व्यास, चिंतामण रघुनाथ : (९ नोव्हेंबर १९२४ – १० जानेवारी २००२). प्रसिद्ध हिंदुस्थान शास्त्रीय संगीत गायक व संगीतज्ञ. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात झाला. त्यांचे घराणे संस्कृत विद्वान आणि कीर्तनकारांची परंपरा असलेले होते. त्यांचे सुरुवातीस संगीताचे शिक्षण किराणा घराण्याचे गायक पंडित गोविंदराव भातंब्रेकर यांच्याकडे सुरू झाले. सुमारे बारा वर्षे ही तालीम चालली. वयाच्या एकविसाव्या वर्षी ते मुंबईला आले (१९४५). माटुंगा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात नोकरी करताना ते ग्वाल्हेर घराण्याचे पंडित राजारामबुवा पराडकर यांच्याकडे गायन शिकू लागले. गाण्यातील सौंदर्य, भावदर्शन संबंधी विचारमंथन करत असताना आग्रा घराण्याचे नामवंत गायक जगन्नाथबुवा पुरोहित (गुणीदास) यांच्या कलेमुळे प्रभावित होऊन त्यांच्याकडून त्यांनी तालीम सुरू केली, की जी त्यांच्या निधनापर्यंत चालू होती. या बरोबरीनेच व्यास यांना श्रीकृष्ण रातंजनकर, चिदानंद नगरकर, के. जी. गिंडे, एस. सी. आर. भट इत्यादींकडून देखील मार्गदर्शन मिळाले.

सी. आर. व्यास यांच्या गायकीवर किराणा, ग्वाल्हेर आणि आग्रा या तीनही घराण्यांचे संस्कार होते, तथापि त्यांनी खुल्या आणि मोकळ्या आवाजाची भावपूर्ण अशी एक स्वतंत्र वेगळी गायकी निर्माण केली. त्यामुळे गायकीच्या प्रसन्नतेत भर पडली. संगीत रिसर्च अकादमी, भारतीय विद्या भवन येथे त्यांच्या बंदिशींचे ध्वनिमुद्रण सुरक्षित आहे. ‘गुणीजन’ (गुनिजान) या टोपणनावाने त्यांनी अनेक बंदिशी रचल्या. धनकोनी कल्याण, सगेरा, सुध-जोगिया, शिव-अभोगी, सुधरंजीनी अशा रागांची निर्मितीही त्यांनी केली. अभिजात शास्त्रीय संगीताच्या साधकांना व्यासपीठ मिळावे व त्याचा प्रसार व्हावा या हेतूने त्यांनी त्यांच्या गुरुंच्या स्मरणार्थ ‘गुणिदास संगीत संमेलन’ याची सुरुवात केली (१९७४).

सी. आर. व्यास यांना त्यांच्या अनेकविध सांगीतिक कार्यकर्तृत्वाबद्दल अनेक मानसन्मान लाभले. त्यांपैकी काही पुढीलप्रमाणे : संगीत नाटक अकादेमी पुरस्कार (१९८७), महाराष्ट्र गौरव पुरस्कार (१९९०), पद्मभूषण पुरस्कार (१९९२), उस्ताद हाफीज अली पुरस्कार (१९९४), महाराष्ट्र -मराठवाडा पुरस्कार (१९९८), मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार (१९९९), आणि मध्य प्रदेश सरकारचा मानाचा तानसेन पुरस्कार (१९९९)  आदी पुरस्कार त्यांना मिळाले.

सी. आर. व्यास यांच्या बंदिशींचे पुस्तक राग सरिता या नावाने प्रसिद्ध झाले आहे (१९८४). यात त्यांनी रचलेल्या नवीन रागांच्या समावेशासह त्यांनी रचलेल्या १२१ बंदिशी आहेत. या पुस्तकाची सुधारित आवृत्ती २०१९ मध्ये प्रकाशित झाली. यामध्ये त्यांच्या ३२ नव्या बंदिशींचा समावेश आहे.

त्यांच्या संगीताचा वारसा त्यांचे सुपुत्र सतीश (संतूर वादक) आणि सुहास (गायक) आणि शिष्य प्रभाकर कारेकर, कुंदा वेलिंग, संजीव चिम्मलगी, अलका जोगळेकर आदींनी पुढे चालवला आहे.

सी. आर. व्यास यांचे कोलकाता येथे निधन झाले.

  समीक्षण : सु. र. देशपांडे