‘भाषिक विश्लेषण’ या नावाने सामान्यपणे ज्या तत्त्वज्ञानाचा निर्देश करण्यात येतो त्याच्यात दोन प्रकारचे तत्त्वज्ञान मोडते : एक प्रकार म्हणजे लूटव्हिख व्हिट्‍गेन्‍श्टाइन (१८८९−१९५१) याच्या फिलॉसॉफिकल इन्व्हेस्टिगेशन्स (१९५३, म.शी. तत्त्वज्ञानात्मक अन्वेषणे) या ग्रंथात मांडलेल्या विचारांपासून प्रेरणा घेणारे तत्त्वज्ञान. दुसऱ्या प्रकारचा उगम जे. एल. ऑस्टिन (१९११−६०) या तत्त्ववेत्त्याच्या विचारात आढळतो. ऑस्टिन हा दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काही काळात ऑक्सफर्ड विद्यापीठातील अत्यंत प्रभावशाली तत्त्ववेत्ता होता, ह्याविषयी दुमत होणार नाही. त्याने प्रेरित केलेल्या तत्त्वज्ञानाला ऑक्सफर्ड पंथ (Oxford School) म्हणूनही ओळखण्यात येते. भाषिक विश्लेषणामध्ये मोडणाऱ्या तत्त्वज्ञानाच्या ह्या दोन प्रकारांमध्ये महत्त्वाचे भेद आहेत.

तत्त्वज्ञानात्मक अन्वेषणे या ग्रंथात व्हिट्‍गेन्श्टाइनने मांडलेल्या विचारांचा विकास स्वतःच पूर्वायुष्यात रचलेल्या ट्रॅक्टेटस लॉजिको-फिलॉसॉफिकस (१९२२, म.शी. तर्क-तत्त्वज्ञानविषयक प्रबंध) ह्या ग्रंथात मांडलेल्या विचारांवरील टीकेतून व त्याच्या अव्हेरातून घडत गेला, असे म्हणणे योग्य ठरेल. भाषा, जग आणि त्यांच्यामधील संबंध यांच्या स्वरूपाविषयी ट्रॅक्टेटसमध्ये मांडलेले विचार सारांशाने असे आहेत : विधान सत्य किंवा असत्य असते. विधानाच्या संबंधात या दोन शक्यता संभवतात याचा अर्थ असा की, विधान जे व्यक्त करते, ती शक्य अशी वस्तुस्थिती असते आणि ती प्रत्यक्षात अवतरली असेल, तर विधान सत्य असते; नाहीतर ते असत्य असते. नवीन विधानाचा, पूर्वी कधीही न ऐकलेल्या विधानाचा, अर्थ आपल्याला कळू शकतो. याचा अर्थ असा की, विधान हे अंतिम घटकांचे बनलेले असते, ह्या घटकांची रचना होऊन ते तयार झालेले असते आणि हे घटक आणि रचना आपल्या परिचयाची असतात. विधानाच्या ह्या अंतिम घटकांना व्हिट्‍गेन्श्टाइन नामे म्हणतो. नामे परस्परांशी स्वतःच संलग्‍न होऊन विधान बनते. विधान (शक्य) वस्तुस्थिती व्यक्त करते. विधानाचे अंतिम घटक असलेली नामे ही वस्तुस्थितीचे घटक असलेल्या अंतिम पदार्थाचे (Objects) वाचक असतात आणि हे पदार्थ स्वतःच एकमेकांशी संलग्‍न झाल्याने (शक्य) वस्तुस्थिती बनते. विधान हे ते व्यक्त करीत असलेल्या वस्तुस्थितीचे तार्किक चित्र असते.

