(उपकरण). प्रत्यक्ष अँपिअर या एककात विद्युत् प्रवाह मोजणारा विद्युत् प्रवाहमापक म्हणजेच अँपिअरमापक होय. निरनिराळ्या मर्यादांच्या विद्युत् प्रवाहांकरिता व कमी-जास्त अचूकतेसाठी खालील वेगवेगळ्या प्रकारचे अँपिअरमापक वापरले जातात.
(१) फिरत्या वेटोळ्याचा अँपिअरमापक (Moving-coil Galvanometer) : सर्वसामान्यपणे वापरात असलेल्या या अँपिअरमापकात मृदू लोखंडाच्या अंतरकाभोवती (वेटोळ्याला चिकटणार नाही अशा तऱ्हेने त्यामध्ये ठेवलेल्या लहान गजाभोवती) बारीक व उच्च विद्युत् रोधक तारेचे वेटोळे असते. रत्नांच्या धारव्यांमुळे (बेअरिंगमुळे) हे वेटोळे अंतरकाभोवती मुक्तपणे फिरू शकते. हे वेटोळे कायम स्वरूपाच्या नालाकृती चुंबकाच्या ध्रुवांमधील अरीय (त्रिज्यीय) चुंबकीय क्षेत्रात बसविलेले असते. वेटोळ्याच्या फिरण्याच्या क्रियेवर काशाच्या स्प्रिंगने नियंत्रण ठेवले जाते. विद्युत् प्रवाह वेटोळ्यातून गेला असता वेटोळ्यावर एक घूर्णी परिबल (फिरविणारी किंवा पिरगळणारे बल X फिरण्याच्या अक्षापासून बलाचे लंब अंतर) कार्य करू लागते. कारण विद्युत् प्रवाहामुळे त्याची प्रवृत्ती चुंबकाच्या चुंबकीय रेषांना लंब होण्याची असते. त्यामुळे वेटोळे व त्याला संलग्न असलेला दर्शक काटा विद्युत् प्रवाहाशी सम प्रमाणात असलेल्या कोनातून फिरतात. म्हणून त्या कोनावरून वेटोळ्यातील विद्युत् प्रवाह मोजता येतो.
वेटोळ्यातील बारीक तारेतून वाजवीपेक्षा जास्त विद्युत् प्रवाह गेल्यास ती वितळून जाण्याची भीती असते. म्हणून वेटोळ्याला एक शाखांतर (कमी रोध असलेली व अनेकसरीत जोडलेली जाड तार) जोडलेले असते. त्यामुळे मोजावयाच्या विद्युत् प्रवाहाचा फक्त ठराविक लहान भागच वेटोळ्यातून जातो व राहिलेला मोठा भाग शाखांतराच्या जाड तारेतून जातो. या मापकाने फक्त एकदिश विद्युत् प्रवाह मोजता येतो. याची अचूकता ०·१० ते २·००% पर्यंत असते.
विद्युत् गतिक अँपिअरमापकाने एकदिश व प्रत्यावर्ती (उलट सुलट दिशेने वाहणारा) या दोन्ही प्रकारचे विद्युत् प्रवाह मोजता येतात. त्याची अचूकता ०·१% असते.
(२) मृदुलोह अँपिअरमापक (Soft Iron Ammeter) : नीच कंप्रतेचा (दर सेकंदातील कंपनांचा) प्रत्यावर्ती विद्युत् प्रवाह मोजण्यासाठी सर्वत्र वापरतात. त्याची अचूकता ०·२५ ते २·००% असते.
(३) उष्मीय अँपिअरमापक (Thermal Ammeter) : रोधकातून विद्युत् प्रवाह गेला असता निर्माण होणाऱ्या उष्णतेने याचे कार्य चालते. पूर्वी तप्त तार असलेले अँपिअरमापक वापरीत असत. परंतु १९२० नंतर त्यांची जागा तपयुग्म अँपिअरमापकाने (दोन भिन्न धातूंच्या तारांचे सांधे भिन्न तपमानात ठेवू विद्युत् दाब निर्माण करणाऱ्या साधनाचा समावेश असलेल्या अँपिअरमापकाने) घेतली आहे. त्याने १०८ हर्ट्झपर्यंतच्या कंप्रतेचा प्रत्यावर्ती विद्युत् प्रवाह मोजता येतो. प्रवर्तन, एकदिक्कारक इ. प्रकारचे अँपिअरमापकही प्रचारात आहेत.
(४) अंकीय अँपिअरमापक (Digital Ammeter):
समीक्षक -संपादक : माधव राजवाडे