(उपकरण). अंतर्गोल अथवा बहिर्गोल भिंगे (Concave and Convex lenses) किंवा आरसे हे एका मोठ्या गोलाचा भाग असतात. या किंवा अशाच आकाराच्या अन्य वस्तू यांच्या गोलाकाराची त्रिज्या मोजण्यासाठी हे उपकरण उपयोगी पडते. तसेच अगदी कमी (मायक्रोमीटर मध्ये) जाडी असलेल्या वस्तूंची जाडी मोजण्यासाठीसुध्दा याचा उपयोग होतो. गोलत्वमापक हे सूक्ष्ममापाकाच्या (Micrometer) तत्त्वावर आधारलेले उपकरण आहे.

गोलत्वमापक

A ह्या तिपाईच्या मध्यभागी असलेल्या नटातून फिरणारा B हा स्क्रू असतो. तिपाईच्या तिन्ही पायांची टोके अणकुचीदार असून एकाच प्रतलात (पातळीत) असतात. या टोकांनी समभुज त्रिकोण तयार होतो, व त्या त्रिकोणाच्या गुरुत्वमध्यातून (Center of Gravity) मधल्या स्क्रूचा अक्ष जातो आणि हा अक्ष त्रिकोण प्रतलाला लंब असतो. मुख्य मापन दाखविणारी पट्टी (C-मापनी) स्क्रूच्या अक्षाला समांतर असते, व ती तिपाईला उभ्या स्थितीत घट्ट बसविलेली असते. स्क्रूला एक वर्तुळाकार तबकडी (D) घट्ट बसविलेली असते.  ह्या तबकडीची कडा मुख्य मापनीच्या (C च्या) कडेला स्पर्श करताता व या तबकडीच्या कडेवर वर्तुळाकार मापनी दर्शविणाऱ्या खुणा केलेल्या असतात. मुख्य मापनीवर अंतर मोजण्यासाठी रेषा असतात (मिमि मध्ये; mm). त्यात मध्यरेषेवर शून्य आकडा असतो आणि वर-खाली आकडे वाढत जातात. तसेच तबकडीवरील खुणांवर घड्याळाच्या दिशेने वाढत जाणारे आकडे असतात. मधल्या स्क्रूचे टोक जेव्हा तीन पायांच्या टोकांच्या प्रतलाला स्पर्श करते, तेव्हा मुख्य मापनीवरील (C) शून्याची रेषा आणि तबकडीवरील शून्याची रेषा एकमेकांना स्पर्श करतात. तसे घडत नसेल, तर उपकरणात ‘शून्य-स्थान दोष (Zero Error)’ असतो, व तो लक्षात घेऊन मोजलेल्या नोंदीत सुधारणा करावी लागते. या उपकरणाचा लघुतमांक (मोजता येणारे लहानात लहान अंतर; least count) सूक्ष्ममापकाप्रमाणेच म्हणजे स्क्रूच्या दोन लगतच्या आट्यांतील अंतराला तबकडीवर असलेल्या एकूण खुणांच्या संख्येने भागून मिळतो.

एखाद्या पदार्थाची जाडी मोजण्याकरिता हे उपकरण प्रथम सपाट काचेवर ठेवून स्क्रूचे टोक व तिन्ही पायांची टोके एकाच प्रतलात येतील अशा रीतीने स्क्रू फिरवतात. याच वेळेस शून्य स्थान दोष व त्याचे स्वरूप (अधिक वा उणे) पाहून घेतात. नंतर दोन्ही मापन्यांवरील अंकांची नोंद करतात. नंतर स्क्रू फिरवून वर घेतात व ज्याची जाडी मोजावयाची तो पदार्थ तीन पायांच्या आत ठेवून स्क्रूचे टोक त्या पदार्थाच्या वरील पृष्ठाला केवळ स्पर्श करील इतपत स्क्रू फिरवतात. पुन्हा दोन्ही मापन्यांवरील अंकांची नोंद करतात. पहिल्या व दुसऱ्या नोंदींतील फरकावरून व शून्य स्थान दोष लक्षात घेऊन पदार्थाची जाडी काढता येते.

गोलपृष्ठाची वक्रता मोजतानाही पहिली नोंद वरीलप्रमाणेच घेतात. नंतर स्क्रू वर घेऊन उपकरण वक्रपृष्ठावर ठेवतात. नंतर स्क्रूचे टोक गोलपृष्ठाला केवळ स्पर्श करील इतपत स्क्रू फिरवतात व दोन्ही मापन्यांवरील अंकांची नोंद करतात. दोन नोंदींतील फरकाला वक्रपृष्ठाचा ‘शर’ (बाण, सॅजिट्टा; celestial latitude) म्हणतात. समजा, हा फरक h आहे, वक्रपृष्ठाची त्रिज्या R आहे व उपकरणाच्या दोन पायांतील अंतर a आहे, तर खालील सूत्राने वक्रपृष्ठाची त्रिज्या R काढता येते :

R =\frac{a^2}{6h}+\frac{h}{2}

अर्धगोलापेक्षा लहान वक्रपृष्ठाची त्रिज्या वरील रीतीने काढतात. कारण अशा वेळी प्रत्यक्ष व्यास मोजण्याच्या इतर पद्धती बिनचूक नसतात. निरनिराळ्या प्रकारच्या गोलत्वमापकांत हवी असलेली अचूकता मिळविण्यासाठी निरनिराळे बदल केलेले असले, तरी वरील सूत्र बदलत नाही.

समीक्षक-संपादक : माधव राजवाडे

प्रतिक्रिया व्यक्त करा