जग म्हणजे प्रत्यक्ष अस्तित्वात असलेल्या वस्तुस्थितींचा समुदाय होय. जगाचे ‘द्रव्य’, जग ज्या सामग्रीचे बनलेले असते (म्हणजे वस्तुस्थिती ज्या सामग्रीच्या बनलेल्या असतात), ती सामग्री म्हणजे अंतिम किंवा साधे (Simple) पदार्थ होत. कोणता पदार्थ इतर कोणत्या पदार्थांशी संलग्‍न होऊन (शक्य) वस्तुस्थिती बनते, हे त्या पदार्थाच्या स्वरूपातच अनिवार्यपणे अनुस्यूत असते. तेव्हा ह्या पदार्थांपासून सर्व शक्य वस्तुस्थिती ह्या अनिवार्यपणे सिद्ध झालेल्या असतात. ह्यांतील कोणत्या प्रत्यक्ष अस्तित्वात असतील हे मात्र आगंतुक (Contingent) असते; पण प्रत्यक्ष जग आगंतुक असले, तरी त्याच्यात त्याचे अनिवार्य असे तार्किक स्वरूप, तार्किक सत्त्व (Essence) व्यक्त झालेले असते. उदा., बुद्धिबळ हा खेळ घेतला, तर मोहरी, त्यांच्या खेळी करण्याचे नियम, पटावरील स्थाने इत्यादींच्यामुळे बुद्धिबळाच्या सर्व दुरुस्त खेळी निश्चित होतात. दोन भिडू खेळताना प्रत्यक्षात कोणत्या खेळी खेळतील हे आगंतूक असते; पण ह्या खेळी जर दुरुस्त असतील, तर त्या बुद्धिबळाच्या नियमांनी पूर्वनिर्धारित असलेल्या सर्व दुरुस्त खेळींच्या समुदायात समाविष्ट असतात. तेव्हा हे नियम म्हणजे बुद्धिबळाच्या सर्व खेळींना समान असलेले असे त्यांचे तार्किक सत्त्व आहे, असे म्हणणे योग्य ठरते. त्याप्रमाणे सर्व साधे पदार्थ आणि परस्परांशी संलग्‍न होण्याच्या त्यांच्यात अभिप्रेत असलेल्या शक्यता ह्यांच्यामुळे शक्य असलेल्या सर्व वस्तुस्थिती पूर्वनिर्धारित असतात. आगंतुकपणे अस्तित्वात असलेल्या ज्या प्रत्यक्ष वस्तुस्थितींचे जग बनलेले असते, त्यांत हे तार्किक सत्त्व व्यक्त झालेले असते. ज्या आपल्या भाषेत आपण जगाचे वर्णन करतो तिच्यातही हे तार्किक सत्त्व प्रतिबिंबित झालेले असते. हे तार्किक सत्त्व ग्रहण करणे आणि विशद करणे हे तत्त्वज्ञानाचे एक महत्त्वाचे कार्य आहे.

