आधुनिक विज्ञानानुसार व्यक्तीचे विचार, भाव-भावना, बुद्धी, जाणीवा या सर्वांचे केंद्र हे मेंदू आहे. परंतु, या भौतिक अवयवाच्या पलिकडे जाऊन एक अमूर्त असे इंद्रिय असते, ते सूक्ष्म इंद्रिय म्हणजे ‘मन’ होय असे दर्शनशास्त्र मानते. मन हे शरीरात कोठेही दाखवता येत नाही, तरीही अनुभवाद्वारे त्याचे अस्तित्व जाणवते. मन ही संकल्पना आजकालची नसून अगदी वैदिक संहितांपासून मनाविषयी व त्याच्या क्रियाकलापांविषयी विवेचन केलेले दिसून येते. उदा., शुक्ल यजुर्वेदातील शिवसंकल्प-सूक्त म्हणजे आजकाल ज्याला सकारात्मक विचार (पॉझिटिव्ह अफर्मेशन्स) म्हणतो, तसे विचार आपल्या मनात यावेत यासाठी केलेली प्रार्थना होय. उपनिषदांमध्येही मनाविषयी विस्ताराने विवेचन केलेले आढळते.
भारतीय दर्शनांमध्ये मन हेसुद्धा एक तत्त्व म्हणून मानले गेले आहे, परंतु सर्वच दर्शनांमध्ये मनाविषयी अवधारणा एकसारख्या नाहीत; तर त्यामध्ये थोडाफार फरक दिसून येतो. न्याय आणि वैशेषिक दर्शनांमध्ये मन हे आकाराने अतिशय सूक्ष्म परमाणूसारखे मानले आहे. कारण एका क्षणात मन एका ठिकाणी असते व दुसऱ्या क्षणी मन हजारो मैल लांब दुसरीकडे जाऊन पोहोचते. अतिशय सूक्ष्म असल्यामुळे गमनशील असे मन सुख, दु:ख यांचा अनुभव आणि ज्ञान प्राप्त करण्याचे साधन आहे. मन हे ज्ञानाचे साधन आहे तर आत्मा हा ज्ञाता आहे. मन हे आत्मा आणि पाच ज्ञानेंद्रिये यांमधील सेतू आहे. जागृत आणि स्वप्न अवस्थेत क्रियाशील असणारे मन सुषुप्ती अवस्थेमध्ये शरीरातील पुरितत् नावाच्या नाडीत प्रवेश करते. त्या अवस्थेत त्याचा आत्म्याशी संबंध येत नाही व त्यामुळे सुषुप्ती अवस्थेत कोणतेच ज्ञान होत नाही. मन हे उत्पन्नही होत नाही व नष्टही होत नाही त्यामुळे ते ‘नित्य’ आहे. प्रत्येक जीवाचे मन वेगवेगळे असल्यामुळे मनांची संख्या अनंत आहे.
वेदान्त दर्शनानुसार अंत:करणाच्या मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार चार रूपांपैकी मन एक आहे. वस्तुत: अंत:करण हे एकच आहे. जेव्हा अंत:करणाच्या वेगवेगळ्या क्रिया होतात, त्यावेळी अंत:करणाला त्या त्या क्रियेमुळे वेगवेगळी नावे दिली जातात. ज्यावेळी वस्तूचे निश्चित ज्ञान होत नाही आणि ज्यावेळी संशय उत्पन्न होतो, त्यावेळी अंत:करणाला ‘मन’ अशी संज्ञा दिली जाते. ज्यावेळी वस्तूचे यथार्थ आणि निश्चित ज्ञान होते, त्यावेळी अंत:करणाला ‘बुद्धी’ अशी संज्ञा दिली जाते. ज्यावेळी पूर्वी अनुभवलेल्या एखाद्या गोष्टीचे स्मरण होते, तेव्हा अंत:करणाला ‘चित्त’ अशी संज्ञा दिली जाते. ज्यावेळी अंत:करणात ‘अहं’ (मी) अशी अभिमानाची भावना उत्पन्न होते तेव्हा अंत:करणाला ‘अहंकार’ अशी संज्ञा दिली जाते. वेदान्तानुसार मन एक वेगळे तत्त्व किंवा इंद्रिय नसून ती फक्त अंत:करणाची एक अवस्था आहे.
