शंकरशेट, जगन्नाथ : (१० फेब्रुवारी १८०३–३१ जुलै १८६५). महाराष्ट्रातील एक थोर समाजसेवक, शिक्षणप्रेमी व आधुनिक मुंबईच्या शिल्पकारांपैकी एक. त्यांचे पूर्ण नाव जगन्नाथ शंकरशेट मुर्कुटे; तथापि ते नाना शंकरशेट या नावानेच अधिक परिचित आहेत. त्यांचा जन्म एका दैवज्ञ ब्राह्मण व्यापारी कुटुंबात ठाणे जिल्ह्यातील मुरबाड गावी झाला. त्यांचे वडील व्यापारासाठी मुंबईस आले. म्हैसूरच्या १७९९ च्या टिपू-इंग्रज युद्धात वडिलांना अमाप पैसा मिळाला. आई भवानीबाई नानांच्या लहानपणीच वारली. नानांनी तिच्या स्मरणार्थ पुढे गोवालिया तलावाजवळ भवानी शंकर मंदिर व एक धर्मशाळा बांधली. नानांचे वडील १८२२ मध्ये वारले व तरुणपणीच त्यांच्यावर प्रपंचाची व व्यापाराची सर्व जबाबदारी पडली.
नाना शंकरशेट यांनी जवळजवळ अर्धशतकाच्या कालावधीत मुंबईच्या व पर्यायाने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाचा, राजकीय चळवळींचा आणि अनेकविध लोककल्याणकारी अशा सुधारणांचा पाया घातला. त्यांच्यावर सर जमशेटजी जिजिभाईंची छाप पडली होती. हिंदवासीयांत शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे, यासाठी एल्फिन्स्टन यांनी १८२२ मध्ये हैंदशाळा व शाळापुस्तक मंडळी काढली; त्यांचे आधारस्तंभ नानाच होते. ही पहिली शैक्षणिक संस्था स. का. छत्रे यांच्या साह्याने स्थापिली. पुढे हिचे १८२४ मध्ये बाँम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीत रूपांतर झाले. एल्फिन्स्टननंतर उच्च शिक्षणाच्या सोयीसाठी ४,४३,९०१ रुपयांचा एल्फिन्स्टन फंड जमविण्यात आला. त्याचे नाना हे विश्वस्त राहिले. या संस्थेचे एल्फिन्स्टन कॉलेज झाल्यावर (१८३७) तिला एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूट म्हणण्यात येऊ लागले. १८५६ मध्ये महाविद्यालय व विद्यालय पृथक झाले. १८४१ मध्ये बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना झाली. बोर्डातील तीन एतद्देशीय सभासदांत सतत सोळा वर्षे नाना निवडून आले. स्टुडंट्स लिटररी व सायन्टिफिक सोसायटी (१८४८) आणि जगन्नाथ शंकरशेट मुलींची शाळा (१८४९) स्वतःच्या वाड्यात त्यांनी चालू केली; तसेच द जगन्नाथ शंकरशेट फर्स्ट ग्रेड अँग्लो व्हर्नाक्युलर स्कूल १८५७ मध्ये सुरू केले. १८५५ मध्ये त्यांनी विधी महाविद्यालयाचा पाया घातला. सर ग्रँटच्या मृत्यूनंतर १८४५ मध्ये ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना करून येथे आंग्ल वैद्यक-शिक्षणाची सोय त्यांनी केली व तेही पुढे मराठीतून देण्याची व्यवस्था केली. अॅग्रि-हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया व जिऑग्रॅफिकल सोसायटी या संस्थांचे प्रमुख व अध्यक्ष नाना शंकरशेट होते. या शैक्षणिक कामाशिवाय त्यांनी द बाँबे असोसिएशन स्थापण्यात १८५२ मध्ये पुढाकार घेतला. मुंबई कायदे मंडळाच्या आरंभीच्या सभासदांत ते प्रमुख होते.
नानांचे सामाजिक कार्यही मोठे आहे. त्यांनी सतीच्या चालीस बंदी घालणाऱ्या कायद्यास पाठिंबा दिला. सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे, या तत्त्वावर स्त्रीशिक्षणास प्राधान्य दिले. भारतीयांना कलाशिक्षण मिळावे, म्हणून सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या स्थापनेत सक्रिय भाग घेतला. याशिवाय ग्रँड ज्यूरीत भारतीयांचा समावेश व्हावा, तसेच जस्टिस ऑफ द पीस अधिकार भारतीयांस मिळावा, यासाठी त्यांनी खटपट केली व काही अधिकार मिळविले. महानगरपालिकेत आयुक्त असताना त्यांनी आरोग्यव्यवस्था, विहिरी, तलाव वगैरे योजना अमलात आणल्या. गॅस कंपनी सुरू केली; धर्मार्थ दवाखाना काढून तसेच पुढे जे. जे. हॉस्पिटलचा पाया घालून त्यांनी रुग्णसेवेस चालना दिली. बाँबे स्टीम नॅव्हिगेशन कंपनीची स्थापना, नाटकांचे प्रेक्षागृह, सोनापूरच्या स्मशानभूमीचे रक्षण याही गोष्टींचे श्रेय नानांनाच द्यावे लागेल.
सामान्य नागरिकांना लांब पल्ल्याच्या प्रवासापासून होत असलेला त्रास लक्षात घेऊन नानांनी १८४३ साली रेल्वेची कल्पना सत्यात उतरविण्यासाठी ग्रेट ईस्टर्न कंपनीची स्थापना केली. त्यांच्या दहा वर्षांच्या अथक प्रयत्नांतून १६ एप्रिल १८५३ रोजी आशिया खंडातील पहिली रेल्वे (Railway) बोरीबंदर ते ठाणे या लोहमार्गावर धावली. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना ‘भारतीय रेल्वेचे जनक’ म्हणून ओळखले जाते.
नानांनी अनेक मान्यवर संस्थांना देणग्या दिल्या : रॉयल एशियाटिक सोसायटीच्या मुंबई शाखेला रु. ५,०००; व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयाला रु. ५,०००; जगन्नाथ शंकरशेट स्कूलला रु. ३०,०००; एल्फिन्स्टन शिक्षण निधीस रु. २५,००० आणि जिजामाता (राणीच्या) बागेसाठी रु. २५,०००.
देशाच्या सर्वांगीण सुधारणेच्या साऱ्या चळवळींत पुढाकार घेणाऱ्या या थोर पुरुषाचा पुतळा जिजामाता बागेत उभारण्यासाठी लोकांनी स्वेच्छेने २५,००० रु जमविले होते. १८५७ मध्ये आलेले किटाळ पूर्णतः दूर होऊन त्यांचे कार्य अधिकच चमकले.
नानांचे मुंबई येथे देहावसान झाले. नानांच्या स्मरणार्थ मॅट्रिकला संस्कृत विषयात पहिला येणाऱ्या विद्यार्थास शंकरशेट शिष्यवृती देण्यात येऊ लागली.
संदर्भ :
- करमरकर, स. श्री., मान्यवर नामदार जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेट चरित्र-सार, अलीबाग, १९३०.
- कुलकर्णी, पु. बा., ना. नाना शंकरशेट यांचे चरित्र, मुंबई, १९५९.
समीक्षक – संतोष गेडाम