जग आणि भाषा यांच्या स्वरूपाविषयीच्या ह्या मूलभूत विचाराचा व्हिट्‍गेन्श्टाइनने तत्त्वज्ञानात्मक अन्वेषणे ह्या ग्रंथात अव्हेर केला आहे. ह्या ग्रंथाची महत्त्वाची भूमिका, जिच्यापासून भाषिक विश्लेषणाने प्रेरणा घेतली ती भूमिका, अशी मांडता येईल : आपल्या भाषेमध्ये (आणि ज्या जगाचे वर्णन करण्यासाठी आपण भाषा वापरतो, त्या जगाच्या बांधणीमध्ये) असे कोणतेही अनिवार्य असे तार्किक सत्त्व व्यक्त झालेले नसते. ‘खेळ’ ह्या संकल्पनेचा दुहेरी उपयोग करून भाषेचे स्वरूप स्पष्ट करण्याचा प्रयत्‍न व्हिट्‍गेन्श्टाइनने केला आहे. ‘खेळ’ हा शब्द ज्या विविध भिन्न गोष्टींना उद्देशून आपण वापरतो, म्हणजे ज्यांना आपण खेळ म्हणतो, त्या सर्व घेतल्या तर त्यांच्यात त्या सर्वांना समान असलेले असे एक सत्त्व असते, असे म्हणता येत नाही. क्रिकेट, व्हॉलिबॉल, बुद्धिबळ आणि पत्त्यातील ‘पेशन्स’ हा खेळ ह्या सर्वांना समान असलेली काही वैशिष्ट्ये आहेत आणि ही वैशिष्ट्ये एकत्र घेतली की, खेळाची व्याख्या होते किंवा खेळाचे सत्त्व हाती येते, असे म्हणता येत नाही. खेळांमध्ये वेगवेगळ्या बाबतीतील काही साम्ये असतात व काही भेद असतात. उदा., व्हॉलिबॉल, टेनिस, बॅडमिंटन एका बाजूला आणि क्रिकेट,  बेसबॉल दुसऱ्या बाजूला घेतले, तर पहिल्या गटात जी समान वैशिष्टये आहेत, ती दुसऱ्या गटात आढळत नाहीत आणि दुसऱ्या गटात जी वैशिष्ट्ये आहेत, ती पहिल्या गटात आढळत नाहीत; पण हे दोन्ही गट एकत्र घेतले, तर त्यांच्यात एक समान वैशिष्ट्य आढळते आणि ते हुतुतू, खोखो यांच्यात आढळत नाही−ते वैशिष्ट्ये म्हणजे, बॅट, रॅकेट इ. उपकरणांचा वापर. खेळ दोन प्रतिस्पर्ध्यांत जिंकण्यासाठी होतो हे किमान वैशिष्ट्यही सर्व खेळांना समान नाही, हे पेशन्सच्या खेळाने दिसून येते. तेव्हा खेळांमध्ये समान असे काही सत्त्व असत नाही. त्याचप्रमाणे भाषेचेही आहे. आपली भाषा घेतली तर वेगवेगळ्या ‘भाषिक खेळां’चा तो समूह आहे असे आढळून येईल. पण ह्या सर्व भाषिक खेळांना समान असलेले तार्किक सत्त्व असते आणि हे भाषेचे असे आणि म्हणून जगाचे तार्किक सत्त्व असते, असे म्हणता येत नाही.

व्हिट्‍गेन्श्टाइन ज्याला भाषिक खेळ म्हणतो त्याच्यात भाषा (शब्द, वाक्ये) आणि कृत्ये एकत्र गुंफलेली असतात. विशिष्ट भाषिक खेळ हा एका विशिष्ट प्रकारचा भाषिक व्यवहार असतो. भाषिक प्रयोगांना (शब्दांना, वाक्यांना) ह्या भाषिक व्यवहारात काही विशिष्ट प्रयोजन असते. हे प्रयोजन समजणे, त्या विशिष्ट भाषिक व्यवहाराच्या संदर्भात त्या भाषिक प्रयोगांचा वापर करता येणे म्हणजे त्यांचा अर्थ समजणे. ट्रॅक्टेटसमध्ये मानण्यात आले आहे त्याप्रमाणे शब्द ज्या पदार्थाचा वाचक असतो तो पदार्थ म्हणजे या शब्दाचा अर्थ नव्हे, तर शब्दाचा वेगवेगळ्या संदर्भांतील यथोयोग्य वापर किंवा उपयोग म्हणजे त्याचा अर्थ. हा संदर्भ ज्या भाषिक खेळाशी किंवा व्यवहाराशी तो भाषाप्रयोग निगडित असतो त्याने निश्चित होतो. शब्द, शब्दपंक्ती यांना व्हिट्‍गेन्श्टाइन अवजारांची, आयुधांची उपमा देतो.

