हस्तस्वच्छकारी द्रव्य

आपल्या हातावरील रोगकारक सूक्ष्मजंतू नष्ट करून हात निर्जंतुक करणाऱ्या, द्रव किंवा सहज ओतता येईल अशा जेलच्या स्वरूपात उपलब्ध असलेल्या पदार्थाला हस्तस्वच्छकारी द्रव्य म्हणतात. याचा उपयोग अधिकत: साथीच्या रोगांचा प्रसार टाळण्यासाठी केला जातो.

गेल्या २०-२५ वर्षांत हस्तस्वच्छकारी द्रव्यांचा वापर वाढत आहे. २०१९-२० दरम्यान जगभर पसरलेल्या कोरोना व्हायरसच्या (COVID-19) साथीमध्ये हस्तस्वच्छकारी द्रव्याच्या वापरावर सर्वत्र भर देण्यात येत आहे. जिथे साबण व पाणी सहज उपलब्ध नाही अशा ठिकाणी म्हणजेच प्रवासात, सार्वजनिक ठिकाणे, दवाखाने व रुग्णालये येथे असे द्रव्य उपयुक्त ठरतात. याच्या उपयोगाने हातावरील रोगकारक बॅक्टेरिया व व्हायरस मरतात. हस्तस्वच्छकारी द्रव्याच्या वापराकरिता वैद्यकीय निर्देशाची (Medical prescription) आवश्यकता नसते आणि ते दुकानात सहज उपलब्ध होतात (over-the-counter drug).

हस्तस्वच्छकारी द्रव्याचे उदाहरण : ८३३ मिलि. एथिल अल्कोहॉल (९५%) (किंवा ७५२ मिलि. आयसोप्रोपिल अल्कोहॉल),  ४२ मिलि. हायड्रोजन पेरॉक्साइड (३% किंवा १०V), १५ मिलि. ग्लिसरीन या मिश्रणात शुद्ध पाणी टाकून १ लिटर द्रावण बनवावे. ग्लिसरीनऐवजी कोरफड वनस्पतीपासून तयार (Aloe vera) जेल वापरता येते.

वर्गीकरण : रासायनिक संघटनानुसार हस्तस्वच्छकारी द्रव्याचे दोन प्रकार आहेत : (१) अल्कोहॉलयुक्त हस्तस्वच्छकारी द्रव्य आणि (२) अल्कोहॉलविरहित हस्तस्वच्छकारी द्रव्य.

(१) अल्कोहॉलयुक्त हस्तस्वच्छकारी द्रव्य : या प्रकारचे हस्तस्वच्छकारी द्रव्य जास्त प्रमाणात वापरला जाते. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अत्यावश्यक औषधांच्या यादीत याचा समावेश आहे.

रासायनिक संघटन : यामध्ये एथिल अल्कोहॉल हा प्रमुख घटक असतो. एथिल अल्कोहॉल जंतुनाशक आहे. याने क्षय तसेच सर्दी, फ्लू, एचआयव्ही आणि कोरोना यांसारखे अनेक रोगकारक बॅक्टेरिया व व्हायरस मरतात (रेबीजचा व्हायरस मात्र मरत नाही). एथिल अल्कोहॉल न मिळाल्यास आयसोप्रोपिल अल्कोहॉल ( किंवा n-प्रोपिल अल्कोहॉल) वापरता येते. ज्या हस्तस्वच्छकारी द्रव्यामध्ये ६०-९५% (आकारमानाने) अल्कोहॉलाचे प्रमाण असते ते प्रभावी असते. अल्कोहॉलचे ९०% प्रमाण उत्तम असते.

रूग्णालयातील हस्तस्वच्छकारी द्रव्यामध्ये ७०-९५% अल्कोहॉल असते (सामान्यत: ६०-८०%). यामध्ये अल्प प्रमाणात ग्लिसरीन मिसळतात, ज्यामुळे हातावरून अल्कोहॉल पटकन उडून जाऊन त्वचा कोरडी पडत नाही आणि त्वचेवरचा ओलावा कायम राहतो. तीव्र जंतुनाशक म्हणून हायड्रोजन पेरॉक्साइड अल्प प्रमाणात मिसळले जाते. कधीकधी अत्यल्प प्रमाणात इतर जंतुनाशकेही घालतात (जसे बेंझाल्कोनियम क्लोराइड, २०० पीपीएम). यामुळे हस्तस्वच्छकारी द्रव्य जास्त प्रभावी होते. याशिवाय पुरेसे शुद्ध पाणी घालण्यात येते. बाजारातील हस्तस्वच्छकारी द्रव्यामध्ये वरील घटकांव्यतिरिक्त सुगंधी द्रव्ये, परिरक्षक (preservative) इ. द्रव्ये घालतात. अल्कोहॉल सुरक्षित असून त्याने त्वचेला अॅलर्जी होत नाही.

(२) अल्कोहॉलविरहित हस्तस्वच्छकारी द्रव्य : रासायनिक संघटन : यामध्ये अल्कोहॉलऐवजी बेंझाल्कोनियम क्लोराइड किंवा ट्रायक्लोसॅन हे जंतुनाशक पदार्थ वापरतात. अशा हस्तस्वच्छकारी द्रव्यामध्ये उडून जाणारी द्रव्ये नसल्यामुळे हातावर थोडासा चिकट थर राहतो.

वापर : हस्तस्वच्छकारी द्रव्य वापरायला सोपे असते. एका तळहातावर त्याचे काही थेंब घ्यावेत. नंतर दोन्ही हात एकमेकांवर, हाताच्या सर्व बाजूंना व बोटांना, द्रव पूर्णपणे सुकून जाईपर्यंत, नीट चोळावे (यासाठी २०-३० सेकंद पुरतात). मुख्यत: पुरेसे जंतुनाशक नखांभोवती, बोटांमध्ये, अंगठ्यामागे व मनगटाभोवती जाणे आवश्यक असते. हस्तस्वच्छकारी द्रव्य वेगवेगळ्या आकारांच्या बाटल्यांतून मिळतात, ज्यामुळे ते हातावर थोड्या प्रमाणात ओतून घेता येतात.

हस्तस्वच्छकारी द्रव्य वापरताना घ्यावयाची काळजी : हस्तस्वच्छकारी द्रव्यामध्ये ९०% पेक्षा जास्त अल्कोहॉल असल्यास ते ज्वलनशील बनते. त्यामुळे ते आगीजवळ ठेवू किंवा वापरू नये. हात कोरडे झाल्यावरच आगीजवळ जावे. हे द्रव्य कधीही पोटात तसेच डोळ्यात जाऊ देऊ नये. हस्तस्वच्छकारी द्रव्य लहान मुलांपासून दूर ठेवावे. याचा उपयोग तेलकट किंवा प्रथिने असलेल्या त्वचेवर फारसा होत नाही (उदा., मांस उद्योग). तसेच हातावरील रसायनांचे (उदा., कीटकनाशके) अवशेष असतील तर ते नष्ट होत नाहीत.

संदर्भ :

  • Guide to local production: WHO recommended hand rub formulations, www.who.int>gpsc>guide-to-local-production.
  • WHO recommended hand rub formulations, www.ncbi.nlm.nih.gov>books>NBK144054