भूता कोला : कर्नाटक राज्याच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यातील किनारपट्टीवरील कलाप्रकार.विशिष्ट्य समुदायाकडून होणाऱ्या देवाचाराच्या पूजेला भूता म्हणतात.दक्षिण कर्नाटकातील भूता कलाप्रकार आणि केरळमधील थय्यम कलाप्रकारात विलक्षण साम्य आहे. भूता ही देवता सांस्कृतिक नायक म्हणून पुजली जाते.तुलू भाषेत या देवतेचे जीवनचरित्र तसेच तिच्या स्थलांतराची माहिती कथागायनाद्वारे सादर केली जाते. याला पड्डाना असे म्हणतात.पड्डाना हे भूता या देवतेचे महाकाव्य होय.

कर्नाटकात कोटी चेन्नया आणि श्री पड्डाना ही महाकाव्ये अतिशय लोकप्रिय असून अनेक संशोधकांनी ती संकलित केली असून लिखित स्वरुपात प्रकाशित केली आहेत.फिनलंडचे लोकसाहित्य अभ्यासक लॉरी होन्को यांनी श्री पड्डाना हे महाकाव्य प्रकाशित केले आहे. भूता सदर करणारे कलावंत विशिष्ट् समाजातील विशिष्ट् कुटुंबातील असतात.भूता सदर करणे ही या समाजाची प्रवृत्ती असते.विशिष्ट पर्यावरणाशिवाय सादर होणाऱ्या अधार्मिक भूता प्रयोगांना या समाजाचा विरोध असतो.देवता संचार झालेली व्यक्ती वाद्यांच्या तालावर नृत्य करीत असते आणि देवतेचा संचार या स्थळी का व कसा झाला याची कथा सांगत असते.हे एक प्रकारचे विधीनाट्य असते, ज्यात देवता प्रसन्न होवून आशीर्वाद देते.या देवतेची रंगभूषा आणि वेशभूषा अतिशय आकर्षक असते.या विधीनाट्यात लोककलेची सर्व वैशिष्ट्ये आढळतात.कर्नाटकच्या किनारपट्टीवरील बहुतांश लोक मुंबई आणि दुबईल स्थायिक झाल्यामुळे या प्रयोगांना व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले आहे.

संदर्भ : https://www.sahapedia.org/dance-spirits-bhuta-kola-dakshin-kannada

मराठी भाषांतर : प्रकाश खांडगे