भाषिक खेळ हा एक विशिष्ट जीवनव्यवहार असतो, मानवी जीवनाचे ते एक रूप, एक आकार असतो (Form of Life). भाषिक खेळाचे स्वरूप समजून घेणे म्हणजे हा जीवनव्यवहार समजून घेणे, जीवनाचे हे विशिष्ट रूप समजून घेणे. असे न करता भाषेच्या स्वरूपाविषयी मनात एक विशिष्ट कल्पना बाळगून जर आपण भाषेकडे पाहू लागलो, भाषेवर काही आदर्श जर आपण बाहेरून लादले, तर आपण निष्कारण संभ्रमात पडू. उदा., ट्रॅक्टेटसमध्ये असा एक आदर्श भाषेवर बाहेरून लादला होता. बऱ्याच तात्त्विक समस्यांचा उगम भाषिक प्रयोगांच्या प्रयोजनांविषयीच्या गैरसमजुतीमध्ये असतो व ही गैरसमजूत दूर केली की, त्या समस्येचेही शमन होते−उदा., ‘चांगले’ हे पद एक विशेषण आहे, तेव्हा कोणत्याही विशेषणाप्रमाणे उदा., ‘पिवळे’, ‘मधुर’ इ.−ते कोणत्या तरी गुणाचे वाचक असले पाहिजे; पण पिवळेपण किंवा गोडी ह्या गुणांप्रमाणे ‘चांगले’ ह्या विशेषणाने व्यक्त होणारा गुण इंद्रियगम्य नाही; मग हा कोणता गुण आणि तो आपल्याला कसा आढळून येतो असा प्रश्न जी. ई. मुर (१८७३−१९५८) याला पडला होता आणि चांगलेपणा हा एक अप्राकृतिक, साक्षात प्रतिभानाला (Intuition) गोचर होणार असा गुण आहे, असे त्याचे उत्तर त्याने दिले होते. पण ज्या भाषिक व्यवहारात आपण ‘चांगले’ हा शब्द वापरतो आणि ज्या प्रयोजनासाठी वापरतो ते आपण समजून घेतले, तर हा प्रश्न विरघळून जातो व ही रचना अनावश्यक ठरते. निवड करणे, शिफारस करणे ह्या व्यवहारांत ‘चांगले’ ह्या शब्दांचे स्थान आहे, वस्तूंच्या स्वरूपांचे वर्णन करण्याच्या व्यवहारात नव्हे, ही गोष्ट ध्यानात घेतली की, ‘चांगले’ आणि ‘पिवळे’ यांच्या अर्थांमध्ये आपण साम्य शोधत बसणार नाही किंवा त्यांच्यावर साम्य लादणार नाही.

पण ह्यावरून निष्कारण उद्‍भवणाऱ्या तत्त्वज्ञानात्मक समस्यांचे विसर्जन करणे एवढेच भाषिक विश्लेषणाचे कार्य असते, असे मानणे गैर ठरेल. हे नकारी कार्य झाले. विशिष्ट भाषिक व्यवहारांचे−जीवनरूपांचे−स्वरूप समजून घेणे आणि ते विशद करणे, म्हणजे वेगवेगळ्या जीवनव्यवहारांची आंतरिक घडण स्पष्ट करणे, त्यांचे परस्परांशी असलेले गुंतागुंतीचे संबंध उकलून दाखविणे, हेही भाषिक विश्लेषणाचे विधायक असे कार्य आहे. उदा., नैतिक व्यवहार, कलाकृतींची निर्मिती व आस्वाद हा व्यवहार, कायद्याचा व्यवहार, वैज्ञानिक व्यवहार, धार्मिक व्यवहार इ. व्यवहार आपापल्या भाषेद्वारे (संकल्पनाव्यूहाच्या द्वारे) मूर्त झालेले असतात. ह्या विशिष्ट भाषांची−भाषिक खेळांची−आंतरिक घडण स्पष्ट करणे म्हणजे ह्या व्यवहारांचे स्वरूप स्पष्ट करणे होय. भाषिक विश्लेषण हा तत्त्वज्ञानाचा प्रकार एखाद्या वैय्याकरणाप्रमाणे किंवा भाषाशास्त्राप्रमाणे केवळ भाषेचे विश्लेषण करतो किंवा भाषेचा अभ्यास करतो, असे मानणे गैर ठरेल. त्याच्यात कार्यरत भाषेचे विश्लेषण करण्यात येत असते. ह्या भाषेत विशिष्ट जीवनव्यवहारच नव्हे, तर त्या भौतिक परिसराच्या संदर्भात हा जीवनव्यवहार घडत असतो, तो संदर्भही मूर्त झालेला असतो. तेव्हा भाषिक विश्लेषणाचे उद्दिष्ट म्हणजे जगाची आपली समज आणि जगाच्या संदर्भात घडणारे वेगवेगळे मानवी व्यवहार यांचे स्वरूप स्पष्ट करणे हे असते, ह्या व्यवहाराचे ‘तर्कशास्त्र’ विशद करणे हे असते.

