मेजर थॉमस कँडी : (१३ डिसेंबर १८०४–२६ फेब्रुवारी १८७७). एकोणिसाव्या शतकातील एक प्रसिद्ध इंग्रजी-मराठी कोशकार व शिक्षणतज्ज्ञ. त्यांचा जन्म ईस्ट नॉयले (व्हिल्टशर, इंग्लंड) येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांनी मॅग्डेलेन कॉलेज (ऑक्सफर्ड विद्यापीठ) येथे शिक्षण घेतले.

कँडीने १८२२ मध्ये भारतीय भाषांचे अभ्यासपूर्वक ज्ञान संपादन केल्यामुळे त्यांची ईस्ट इंडिया कंपनीतील पायदळात दुभाषी व क्वार्टर मास्टर ह्या पदांवर शिफारस करण्यात आली. त्यांनी भारतातील ब्रिटिश लष्करात लेफ्टनंट, कॅप्टन व मेजर ह्या हुद्द्यांवर काम केले; तथापि त्यांच्याकडे दुभाषाचेच प्रमुख काम असे. पुढे जेम्स मोल्सवर्थ यांनी त्यांस आपल्या इंग्रजी-मराठी कोशकामासाठी साहाय्यक म्हणून घेतले. दरम्यान मोल्सवर्थ हे इंग्‍लंडला गेल्यामुळे हे काम लांबणीवर पडले. या वेळी कँडी यांनी सरकारी नियमावलीतील मराठी भाषांतरातील काही चुका दुरुस्त केल्या. तेव्हा १८३५ मध्ये सरकारने हिंदु कॉलेज व दक्षिणेकडील सरकारी शाळा यांचा सुपरिटेंडेंट म्हणून त्यांची नेमणूक केली. त्यांनी अपूर्ण राहिलेल्या इंग्रजी-मराठी कोशाचे काम स्वीकारले आणि परिश्रम घेऊन सहा-सात वर्षांत (१८४० ते ४७) पूर्ण केले. ह्या कामी त्यांस पुण्याच्या पाठशाळेतील अनेक विद्वान पंडितांचे साहाय्य मिळाले; कारण त्यांच्याकडे १८३७ मध्येच पुणे पाठशाळेच्या मुख्याध्यापकाचे कामही आले होते. कोशाच्या कामानंतर त्यांनी आपले सर्व लक्ष मराठी पाठ्यपुस्तके व इंग्रजी ग्रंथांचे सुगम भाषांतर यांवर केंद्रित केले. याशिवाय ते इतरांनी केलेल्या भाषांतरात दुरुस्त्या व सुधारणा करीत असे. सुबोध, सुटसुटीत व सुसूत्र भाषेवर त्यांचा कटाक्ष असे. अशाप्रकारे नीतिज्ञानाची परिभाषा (१८४८), द इंडियन पीनल कोड (१८६०), न्यू पीनल कोड इत्यादी अनुवादित मराठी पुस्तके त्यांनी प्रसिद्ध केली. याशिवाय त्यांनी इसापनीतिकथा, हिंदुस्थानचा इतिहास, बाळमित्र, हिंदुस्थानातील इंग्‍लिशांच्या राज्याचा इतिहास वगैरे भाषांतरित पुस्तके त्यांनी तपासली व त्यांत भाषेच्या दृष्टीने अनेक मौलिक दुरुस्त्या व सुधारणा केल्या. पाठ्यपुस्तकांबाबतचे त्यांचे धोरण समंजस व तत्कालीन शिक्षणास पोषक होते. त्यांनी केलेल्या व सुचविलेल्या पाठ्यपुस्तकांबाबतच्या सुधारणा विधायक आहेत. त्यांच्या या कार्यामुळे पुढे त्यांस पूना कॉलेजचे प्राचार्यपद देण्यात आले (१८५१-५७). १८६७ मध्ये काही दिवस ते डेक्कन कॉलेजमध्ये प्राध्यापकही होते. अखेरच्या दिवसांत ब्रिटिश सरकारच्या प्रमुख भाषांतरकर्त्याचे कामही त्यांच्याकडे सोपविण्यात आले होते.

कँडी यांनी जवळजवळ तीस-बत्तीस वर्षे मराठी भाषेची सेवा केली. मराठी भाषेस आधुनिक वळण लावण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे. आधुनिक मराठीच्या ग्रांथिक शैलीवर त्यांची फार मोठी छाप आहे. शाळा-खात्याशी व दक्षिणा प्राइझ कमिटीशी कँडी यांचा अधिकारी या नात्याने संबंध होता.  ग्रंथपरीक्षण, मुद्रणालय व भाषांतर यासंबंधीही ते प्रमुख होते. मराठी कोशरचना व व्याकरण तयार  करण्यात त्यांचा हात होता. मराठी पाठ्यपुस्तके तयार करून घेणे, ग्रंथांच्या नवीन आवृत्त्या तयार करणे इत्यादी कामेही सरकारने त्यांच्याकडेच सोपविली होती. अव्वल इंग्रजीच्या आरंभकाळात वाक्यरचनेतील शैथिल्य व अनियमितपणा काढून तिला बंदिस्तपणा आणण्याचे श्रेय कँडी यांनाच द्यावे लागेल. मराठी भाषेत विरामचिन्हे वापरण्याची पद्धती प्रथम कँडीनेच सुरू केली. मराठी भाषेच्या दृष्टीने इंग्रजी-मराठी कोश हे त्यांचे चिरंतन कार्य होय.

कँडी यांनी विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील अशी पुढील ग्रंथ लिहिली. नीतिबोधकथा (१८३१), नवीन लिपिधारा, विरामचिन्हांची परिभाषा (१८५०), वाचनपाठमाला (१८५०), भाषणसांप्रदायिक वाक्ये (१८५८), हिंदुस्थानचे वर्णन (१८६०) इत्यादी.

कँडी यांचे भारतात महाबळेश्वर (माल्कमपेठ) येथे निधन झाले.

समीक्षक – संतोष गेडाम

प्रतिक्रिया व्यक्त करा