विचारशलाका : सामाजिक शास्त्र संशोधन व समाज विकास प्रतिष्ठान, लातूरचे मुखपत्र म्हणून विचारशलाका या नियतकालिकाची सुरुवात जुलै १९८७ मध्ये झाली. हे नियतकालिक लातूर येथून प्रकाशित होणारे त्रैमासिक असून याचे संस्थापक संपादक नागोराव कुंभार हे आहेत. समाजातील सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सामाजिक सांस्कृतिक सत्तेपासून शतकानुशतके वंचित असलेल्या समूहांच्या समस्यांची चिकित्सा करावी, राष्ट्रीय आणि सामाजिक चळवळी व कार्यकर्त्यांना वैचारिक आधार व दृष्टी द्यावी, सामाजिक शास्त्रांतील मूलभूत संकल्पना व सिद्धांतांची मिमांसा करावी आणि वैचारिक साहित्य वाचणारा जाणकार व चोखंदळ वाचकवर्ग निर्माण करावा, लेखकाला व्यासपीठ मिळावे या हेतूने विचारशलाका हे नियतकालिक प्रकाशित होत आहे.
विचारसंघर्ष आणि विचारकलह यातून वैचारिक जागृती होते हे तत्त्व स्वीकारून या नियतकालिकामध्ये मध्ये सर्व प्रागतिक आणि पुरोगामी विचारांना स्थान दिले गेले आहे. या नियतकालिकाचा प्रत्येक अंक हा विशेषांकच असावा ह्या संपादकीय भूमिकेमुळे अनेक विषयांवर विशेषांक प्रकाशित करण्यात आले आहेत. भारतीय घटनेच्या उद्देशपत्रिकेत जो मूल्यांच्या आकृतिबंध आहे. त्या मूल्यांचा आशय लोकांना समजावा या हेतूने घटनेतील मूल्य आणि तत्त्व यावर भर देऊन ‘न्यायसंकल्पना विशेषांक’ (जुलै-सप्टेंबर १९८७), ‘धर्मनिरपेक्षता विशेषांक’ (ऑक्टोबर-डिसेंबर १९८७), ‘लोकशाही विशेषांक’ (जाने-जून १९८८), ‘समता विशेषांक’ (जुलै-डिसेंबर १९८८) या पद्धतीने भारतीय राज्यघटना अशा विषयांवर साखळीबद्ध पद्धतीने विशेषांक प्रकाशित केले आहेत. भारतीय सामाजिक पुर्नरचनेसाठी आणि भारतीय सामाजिक रचनेसाठी ज्यांनी आयुष्यभर चिंतन केले आणि निष्ठेने आयुष्य वेचले अशा प्रबोधनाच्या प्रमुख प्रवर्तकांना केंद्रस्थानी ठेऊन या नियतकालिकाने विशेषांक काढले आहेत. मराठी वैचारिक साहित्यात या नियतकालिकाने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
संदर्भ : क्षेत्रसंशोधन