हा व्यवहार नेहमी सामूहिक किंवा सार्वजनिक असतो. तो केवळ वैयक्तिक किंवा खाजगी नसतो. म्हणजे तो केवळ आंतरिक किंवा मानसिक नसतो. तो बाह्य, शारीरिक, भौतिकही असतो. त्याचे माध्यम असलेली भाषा ही मूलतः सार्वजनिक भाषा असते. खाजगी भाषा असू शकेल; पण सार्वजनिक भाषेच्या पार्श्वभूमीवर आणि तिचा विस्तार म्हणूनच ती असू शकेल. दुसऱ्या शब्दांत ही गोष्ट मांडायची, तर विचार, भावना, इच्छा इ. मानसिक घटना त्यांच्या होणाऱ्या शारीरिक आविष्कारांद्वारा मूर्त होतात. मानसिक घटना आणि त्यांचे शारीरिक आविष्कार यांच्यामधील संबंध आगंतुक नसतात. ते अनिवार्य असतात. म्हणजे मानसिक घटनांना त्यांच्या शारीरिक आविष्कारांच्या माध्यमाद्वाराच त्यांचे अस्तित्व मूलतः लाभत असते. अशा देहीभूत मानसिक घटनांच्या पार्श्वभूमीवर केवळ आंतरिक घटनांची, ज्यांचा बाह्य आविष्कार झालेली नाही अशा मानसिक घटनांची, कल्पना आपण करू शकतो. व्हिट्‍गेन्श्टाइनची ही भूमिका ध्यानात घेतली की, भाषिक विश्लेषणवादी तत्त्वज्ञान व जी. डब्ल्य. एफ. हेगेल (१७७०−१८३१) याच्या तत्त्वज्ञानासारखे ‘अभिजात’ तत्त्वज्ञान यांच्यामधील साम्य ध्यानात येईल. अर्थात त्यात महत्त्वाचे भेदही आहेत.

भाषिक विश्लेषण या वर्णनात्मक नावाने निर्दिष्ट होणाऱ्या एका प्रकारच्या तत्त्वज्ञानाला आधारभूत असणाऱ्या सर्वसाधारण भूमिकेचे विवरण आतापर्यंत केले. जॉन विजडम (१९०४−९३), गिल्बर्ट राइल (१९००−७६), पीटर गीच, एलिझबेथ अन्स्कॉम्ब, अँटनी केनी, व्हॉन राइट, नॉर्मन माल्कम, पीटर स्‍ट्रॉसन, स्टुअर्ट हँपशायर, मॅक्स ब्‍लॅक (१९०९−८८) ह्या तत्त्ववेत्त्यांनी सर्वसाधारणपणे ह्या भूमिकेवरून तत्त्वज्ञानात्मक समस्यांचे विवरण केले आहे. मनाचे स्वरूप, बाह्य जगाविषयीच्या आपल्या ज्ञानाचे स्परूप, नीती, राज्यशास्त्र, सौंदर्यशास्त्र, आकारिक तर्कशास्त्र व गणित यांचे तार्किक स्वरूप, धार्मिक संकल्पना व व्यवहार इ. पारंपरिक तत्त्वज्ञानाचेच विषय भाषिक विश्लेषणवाद्यांनी हाताळले आहेत.

