून काही अंशी देशाची आर्थिक स्थिती सुधारली. खासगी जीवनात तो अतिशय कर्मठ होता.  फ्रँकोने कार्मेन पोलो नावाच्या युवतीशी विवाह केला (१९२३). तिच्यापासून त्याला एक मुलगी झाली. त्याचे खासगी जीवन निष्कलंक होते. डायरी ऑफ ए बटालियन  (१९२२) हा त्याचा आठवणीवजा ग्रंथ प्रसिद्ध आहे.

माद्रिद ‌येथे त्याचे हृदयविकाराने निधन झाले.

 संदर्भ : 

  • Crozier, Brian, Franco: a Biographical History, London, 1967.
  • Thomas, Hugh, The Spanish Civil War, Harmondsworth, 1971.
  • Trythall, J. W. D. Franco: a Biography, London, 1970.