गोरवारा कुनिथा : कर्नाटकातील धार्मिक लोकनृत्य. ते मैलारलिंग या देवतेच्या उत्सवात सादर केले जाते.कर्नाटकातील कुरुबा गौदास ह्या जमातीतील लोक मैलार लिंगाच्या भक्तीपोटी दीक्षा घेतात.दिक्षितांना गोरवारा म्हणून ओळखले जाते.हेच गोरवारा लोक मैलारलिंग या इष्टदेवाच्या स्तुतीसाठी गाणी गाऊन हे नृत्य सादर करतात.डमरू आणि बासरी ही गोरवारा नर्तकांची मुख्य वाद्ये आहेत.या नृत्यात नर्तक अस्वलाच्या त्वचेने बनविलेली टोपी आणि काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करतात.

मैलारलिंग परंपरेचे वाहक म्हणून गोरवारा जमातीतील लोक ओळखले जातात.महाराष्ट्रातील खंडोबा परंपरा तसेच दक्षिणेतील मल्लाणा यांचे साम्य मैलारलिंग परंपरेशी आहे.मैलारलिंग याच्या जीवनावर आधारित अद्भूतरम्य दीर्घ महाकाव्याचे सादरीकरण या नृत्यात केले जाते.मैलार देवता हा शिवाचा अवतार आहे.मणी आणि मल्ल या दैत्यांचा नि:पात करण्यासाठी शिवाने पृथ्वीतलावर मार्तंड भैरवाचा अवतार घेतला. मैलाराच्या यात्रेत सहभागी होणारे भक्त स्वतःला सैनिक समजतात. वाघे मैलाराचे उपासक म्हणून नृत्य करतात.दिवटे रात्री दिवट्या प्रज्वलित करतात आणि घंटानाद करून जणू युद्ध सज्जतेची वर्दी देतात.डमरूच्या तालावर त्यांचे नृत्य सुरु असते.मैलारलिंगाची कथा ते नृत्य गायनाद्वारे सदर करतात.

संदर्भ : https://www.janapadaloka.in/articles/7/Goravara-Kunitha–A-dance-of-the-Shiva-cult/

मराठी भाषांतर : प्रकाश खांडगे