भाषिक विश्लेषाणाचा दुसरा प्रवाह जे. एल. ऑस्टिन याच्या विचारांतून उगम पावतो. आपल्या नेहमीच्या दैनंदिन व्यवहाराच्या भाषेत जे शब्द, शब्‍दपंक्ती प्रचलित असतात त्यांच्या वापराचे सूक्ष्म निरीक्षण करण्यावर ह्या विचारपंथाचा भर आहे. ऑस्टिन याचे म्हणणे असे होते की, पारंपरिक तत्त्वज्ञानात अनेकदा आपल्या नेहमीच्या भाषेतील कित्येक पदांना मध्यवर्ती महत्त्व देऊन तात्त्विक समस्या उपस्थित करण्यात येतात आणि त्यांची उत्तरे शोधण्यात येतात. पण ह्या पदांशिवाय भाषेत जी इतर संबंधित पदे असतात, त्यांच्या अर्थाकडे दुर्लक्ष करण्यात येते. पण भाषा शेकडो वर्षे व्यवहारात मुरलेली असते आणि म्हणून अनेक संबंधित भेद करण्याची कुवत भाषेने कमावलेली असते. ह्यासाठी आवश्यक असलेला शब्दसमूह भाषेत स्थिर झालेला असतो. कोणत्या प्रसंगी ह्या शब्दसमूहातील कोणता शब्द वापरणे उचित, बरोबर असते याविषयीचे संकेत रूढ झालेले असतात. ह्या भाषिक व्यवहाराचे नीट निरीक्षण केल्याने पारंपरिक तत्त्वज्ञानातील अनेक समस्या आपल्याला सुसंगतपणे मांडताच येत नाहीत, असे दिसून येईल किंवा त्यांच्यावर नवा प्रकाश पडेल. उदा., बाह्य भौतिक वस्तू आपल्या अनुभवाचे साक्षात विषय नसतात. आपल्या अनुभवात ज्यांचा आपल्याला साक्षात प्रत्यय येतो ती वेदनदत्ते (Sense Data) असतात, अशी एक पारंपरिक तत्त्वज्ञानातील उपपत्ती आहे. ह्या वेदनदत्तांचा व बाह्य भौतिक वस्तूंचा संबंध काय असावा, ह्याची बरीच चर्चा पारंपरिक तत्त्वज्ञानात झाली आहे. पण ‘साक्षात अनुभव येणे’ किंवा ‘भौतिक वस्तू’ हे तत्त्ववेत्त्यांनी निर्माण केलेले शब्दप्रयोग आहेत. साक्षात पहाणे कशापासून भिन्न आहे, असे कल्पिण्यात येत आहे? अप्रत्यक्षपणे पाहणे म्हणजे कसे पहाणे? एखाद्या वस्तूचे आरशातील प्रतिबंब पहाणे म्हणजे ती वस्तू अप्रत्यक्षपणे पाहिली असे होते काय? बाह्य वस्तू म्हणजेच भौतिक वस्तू काय? झाडाची सावली ही बाह्य वस्तू आहे की नाही? तळ्यातले प्रतिबिंब बाह्य वस्तू आहे की नाही? ह्या भौतिक वस्तू आहेत काय? भौतिक वस्तू आणि वेदनदत्ते यांमधील विरोध वास्तवता आणि आभास यांमधील विरोधासारखा आहे, असेही मानण्यात येते. आता ‘वास्तवता’ आणि ‘आभास’ ह्या पदांशी संबंधित अशी अनेक पदे आहेत आणि ती विचारात घेतली, तर ‘वास्तवता व आभास’ असा काही सरळ भेद नाही हे दिसून येते. उदा., खराखुरा वाघ आणि पेंढा भरून ठेवलेला वाघ, नैसर्गिक फुले आणि कृत्रिम (कागदी) फुले, खरेखरे सोन्याचे दागिने व नकली दागिने, खरे लोणी व सिंथेटिक लोणी (सिंथेटिक लोणी हे नकली लोणी नसते, बनावट लोणी नसते, ते ‘कृत्रिम’ असले, तरी आपण ज्यासाठी वापरतो त्यासाठीच सिंथेटिक लोणी वापरतो; पण फुले ज्यासाठी वापरतो त्यासाठी कागदी फुले वापरीत नाही इत्यादी).

