अणुकेंद्रीय भौतिकीत वस्तुमानांक [A] तोच परंतु भिन्न अणुक्रमांक [Z] असलेल्या अणूंना समवस्तुमानांक असे म्हणतात. म्हणजेच न्यूक्लिऑनांची (न्यूट्रॉन व प्रोटॉन यांची एकूण; Nucleons) संख्या सारखी असते; परंतु प्रोटॉन (Proton) आणि न्यूट्रॉन (Neutron) यांची संख्या वेगवेगळी असते. उदा., क्लोरीन-37 (Cl-37; Cl^{37})आणि आर्‌गॉन-37 (Ar-37; Ar^{37}) हे समवस्तुमानांक आहेत. क्लोरीन-37 च्या अणुकेंद्रात 17 प्रोटॉन व 20 न्यूट्रॉन असतात. तर आर्‌गॉन-37 च्या अणुकेंद्रात 18 प्रोटॉन व 19 न्यूट्रॉन असतात. आणखी एक उदाहरण म्हणजे ऑक्सिजन (18, Z = 8), फ़्लुओरिन (18, Z= 9) आणि निऑन (18, Z= 10) हे त्रिकूट. स्वाभाविकपणे समवस्तुमानांकांचे रासायनिक व भौतिक गुणधर्म वेगवेगळे दिसतात. कारण वस्तुमान जवळजवळ सारखेच असले, तरी ते अणू निरनिराळ्या मूलद्रव्यांचे असतात.

अणुक्रमांकांमध्ये एक अंकाचा फरक असलेल्या समवस्तुमानांकामधील दोन्ही अणू स्थिर असू शकत नाहीत. अपरिहार्यपणे \beta^- उत्सर्जनाने [Z \to Z + 1], \beta^+ उत्सर्जनाने [Z \to Z - 1] किंवा इलेक्ट्रॉन-प्रग्रहण करून [Z + e^- \to Z] एक अणू दुसऱ्या अणूमध्ये ऱ्हास पावतो. अशा प्रकारे बीटा क्षयात (\beta decay; बीटा ऱ्हास) जनक व अपत्य अणुकेंद्रे नेहमीच समवस्तुमानांक असतात. कारण या प्रक्रियेत एक तर न्यूट्रॉनाचे प्रोटॉनात अथवा प्रोटॉनाचे न्यूट्रॉनात परिवर्तन होते. वस्तुमानांकांच्या [A] बहुतेक मूल्यांच्या बाबतीत किरणोत्सर्गी समवस्तुमानांकांची संख्या स्थिर समवस्तुमानांकांच्या संख्येपेक्षा बरीच जास्त असते.

समीक्षक माधव राजवाडे

प्रतिक्रिया व्यक्त करा