समोच्चतादर्शक रेषा. भूपृष्ठावरील समुद्रसपाटीपासून समान उंचीच्या स्थळांना जोडणाऱ्या काल्पनिक रेषांना समोच्च रेषा म्हणतात. स्थलवर्णनात्मक नकाशांत भूप्रदेशाचा उठाव दाखविण्यासाठी समोच्च रेषांचा वापर केला जातो. भूप्रदेशाचे उठाव दाखविण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींपैकी ही एक सोपी, दर्जेदार, शास्त्रशुद्ध, अत्याधुनिक व सोयीस्कर पद्धत आहे. ज्या प्रदेशाचा समोच्चदर्शक रेषा नकाशा तयार करायचा आहे, त्या प्रदेशाची प्रत्यक्ष मोजणी करून त्यातील वेगवेगळ्या स्थानकांची समुद्रसपाटीपासूनची उंची (स्थल उच्चांक) नकाशावर मांडून घेतली जाते. त्यांनतर त्यातील समान उंचीची स्थानके एकमेकांना जोडून समोच्च रेषा तयार होतात. या एक प्रकारच्या उंचीदर्शक सममूल्य रेषा असतात. मूल्यदर्शक अंक त्या त्या समोच्च रेषेवर लिहिलेले असतात. स्थलवर्णनात्मक रंगीत नकाशात समोच्च रेषांचा रंग तपकिरी असतो. थोड्या अभ्यासाने व सरावाने अशा नकाशाच्या निरीक्षणाने उठावाचे सामान्य स्वरूप किंवा प्रदेशाच्या उंच-सखलपणाची, उंचीची व उताराची कल्पना येते. या रेषा दाखविल्याने नकाशावरील इतर मूळ तपशीलांची स्पष्टता कमी होत नाही. उठाव दाखविण्याच्या इतर पद्धतींत समोच्च रेषा हा मूळ आधार मानला जातो. उदा., रंगपद्धती. सुरुवातीच्या काळातील हे नकाशे प्रामुख्याने फलकयंत्र व दुर्बिणयुक्त दृष्टिक्षेपकाच्या साहाय्याने व त्रिकोणीकरण पद्धतीने भूमापन करून तयार करण्यात आले. हल्लीच्या काळात हवाई सर्वेक्षण छायाचित्रे व त्रिमितीय पद्धतींचा वापर समोच्च रेषा नकाशा निर्मितीत केला जातो; मात्र त्यासाठी भूमापन सर्वेक्षण पद्धतीने तयार केलेल्या नकाशातील महत्त्वाच्या संदर्भस्थानांची केलेली स्थाननिश्चिती व त्यांची उंची यांचा वापर केला जातो.

लगतच्या दोन समोच्च रेषांमधील उंचीतील फरकास ‘समोच्च रेषांतर’ असे म्हणतात. नकाशात समोच्च रेषा ठराविक समोच्च रेषांतराने काढलेल्या असतात. दोन रेषांमधील हे उंचीचे किंवा उभे अंतर त्या त्या नकाशाच्या प्रमाणावर अवलंबून असते. वेगवेगळ्या प्रमाणावर तयार केलेल्या नकाशातील समोच्च रेषांतर भिन्नभिन्न असते. हे अंतर जर मोठे असेल, तर लहानलहान टेकड्यांसारखी भूस्वरूपे समोच्च रेषांनी दाखविणे शक्य होत नाही. अगदी छोट्या प्रदेशाच्या नकाशात समोच्च रेषांतर कमीतकमी १ फूट किंवा ०·५ मीटर, तर खंडासारख्या प्रदेशाच्या नकाशात समोच्च रेषांतर १,००० फूट किंवा १,००० मी. पर्यंतही असते.

‘भारतीय सर्वेक्षण विभागा’कडून वेगवेगळ्या प्रमाणांवरील भारतीय क्षेत्रमापन स्थलनिर्देशक नकाशे तयार केले आहेत. या विभागाचे मुख्य कार्यालय डेहराडून येथे आहे. ब्रिटिश मापन पद्धतीनुसार तयार करण्यात आलेल्या या नकाशांपैकी १ इंचास १ मैल (एक इंची नकाशे) या प्रमाणावरील नकाशांत समोच्च रेषांतर ५० फूट असते. १ इंचास २ मैल (अर्धा इंची नकाशे) प्रमाणाच्या नकाशात हे समोच्च रेषांतर १०० फूट, तर १ इंचास ४ मैल (पाव इंची नकाशे) या प्रमाणाच्या नकाशात हे अंतर २५० फूट असते. १९६० नंतर भारतीय सर्वेक्षण विभागाने या नकाशांचे मेट्रिक मापन पद्धतीमध्ये रूपांतर केले. या नकाशांत सेंटिमीटरसाठी किलोमीटर असे प्रमाण असून समोच्च रेषांतर मीटरमध्ये दाखविले आहे. या नकाशांपैकी १ : ५०,००० या प्रमाणावरील नकाशांत समोच्च रेषांतर २० मीटर, १ : १,००,००० प्रमाणाच्या नकाशात ४० मीटर, १ : २,५०,००० प्रमाणाच्या नकाशात १०० मीटर आणि १ : १०,००,००० (दशलक्ष नकाशे) प्रमाणाच्या नकाशात समोच्च रेषांतर ४०० मीटर आहे. १ : २५,००० या प्रमाणावर तयार करण्यात आलेल्या नागरी व पर्यटन स्थळांच्या नकाशात समोच्च रेषांतर १० मीटर आहे.