आपल्या नेहमीच्या भाषेतील परस्परसंबंधित पदसमूहातील वेगवेगळ्या पदांच्या वापराचा आपण असा सूक्ष्म अभ्यास केला, तर पारंपरिक तत्त्वज्ञानातील समस्यांवर जसा नवीन प्रकाश पडेल तसेच आपल्या भाषेचेही आपले आकलन सुव्यवस्थित व सखोल होईल, असे ऑस्टिन याचे म्हणणे होते. उदा., ‘मी आता मुंबईला जातो’ हे वाक्य मी कोणते कृत्य करणार आहे किंवा कोणते कृत्य करण्याचा माझा इरादा आहे, हे सांगण्यासाठी वापरण्यात येते. पण ‘मी उद्या तुला शंभर रूपये देईन असे वचन मी तुला देतो’ हे वाक्य जर मी योग्य प्रसंगी उच्चारले, तर हे वाक्य उच्चारण्याने मी वचन देण्याची कृती केली असे होते. वचन देण्याची कृती करण्याचा माझा उद्देश आहे असे सांगणे हे हे वाक्य उच्चारण्याचे प्रयोजन नाही, तर हे वाक्य उच्चारणे म्हणजेच वचन देण्याची कृती करणे होय. ह्या प्रकारच्या उक्तींना ऑस्टिन उक्तिकृती (Performative) असे म्हणतो. ह्या संकल्पनेचा विकास करून वेगवेगळ्या स्वरूपाच्या भाषिक कृतींमधील भेद त्याने स्पष्ट केले आहेत आणि त्यांतील परस्परसंबंध दाखवून दिले आहेत. उदा., न्यायाधीश न्यायालयात आरोपीला ‘तुम्हाला एक वर्षाची सक्तमजुरीची सजा फर्माविण्यात येते आहे’, हे वाक्य उच्चारून शिक्षा फर्मावतो. हे वाक्य त्याने उच्चारल्याने शिक्षा फर्मावली गेली असे होते. न्यायाधीशाने हे वाक्य उच्चारल्यामुळे आरोपीच्या बायकोला दुःख होते आणि तीही न्यायाधीशाकडून झालेली कृती होय असे म्हणावे लागते. पण हे वाक्य उच्चारण्यात होणारी कृती (उक्त्यंतर्गत कृती) आणि हे वाक्य उच्चारण्याच्या द्वारा कृती (उक्तिद्वारा कृती) यांच्यात भेद करावा लागतो.

