काळाच्या ओघात अथवा अन्य कारणांमुळे ज्या काही महत्त्वाच्या वनस्पती नष्ट होण्याची भीती आहे, अशा वनस्पतींच्या जाती साठवून – जपून ठेवण्याकडे वैज्ञानिकांचा कल असतो. अन्न, औषधी, वस्त्र व निवारा यांपैकी विशेषतः अन्न पुरविणाऱ्या वनस्पती साठविण्याचा अग्रक्रम युनेस्कोच्या इंटरनॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस (IBPGR) या संस्थेने ठरविला आहे. सर्व देशांतील प्रमुख अन्नधान्ये, फळे-कंदमुळे, यांना या दृष्टीने अग्रणी स्थान दिले गेले आहे. तक्ता क्र. १ वनस्पती जनुक-संपत्ती साठविण्याचा अग्रक्रम दर्शवितो.

बियाणे साठविण्यापूर्वी या वनस्पतींबद्दल जास्तीत जास्त व बिनचूक माहिती गोळा करून त्या त्या बियाणाबरोबरच साठविली जाते. साठविलेले बियाणे भविष्यात रुजवून मिळणाऱ्या पिकाची माहिती, कृत्रिम किंवा जैव-तंत्रज्ञानाद्वारे संकरण केल्यावर प्राप्त होऊ शकणाऱ्या उत्पादनाचा दर्जा व विशिष्ट गुणधर्म यांबद्दल अंदाज बांधण्यासाठी या माहितीचा उपयोग होतो. अशा वर्णनाच्या अनेक वनस्पतींच्या पुस्तिका (Descriptors) प्रसिद्ध झालेल्या असून, त्या IBPGR द्वारा संबंधितांना उपलब्ध केल्या जातात.

तक्ता क्र. १. जनुक-संपत्ती जपण्यासाठी पिकांचा अग्रक्रम :

पीक प्रकार अग्रक्रम १         अग्रक्रम २      अग्रक्रम ३
तृणधान्ये गहू         ज्वारी, बाजरी,        तांदूळ इ. मका
कडधान्ये वाल भुईमूग, चवळी मसूर
कंद, कंदमुळे कसावा, रताळे बटाटा कोनफळ, सुकंद
तेल पिके

ऑईल-पाम, नारळ, मोहरी करडई
इतर कॉफी राजगिरा, वांगे द्राक्षे

वरील पीक यादी सुमारे तीन दशकापूर्वी तयार करून प्रसारित केली गेली. या यादीत काळानुरूप भर घातली जाते किंवा अग्रक्रम बदलला जातो. त्यास अनेक कारणे आहेत ती पुढीलप्रमाणे : १) काही पिकांचे पुरेसे जनुक नमुने गोळा केलेले असल्याने आणखी नमुन्यांची जरुरी उरलेली नसणे, २) दिवसेंदिवस नवनव्या प्रदेशांतून नवनवीन माहिती पुढे येत असणे व ३) हवामानातील बदल आणि वाढणारे तापमान.

तक्ता क्र. २.  जनुक-संपत्ती गोळा करण्यासाठीची पीक यादी (२०१६) :

अळूवर्गीय – अळू, टारो (Aroids) टोमाटो (Tomato)
ओट (Oats) डाळींब (Pomagranate)
कसावा (Casava) नारळ (Coconut)
कापूस (Cotton) बटाटा (Potato)
काबुली चणा (Chick Pea) बाजरी (Pearl Millet)
कॉफी (Coffee) भात (Rice)
केळी (Banana) मका (Maize)
गहू (Wheat) मूग, मसूर (Lentils)
घेवडा (French Bean) याम (Yam)
चराऊ गवत, स्टायलो, लसूणघास इ. (Forages) रताळे (Sweet Potato)
चवळी (Cowpea) रागी, नाचणी, नागली (Finger Millet)
जव (Barley) लाख (Grass Pea)
ज्वारी (Sorghum) स्ट्रॉबेरी (Strawberry)

तापमान वाढीचा कृषिउत्पादनावर अनिष्ट परिणाम विशेषतः उच्च रेखांशावरील प्रदेशात मोठ्या प्रमाणावर होतो, असे दिसून आले आहे. ड्युरम जातीच्या गव्हाचे पीक कमी होत असल्याचे जाणविल्यावर या जातीच्या गव्हाची लागवड अमेरिकेच्या उत्तरेकडील राज्यात आणि कॅनडामध्ये वाढत्या प्रमाणावर करणे हा उपाय सुचविला जात आहे. चांगले उत्पन्न देणाऱ्या उष्णता-सहनशील गव्हाची लागवड अफगाणिस्तान – इराण सीमाप्रदेशांत होत असल्याने या भागातील गव्हाची जनुक-संपत्ती गोळा करण्याचा कार्यक्रम अग्रक्रमाने घेण्यात आलेला असून स्थानिक गव्हाबरोबर संकरित करण्याची योजना आहे. अशी निरनिराळी कारणे विचारात घेऊन तक्ता क्र. २  मध्ये दर्शविल्याप्रमाणे IBPGR ची जनुक-संपत्ती गोळा करण्यासाठी पिकांची नवी यादी (सन २०१६) तयार करण्यात आली आहे.

संदर्भ :

  • Damania, A.B. History, Achievements and Current Status of Genetic Resources Conservation, Agron J. 100 : 9 – 21, 2008.
  • Gupta, Asha (Ed.), Global Warming and Climate Change, Akensha  Publication  House, Delhi, 2015.
  • IBPGR Publ. 2016.
  • Information Booklet of IBPGR, Italy, A UNESCO organization.                                                                                                                                                                                                                                                                                                   समीक्षक : डॉ. बाळ फोंडके