मुळात स्थिर किंवा निश्चल असलेली वस्तू जोवर तिच्यावर कोणत्याही बाह्य बलाचा प्रभाव पडत नाही तोवर स्थिरच राहते. तसेच जी वस्तू गतिमान आहे तीही बाह्य बलाच्या प्रभावाअभावी एकाच दिशेने त्याच वेगाने मार्गक्रमणा करत राहते. वस्तूंच्या या अंगभूत गुणधर्माला जडत्व (निरुढी, इनर्शिया, Inertia)असे म्हणतात. न्यूटनने प्रस्तावित केलेल्या गतीच्या नियमांपैकी हा पहिला नियम आहे. कोणत्याही वस्तूचे वस्तुमान हे त्याच्या जडत्वाचे माप असते. मैदानात निश्चल पडलेला चेंडू जोवर त्यावर पायाचा मार बसत नाही तोवर तिथून हलत नाही. हे त्या चेंडूच्या ज़डत्वापायी होते. तसेच एका रेषेत चालणारी मोटर घर्षणरहित रस्त्यावरून चालत असेल तर तशीच चालत राहील. जोवर तिच्या चाकांवर घर्षणाचा किंवा चालकाने लावलेल्या गतिरोधकाचा प्रभाव पडत नाही तोवर तिच्या वेगात घट होऊन ती स्थिर होणार नाही.
समीक्षक : माधव राजवाडे