भाषिक विश्लेषणाचा आग्रह सॉक्रेटिसपासून धरला गेला. ज्ञान, सद्गुण, न्याय, राज्य, शिक्षण या संकल्पनांचा चिकित्सक विचार करण्यास त्याने जनसामान्यांस भाग पाडले. असा ऊहापोह करण्याची गरज असून हे तत्त्वज्ञाचे एकमेव कार्य आहे असे मानून जी चळवळ विसाव्या शतकात झाली, तिला ‘ॲनालिटिकल मूव्हमेंट’ म्हणतात. फ्रेग, रसेल, मूर यांनी तार्किक व्याकरण कसे एरवी आपण ज्याला व्याकरण म्हणतो त्याहून वेगळे असते, ते स्पष्ट केले. तत्त्वज्ञानातील सर्व समस्या या दोहोंमध्ये गल्लत केल्याने उद्भवतात. हाच धागा पकडून श्लिक, कारनॅप, एअर, हेअर, न्यूराथ, हेम्पेल, वाइजमन या तार्किक प्रत्यक्षार्थवाद्यांनी पारलौकिकाचे वर्जन केले व तत्त्वज्ञाचे भाषिक विश्लेषणाचे कार्य अधोरेखित कले. विश्लेषणाने सुस्पष्टता येते व तत्त्वज्ञानातील समस्या कशा विरतात/विरघळतात (Dissolve), हे व्हिट्‍गेन्श्टाइनने दाखवले व इतरांस हा मार्ग प्रेरक ठरला.

तत्त्वज्ञांनी भाषिक विश्लेषण करावे, याबाबत एकवाक्यता असली, तरी नेमक्या कोणत्या भाषेतील संकल्पनांचे विश्लेषण करावे−पारिभाषिक की सर्वसामान्य−याबाबत मतमतांतरे आहेत. राइल, ऑस्टिन, स्ट्रॉसन आदींनी दैनंदिन भाषेतील सर्वसामान्य संकल्पनांचे विश्लेषण करण्याचा आग्रह धरला. म्हणून त्यांना ‘ऑर्डिनरी लँग्वेज फिलॉसॉफर्स’ म्हटले जाते. द कन्सेप्ट ऑफ माइंड या ग्रंथात राइलने ‘मन’ ह्या संकल्पनेचे विश्लेषण करून त्याबाबतचे गूढ, आध्यात्मिक वलय दूर केले. भाषिक विश्लेषणाच्या चळवळीने ऑक्सफर्ड व केंब्रिज विद्यापीठांत मूळ धरल्याने ह्या प्रकारच्या तत्त्वज्ञानास ‘ऑक्सब्रिज फिलॉसफी’ असेही म्हटले जाते. राइल, ग्राइस, हेअर, स्ट्रॉसन, डमेट यांनी ऑक्सफर्डहून; तर विजडम, मूर, रसेल, व्हिट्‍गेन्श्टाइन यांनी केंब्रिजहून; तर क्वाइन, डेविडसन, पटनॅम, क्रिप्के यांनी अमेरिकेतून विश्लेषणकार्य केले. राइलच्या पुढाकाराने ॲनालिसिस हे विश्लेषक तत्त्वज्ञानाला वाहिलेले नियतकालिक १९३३ पासून सुरू झाले. शिवाय विश्लेषक तत्त्वज्ञानाला चालना देणारी केंद्रे, संस्था यूरोप-अमेरिकेत आजही कार्यरत असून यूरोपियन सोसायटी फॉर ॲनालिटिक फिलॉसफी (ESAP) ही संस्था यासाठी अग्रभागी आहे.

संदर्भ :

  • Austin, john, Philosophical Papers, Oxford, 1961.
  • Ayer, A. J. The Revolution in Philosophy, London, 1963.
  • Dummett, Michael, Origins of Analytical Philosophy, Cambridge, 1993.
  • Flew, A. Ed. Essays in Conceptual Analysis, London, 1956.
  • Jackson, Frank, From Metaphysics to Ethics : A Defence of Conceptual Analysis, Oxford, 1998.
  • Urmson, J. O. Philosophical Analysis : Its Development Between the Two World Wars, Oxford, 1976.
  • Warnock, G. English Philosophy since 1900, London, 1958.
  • Wittgenstein, Ludwig Trans. Anscombe, G. E. M. Philosophical Investigations, Oxford, 1953.

                                                                                                                                                                   समीक्षक – शर्मिला वीरकर