सांख्य दर्शनानुसार मन हे २५ तत्त्वांपैकी एक तत्त्व असून त्याचे कार्य ‘संकल्प करणे’ हे होय. संकल्प करणे म्हणजे ‘एखाद्या वस्तूला पूर्वानुभवाच्या आधारे ओळखणे’. ज्ञानेंद्रिये जेव्हा वस्तूच्या संपर्कात येतात तेव्हा ती इंद्रिये फक्त वस्तूचे निरीक्षण करू शकतात, वस्तूला ओळखू शकत नाही. ओळखण्याचे कार्य मनाद्वारे केले जाते. उदा., डोळे समोर उपस्थित असणाऱ्या हत्तीचे निरीक्षण करू शकतात, पण समोर उभा असणारा प्राणी हा ‘हत्ती’ आहे हे ओळखण्याचे काम इंद्रिये करू शकत नाहीत. कारण एखाद्या वस्तूला ओळखण्यासाठी त्या वस्तूविषयीचे पूर्व ज्ञान व त्याची स्मृती असावी लागते. डोळ्यांनी पूर्वीही हत्ती पाहिला असेल, परंतु पूर्वी पाहिलेल्या हत्तीचा अनुभव इंद्रियांमध्ये साठवून ठेवला जाऊ शकत नाही. कारण इंद्रियांमध्ये ज्ञान साठवून ठेवण्याची योग्यता नाही. अनुभवाद्वारे उत्पन्न होणारे संस्कार फक्त अंत:करणात साठवले जाऊ शकतात. त्यामुळे समोर दिसणाऱ्या हत्तीचे निरीक्षण डोळे करू शकतात, परंतु हा प्राणी हत्ती आहे हे ओळखण्याचे काम अंत:करणाद्वारे होते, तेव्हा त्या अंत:करणाला मन असे म्हणतात. सांख्य दर्शनानुसार मन हे अहंकारापासून, अहंकार बुद्धीपासून आणि बुद्धी प्रकृतीपासून उत्पन्न होते.
योग दर्शनात मनाविषयी महर्षि पतंजलींनी काही विशेष स्पष्टीकरण दिलेले नाही. योगसूत्रांत प्रामुख्याने चित्त या संज्ञेचा वापर केलेला आहे. योगामध्ये चित्त ही संज्ञा मन, अहंकार आणि बुद्धी या तिघांच्या संघातरूप अंत:करणाला व त्यातही मुख्यत्वे बुद्धीसाठी वापरली आहे. पतंजलींनी मन स्थिर होण्यासाठी विशिष्ट अभ्यास सांगितला आहे. योग दर्शनातील मन संकल्पना ही सांख्य दर्शनाप्रमाणेच असावी असे अनुमान करता येते कारण सांख्य आणि योग समानतंत्र दर्शने असल्यामुळे त्यांमधील बरेचसे सिद्धांत समान आहेत. न्याय-वैशेषिक दर्शनांप्रमाणे योग दर्शनात मन परमाणुरूप असू शकत नाही कारण परमाणुरूप मनाच्या वृत्ती असू शकत नाहीत. वेदान्त दर्शनाप्रमाणे योग दर्शनात संशय असणारे अंत:करण मन असू शकत नाही. कारण संशय असलेल्या अवस्थेत मनाला स्थिर करण्यासाठी पतंजलि काही उपाय सांगतील हे शक्य नाही. त्यामुळे सांख्य दर्शनातील संकल्प करणारे अंत:करण म्हणजे मन होय हा सिद्धांत योगानेही स्वीकारला आहे.
चार्वाक दर्शनात केवळ प्रत्यक्ष हेच एकमेव प्रमाण मानल्यामुळे इंद्रियांना न दिसणारे मन त्यांनी स्वीकारलेले नाही. बौद्ध दर्शनातील माध्यमिक संप्रदायानुसार मन आणि जगत् हे दोन्हीही शून्यरूप आहे. योगाचार संप्रदायानुसार चित्त हेच एकमेव सत्य तत्त्व आहे व जगत् चित्ताद्वारे कल्पित आहे. या संप्रदायानुसार चित्त आणि मन यांमध्ये विशेष काही फरक नाही. सौत्रान्तिक आणि वैभाषिक या संप्रदायांमध्ये चित्त आणि जगत् या दोघांना सत्य मानले आहे. परंतु, यांमध्ये मनाविषयी काही विशेष प्रतिपादन आढळत नाही. जैन दर्शनात मन हा शब्द सामान्य रूपाने अंत:करणासाठी वापरला जातो. याप्रमाणे भारतीय दर्शनांमध्ये ‘मन’ या तत्त्वाविषयी विवेचन प्राप्त होते.
समीक्षक : कला आचार्य