(द्रव्य तरंग; Matter wave). फ्रेंच शास्त्रज्ञ  ल्वी व्हीक्तॉर द ब्रॉग्ली (Louis de Broglie) यांनी १९२४ साली मांडलेल्या परिकल्पनेमध्ये असे म्हटले की, फोटॉनांप्रमाणे (Photon) इलेक्ट्रॉनांसारखे (electron) इतर कण सुद्धा तरंगरूपात असतात. त्याने अशा कणांच्या तरंगांची तरंगलांबी (\lambda) आणि त्यांचा संवेग (p) यांमधील संबंध खालील समीकरणाद्वारे निश्चित केला

\lambda = \frac{h}{p}

येथे h आणि p हे अनुक्रमे प्लांकचा स्थिरांक आणि कणाचा संवेग आहेत. प्रकाशविद्युत परिणाम समजावण्यासाठी आइन्स्टाइन यांनी फोटॉनांसाठी हाच संबंध वापरला होता.

पुंज भौतिकीच्या विकासामध्ये द ब्रॉग्लीच्या ( de Brogli) परिकल्पनेचा महत्त्वाचा वाटा होता. तरंग कण द्वैततेच्या (duality) कल्पनेचा द ब्रॉग्ली परिकल्पना एक भाग आहे. याच परिकल्पनेचा विकास नंतर श्रोडिंजर यांनी श्रोडिंजर समीकरणाद्वारे (schrodinger’s equation) केला.

इलेक्ट्रॉन तरंगांप्रमाणे वागतात हे जॉर्ज पॅगेट टॉमसन (George Paget Thomson) आणि क्लिंटन जोसेफ डेव्हिसन (Clinton Joseph Davisson) व लेस्टर हार्बर्ट गर्मर (Lester Harbert Germer) यांनी १९२७ साली इलेक्ट्रॉन विवर्तनाच्या (electron diffraction) प्रयोगाद्वारे दाखवून दिले. या परिकल्पनेसाठी ल्वी व्हीक्तॉर द ब्रॉग्ली यांना १९२९ च्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पहा : द ब्राॅग्ली गृहितक.

कळीचे शब्द : #तरंगकण #द्वैतता #वस्तु तरंग #matterwaves

संदर्भ :

समीक्षक : हेमचंद्र प्रधान


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.