हनगल / हनगळ, गंगूबाई : (५ मार्च १९१३–२१ जुलै २००९). किराणा घराण्याच्या ज्येष्ठ आणि प्रख्यात गायिका. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात त्यांचे नाव ठळकपणे घेतले जाते. त्यांचा जन्म धारवाड (कर्नाटक) येथे झाला. वडिलांचे नाव चिक्कूराव नाडगीर व आईचे नाव अंबाबाई. हे दाम्पत्य संगीतप्रेमी होते. गंगूबाईंच्या आई कर्नाटक शास्त्रीय संगीत गात असत. त्यामुळे बालपणापासून गंगूबाईंवर संगीताचे संस्कार झाले. बालपणीच्या काही काळात त्यांनी धारवाड येथे प्रतापलाल व श्यामलाल यांच्याकडे कथ्थक नृत्याचे शिक्षण घेतले; परंतु गायनशिक्षण हाच त्यांचा ध्यास राहिला. गायनाचे सुरुवातीचे शिक्षण आईकडे झाल्यामुळे त्या सुरुवातीस कर्नाटक संगीत शिकल्या. तदनंतर कृष्णाचार्य हुळगूर यांच्याकडे हिंदुस्थानी गायकीचे शिक्षण त्यांनी घेतले. त्यांचा विवाह वयाच्या सोळाव्या वर्षी गुरुराव कौलगी यांच्याबरोबर झाला. ते वकील होते. त्यांना नारायणराव, बाबूराव ही मुले व कृष्णा ही मुलगी. गृहिणीपद, मातृत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळून त्या रियाज करीत असत. पुढे १९३८ मध्ये सवाई गंधर्व (रामचंद्र गणेश कुंदगोळकर) या किराणा घराण्याच्या नामवंत गायकांकडे गंगूबाई यांची रीतसर संगीत-साधना होऊ लागली. तेथे त्यांची प्रख्यात गायक भीमसेन जोशी आणि फिरोज दस्तुर या गुरुबंधूंशी भेट झाली.

ठुमरी, भजन इ. अभिजात हिंदुस्थानी संगीतातील गायनप्रकारांत त्यांनी गायन केले असले, तरी त्यांचे विशेष लक्ष होते ख्याल गायकीवर. गंगूबाईंची ख्याती किराणा घराण्याच्या हिंदुस्थानी शास्त्रीय गायनासाठी होऊ लागली. अचूक स्वर लगाव आणि आवाजातील धीरगंभीरपणा, दमदारपणा लोकांना भावू लागला. त्यांचा आवाज बुलंद होता; परंतु त्या बुलंदपणामागे गानसौंदर्याच्या आविष्काराची बैठक होती. स्वरसौंदर्याचा समर्थ आविष्कार हे त्यांच्या गानशैलीचे ठळक वैशिष्ट्य होय. त्यांच्या गायनाला अभिजातता, उच्च दर्जा व कलात्मक उंची होती. प्रतिष्ठित संगीत महोत्सवांत गंगूबाईंना बोलावणी येऊ लागली. ‘सोसायटी फॉर प्रमोशन ऑफ म्युझिक फॉर यंगर जनरेशन’ अर्थात ‘स्पीक मॅके’ या संस्थेसाठी युवा प्रेक्षकांपुढे त्यांनी भारतभर ३०० च्या वर गायन मैफिली सादर केल्या. १९२४ मध्ये बेळगाव येथील काँग्रेसच्या अधिवेशनात त्यांनी सादर केलेल्या गीतासाठी महात्मा गांधी यांच्याकडून त्यांना शाबासकी मिळाली होती. त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना अब्दुल कलाम आझाद असे महनीय लोकही उपस्थित होते. किराणा घराण्याचे गायक उस्ताद अब्दुल करीमखाँ यांच्यासमोर गाण्याची संधी त्यांना १९२५ मध्ये मिळाली;  त्यांची पहिली स्वतंत्र मैफल १९३१ मध्ये गोरेगांव (मुंबई) येथे झाली. एच्.एम्.व्ही. तर्फे १९३२ मध्ये ‘गांधारी हनगल’ या नावाने त्यांच्या पहिल्या ध्वनिमुद्रिकेचे प्रकाशन झाले. १९३३ पासून त्यांनी आकाशवाणीवर कार्यक्रम करण्यास सुरुवात केली. १९५० च्या सुमारास टॉन्सिलच्या व्याधीवर उपचार घेत असताना त्यांचा मूळचा आवाज बदलून तो भरदार, दमदार बनला; तथापि हा बदल त्यांनी धीरोदात्तपणे स्वीकारला आणि आपली संगीतसाधना चालू ठेवली. १९५२ मध्ये आकाशवाणीच्या अखिल भारतीय संगीत सभेत त्यांनी गायन केले. या मैफिलीस तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू उपस्थित होते. बाबूराव पेंढारकर यांच्या विजयाची लग्ने या चित्रपटातही त्या गायल्या होत्या. १९९२–९४ या काळात कर्नाटक विधानपरिषदेच्या सदस्य म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आले. बंधू शेषगिरी हनगल व कन्या कृष्णा हनगल यांच्या साथीने त्यांनी विविध देशांतून किराणा घराण्याच्या मैफिली सादर केल्या. त्यांत इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, जर्मनी, फ्रान्स, पाकिस्तान व नेपाळ यांचा समावेश आहे.