समोच्च रेषांमधील आडव्या (क्षितिजसमांतर) अंतरावरून प्रदेशाच्या उताराचे स्वरूप (उतारमान) लक्षात येते. नकाशात समोच्च रेषा परस्परांपासून दूरदूर अंतरावर काढलेल्या असतील, तर त्या भूपृष्ठाचा मंद उतार दर्शवितात. त्या जर जवळजवळ काढलेल्या असतील, तर शीघ्र उतार दर्शवितात. समान अंतरावर काढलेल्या समोच्च रेषा सम उतार, तर असमान अंतरावर काढलेल्या समोच्च रेषा विषम उतार दर्शवितात. अंतर्वक उतारात कमी उंचीच्या प्रदेशाकडून (पायथ्याकडून) जास्त उंचीच्या प्रदेशाकडे (माथ्याकडे) समोच्च रेषांमधील अंतर कमीकमी होत जाते, तर बहिर्वक उतारात कमी उंचीच्या प्रदेशाकडून जास्त उंचीच्या प्रदेशाकडे समोच्च रेषांमधील अंतर वाढत जाते. ज्या वेळी दोन किंवा तीन समोच्च रेषांचे गट परस्परांपासून दूरदूर अंतरावर काढलेले असतात, तेव्हा त्यांपासून पायऱ्यापायऱ्याचा उतार दर्शविला जातो. शंकू टेकडीमध्ये समोच्च रेषा जवळजवळ वाटोळ्या असतात, तसेच कमी मूल्य असलेल्या रेषा बाहेरच्या बाजूस व जास्त मूल्य असलेल्या रेषा मध्यवर्ती भागात असतात.

समोच्च रेषा नकाशात कोणतीही समोच्च रेषा नकाशाच्या मध्यभागात कोठेही तुटत नाही किंवा ती अपूर्ण असत नाही. नकाशाच्या एका कडेपासून दुसऱ्या कडेपर्यंत किंवा आतील बाजूस पूर्ण होतात. नकाशात दोन किंवा अधिक समोच्च रेषा कधीही एकमेकींस मिळत नाहीत किंवा छेदत नाहीत. केवळ धबधबा, कडा व समुद्रकडा या अपवादात्मक भूविशेषातच दोन किंवा अधिक समोच्च रेषा एका बिंदूत येऊन मिळतात. उठावाच्या स्वरूपानुसार समोच्च रेषांना आकार प्राप्त होतो. उदा., व्ही (V) आकाराची दरी दाखविताना या रेषा व्ही आकाराच्या होतात, यू (U) आकाराची दरी दाखविताना यू आकाराच्या होतात, तर शंकू टेकडी दाखविताना त्या गोलाकार होतात. नकाशावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषेवर उठावाचा छेद घेतल्यास, त्या उठावाचे स्वरूप तसेच त्या दोन ठिकाणांमधील आंतरदर्शनीयता समजते. नदीप्रवाहाची पार्श्विका (प्रोफाइल) घेतल्यास त्यावरून तिच्या पात्राचे स्वरूप, ढाळमान, पात्रातील धबधबे इत्यादी गोष्टी समजतात.

या नकाशांत संबंधित प्रदेशातील अतिशय बारिकसारिक गोष्टी दाखविलेल्या असतात. त्यामुळे लष्करी दृष्ट्या समोच्च रेषा नकाशे अत्यंत महत्त्वाचे असल्याने त्यांची निर्मिती प्रामुख्याने सैनिकी अभियंत्यांकडून केली जाते. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे समोच्च रेषा नकाशे मुख्यत: तेथील भूविज्ञान सर्वेक्षण विभागाकडे असतात. ब्रिटिश नकाशे ‘ऑर्डनन्स सर्व्हे डिपार्टमेंट’ यांच्याकडे असतात. भारतीय क्षेत्रमापन स्थलनिर्देशक नकाशे ‘भारतीय सर्वेक्षण विभागा’च्या अखत्यारीत येतात. हे लष्करी दृष्ट्या महत्त्वाचे असल्याने इतर नकाशांप्रमाणे ते बाजारात उपलब्ध होत नाहीत. काही विशिष्ट शासकीय कार्यालये व शैक्षणिक संस्था यांना आवश्यकतेनुसार व पूर्व परवानगीने हे नकाशे उपलब्ध होतात. कोणत्याही क्रमिक पुस्तकांत किंवा इतर ग्रंथांमध्ये नकाशा छापावयाचा असल्यास, त्यासाठी ‘भारतीय सर्वेक्षण विभागा’ची रीतसर परवानगी घेणे आवश्यक असते. संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रदेश, संवेदनशील प्रदेश, धरणांची क्षेत्रे इत्यादी प्रदेशांतील भारतीय क्षेत्रमापन स्थलनिर्देशक नकाशे तर निर्बंधितच केलेले असतात.

समीक्षक : माधव चौंडे