आफ्रिका खंडाच्या आग्नेय भागातील एस्वातिनी (स्वाझीलँड) या भूवेष्टित स्वतंत्र राजसत्ताक देशाची प्रशासकीय राजधानी आणि देशातील सर्वांत मोठे शहर. लोकसंख्या ९४,८७४ (२०१० अंदाज). देशाच्या पश्चिम भागातील हायव्हेल्ड प्रदेशातील होहो जिल्ह्यात, एम्बाबाने नदीच्या काठावर हे शहर वसले आहे. होहो जिल्ह्याचेही हे मुख्य ठाणे आहे. ड्रेकन्सबर्ग पर्वतातील मॅडझिम्बा या निसर्गरम्य पर्वतश्रेणीत स. स. पासून १,१४० मी. उंचीवर हे शहर आहे. पर्वतीय प्रदेशात असल्यामुळे येथील हवामान सौम्य व आल्हाददायक आहे. येथील उन्हाळे उबदार व आर्द्र, तर हिवाळे थंड असतात. प्रामुख्याने उन्हाळ्यात येथे पाऊस पडतो.

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरच्या काळात स्वाझी राजा एम्बांदझेनी यांच्या गुरांच्या ‘क्राल’ खेड्याच्या जवळ एम्बाबाने विकसित झाले. स्वाझी जमातीच्या लहान खेडेवजा वस्तीला ‘क्राल’ म्हणतात. क्रालमध्ये मधमाश्यांच्या पोवळ्याप्रमाणे वर्तुळाकार झोपड्या असतात. एम्बाबानेनजीकच्या प्रदेशाचा प्रमुख एम्बाबाने कुनेने यांच्या नावावरून या ठिकाणाला एम्बाबाने हे नाव देण्यात आले. बोअर युद्धातील (१८९९ – १९०२) विजयानंतर ब्रिटिशांनी १९०२ मध्ये स्वाझीलँडचा ताबा घेऊन आपली प्रशासकीय राजधानी म्हणून एम्बाबाने शहराची स्थापना केली. या नगराच्या प्रत्यक्ष स्थापनेचा हा पुरावा गृहीत धरला जातो. ब्रिटिशांनी येथे काही दुकाने, चर्च व विद्यालयांची स्थापना केली. सुरुवातीला प्रामुख्याने प्रशासकीय केंद्र असलेल्या या शहराचा ब्रिटिश राजवटीत (१९०२ – १९६८) आणि देशाच्या स्वातंत्र्योत्तर काळात विशेष विकास घडून आला. येथे गोर्‍या लोकांची सत्ता असताना कृष्णवर्णीय आफ्रिकन लोकांना या शहरात राहण्याची परवानगी नव्हती. शहरालगतच्या खेड्यांमध्ये राहण्याबाबत त्यांच्यावर सक्ती केली जात होती. इ. स. १९६४ मध्ये मोझँबीक लोहमार्ग या शहराजवळ आला. प्रथमत: त्याचा फायदा हायव्हेल्ड प्रदेशातील एन्ग्वेन्या येथील खाणींतील लोहखनिज निर्यातीसाठी झाला; परंतु १९७० च्या दशकाच्या अखेरीस येथील लोहखनिजाचे उत्पादन थांबविण्यात आले.

एम्बाबानेनजीकच्या एन्ग्वेन्या पर्वतातील लायन कॅव्हर्न ही लोहखनिजाची खाण प्रसिद्ध असून या खाणीमुळे या शहराच्या विकासास चालना मिळाली. हे एक प्रमुख व्यापारी केंद्र असून यास १९९२ मध्ये शहराचा दर्जा मिळाला. शहरात प्रामुख्याने बांतूभाषिक स्वाझी लोकांचे अधिक्य आहे. खाणकाम, साखर निर्मिती, फळप्रक्रिया, सौम्य व मादक पेये निर्मिती, पादत्राणे इत्यादींची निर्मिती व प्रक्रिया उद्योग या शहरात व परिसरात आहेत. शहरात अनेक ऐशारामी हॉटेले, मनोरंजनाची स्थळे (उदा., क्लब, गोल्फ खेळाची मैदाने इत्यादी), जुगारगृहे, कलावीथी (१९८२), रोमन कॅथलिक चर्च इत्यादी सुविधा व पर्यटकांची आकर्षण स्थळे असून पर्यटन हा येथील एक प्रमुख व्यवसाय आहे. एम्बाबाने शहराजवळ असलेले गरम पाण्याचे झरे, एम्लिलवानी वन्य प्राणी अभयारण्य आणि मानटेंगा धबधबा ही पर्यटकांची विशेष आकर्षणे आहेत.

समीक्षक : वसंत चौधरी