१९८२–८४ च्या दरम्यान गंगूबाई कर्नाटक संगीत नृत्य अकादमीच्या, तसेच सवाई गंधर्व महोत्सव आणि आर्य संगीत प्रसारक गंधर्व महोत्सव, पुणे या संस्थांच्या अध्यक्षा होत्या. कर्नाटक विद्यापीठाच्या सल्लागार मंडळावरही त्यांनी सहा वर्षे काम केले. कुंदगोळ या गावी गुरू सवाई गंधर्व यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्या दरवर्षी दोन दिवस संगीत महोत्सवाचे आयोजन करीत असत. या महोत्सवात जुने आणि नवे अनेक गायक अतिशय आवडीने हजेरी लावत. त्यांनी युवा गायक-गायिकांना गुरुकुल पद्धतीने घरी ठेवून गानविद्या दिली.

गंगूबाई यांना त्यांच्या प्रदीर्घ गायन कारकीर्दीत अनेक मानसन्मान व पुरस्कार लाभले : पद्मभूषण (१९७१), कर्नाटक संगीत नृत्य अकादमी पुरस्कार (१९७१), संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९७३), प्रसारण सेवा पुरस्कार (१९७७), मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार (१९८४), हाफीज अलीखाँ पुरस्कार (१९९२), केरेमने शिवराम हेगडे पुरस्कार (१९९२), भूवालका पुरस्कार (१९९३), पद्मविभूषण (२००२), श्रीषण्मुखानंद ललित कला आणि संगीत सभा पुरस्कार (२००३), प्रसार भारतीचा पंचाहत्तरीपूर्तीनिमित्त पुरस्कार (२००४), रोटरी फाउंडेशनची पॉल हॅरिस फेलोशिप (२००५), आदित्य विक्रम बिर्ला पुरस्कार (२००५), एम. विश्वेश्वरैय्या पुरस्कार (२००६), भारतीय संगीत पुरस्कार (२००७) इत्यादी. भारतीय ज्ञानपीठ पुरस्कारविजेते कन्नड महाकवी दत्तात्रेय रामचंद्र बेंद्रे यांनी गंगूबाई यांना ‘गायनगंगादेवी’ ही पदवी बहाल केली. त्यांना काही विद्यापीठांनी सन्मान्य डॉक्टरेट पदवी दिली. भारत सरकारने त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ टपाल तिकिट काढले (२०१४).

नन्ना बदुकिन हादु (कन्नड), साँग ऑफ माय लाइफ (इंग्लिश) हे गंगूबाईंचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. हुबळी येथील ‘गंगालहरी’ या त्यांच्या निवासस्थानी त्यांनी त्यांच्या गुरूंचे स्मारक आणि संग्रहालय उभारले आहे. त्यांचा शिष्यपरिवार बराच मोठा असून, त्यांतील नागनाथ वडियार (हुबळी), अशोक नाडगीर (कुंदगोळ), साईनाथ मोहिते (बेळगाव), कन्या कृष्णा हनगल (हुबळी), श्रीमती पट्टंमल (दिल्ली) व शकुंतला भरणे (गोवा) यांनी गायनक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे.

हुबळी येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मराठी विश्वकोश  खंड २० (पूर्वार्ध), २०१४.

समीक्षक – सुधीर पोटे

#भीमसेन जोशी #सवाई गंधर्व

प्रतिक्रिया व्यक्त करा