योगदर्शन हे भारतीय दर्शनांच्या परंपरेतील वेदांना प्रमाण मानणाऱ्या सहा प्रमुख आस्तिक दर्शनांपैकी एक दर्शन आहे. ‘दृश्यते अनेन इति दर्शनम्’ म्हणजे ‘ज्याद्वारे पाहिले/जाणले जाते ते दर्शन होय’ या व्युत्पत्तीनुसार योग हा ज्ञान प्राप्त करून घेण्याचे एक साधन किंवा दृष्टिकोन आहे. योगाप्रमाणेच सांख्य, न्याय, वैशेषिक, वेदान्त, मीमांसा ही दर्शनेही विश्वाकडे पाहण्याचा वेगवेगळा दृष्टिकोन ठेवतात. म्हणून या सर्वांना दर्शन असे म्हणतात.

प्राचीन काळापासून योगाच्या मुख्यत: दोन परंपरा अस्तित्वात आहेत — एक साधनेची परंपरा आणि दुसरी शास्त्राची परंपरा. योगामधील आसन, प्राणायाम, मुद्रा, बंध, ध्यान इत्यादी विविध साधना स्वत:हून करता येत नाहीत, तर त्या एखाद्या गुरूंकडून शिकल्यावरच करता येतात. या सर्व साधना गुरु-शिष्य परंपरेने आजपर्यंत शिकविल्या तसेच शिकल्या गेल्या आहेत. ही साधनेची परंपरा होय. ज्या ज्या योग्यांनी साधना केली, त्या सर्वांनीच त्यांचे अनुभव ग्रंथरूपात शब्दबद्ध केले, असे नाही. ज्या योग्यांनी ग्रंथांची रचना केली, त्यानुसार शास्त्राची एक परंपराही प्रचलित झाली. या शास्त्रीय परंपरेलाच ‘योगदर्शन’ असे म्हटले जाते. या शास्त्राच्या परंपरेचे, योगदर्शनाचे प्रवर्तक पतंजलि ऋषि मानले जातात. त्यांचा काळ सुमारे इ. स. पूर्व दुसरे शतक मानला जातो. खरे तर योगाच्या साधनेची आणि ग्रंथरचना करण्याची समृद्ध परंपरा पतंजलींच्या आधीही अस्तित्वात होती, परंतु त्यांच्या आधीचा कोणताही ग्रंथ उपलब्ध नसल्यामुळे आणि पतंजलींनी लिहिलेली योगसूत्रे ही निर्दोष, विद्वत्तापूर्ण आणि योगाच्या सर्व आयामांचे वर्णन करणारी असल्यामुळे पतंजलि हेच योगाचे प्रवर्तक आहेत असे मानले जाते. ‘अथ योगानुशासनम्’ या पहिल्याच सूत्रामध्ये पतंजलींनी ‘अनु’ (नंतर) हा उपसर्ग वापरून सूचित केले आहे की, योगावर लिहिलेला हा पहिला ग्रंथ नसून आधीपासून अस्तित्वात असणाऱ्या योगशास्त्राच्या परंपरेचे ते अनुसरण करीत आहेत. ‘अनु’ या उपसर्गाचा अर्थ अनुसरण करणे.

योगसूत्रे सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी लिहिलेली असली तरी आजही त्यांचे महत्त्व आणि स्थान अबाधित आहे. दरम्यानच्या कालावधीत योगसूत्राची जागा घेऊ शकेल असा कोणताही ग्रंथ निर्माण झाला नाही. त्यामुळे योगाच्या शास्त्रीय परंपरेचा प्रमुख ग्रंथ आजही योगसूत्रे  हा असून तो योगदर्शनाचा पाया आहे. या ग्रंथात एकूण १९५ सूत्रे असून ती समाधिपाद, साधनपाद, विभूतिपाद आणि कैवल्यपाद या चार पादांमध्ये विभागलेली आहेत. पतंजलींनी मनाच्या (योगाच्या परिभाषेत चित्ताच्या) अनेक ज्ञात आणि अज्ञात पैलूंवर प्रकाश टाकला आहे. अतिशय कमी शब्दात त्यांनी अनेक विषयांवर महत्त्वपूर्ण विवेचन केले आहे. उदाहरणार्थ, चित्त कसे काम करते; चित्त, शरीर, इंद्रिये आणि आत्मा यांचा परस्पर-संबंध काय आहे; जाग्रत्, स्वप्न आणि सुषुप्ती या वेगवेगळ्या स्थितींमध्ये चित्त काय करते; चित्तामध्ये विचार कसे येतात; विचारांचे नियंत्रण कसे करावे; कर्म-सिद्धांत म्हणजे काय; प्रत्येक जीवाला त्याच्या कर्मानुसार फळ कसे मिळते; चित्तामध्ये सूक्ष्म संस्कार कसे साठविले जातात; एखाद्या व्यक्तीची वर्तणूक कशावरून ठरते; एकाग्रता कशी प्राप्त करावी; ध्यान कसे करावे; सिद्धी म्हणजे नक्की काय; योगाच्या साधनेतील विघ्ने कोणकोणती आहेत; त्यांना कसे पार करावे; आयुष्याचे अंतिम लक्ष्य काय आहे अशा अनेक विषयांचे विवेचन योगसूत्रांमध्ये येते. पाश्चात्य मानसशास्त्रातील अनेक विषय योगसूत्रात आहेतच, तसेच इतरही अनेक विषय या ग्रंथात चर्चिलेले आहे. योगदर्शन हे मानसशास्त्र, तत्त्वज्ञान, विज्ञान, नीतिशास्त्र व अध्यात्मशास्त्र यांचा अनोखा समन्वय आहे.

योगसूत्रांवर व्यासांनी लिहिलेले भाष्य प्रसिद्ध आहे. व्यासांनी योगसूत्रांत नसलेल्याही काही संकल्पना स्पष्ट करून योगदर्शनाच्या परंपरेला महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. चित्तभूमि, काल संकल्पना, चित्ताचे अपरिदृष्ट धर्म, द्रव्य स्वरूप इत्यादी महत्त्वपूर्ण विषय व्यासांनी स्पष्ट केले आहेत. वाचस्पति मिश्र यांनी लिहिलेली तत्त्ववैशारदी व विज्ञानभिक्षु यांनी लिहिलेले योगवार्त्तिक  हे व्यासभाष्यावर लिहिलेले दोन प्रमुख टीकाग्रंथ आहेत. याव्यतिरिक्त योगसूत्रांवर भोजवृत्ति, नागेशांची वृत्ति, राघवानंद सरस्वतींचे पातञ्जलरहस्य, शंकरांचे विवरण  इत्यादी अनेक टीकाग्रंथ आहेत.

योगदर्शनाचा सांख्यदर्शनाशी अतिशय जवळचा संबंध आहे. सत्कार्यवाद, त्रिगुणवाद, २५ तत्त्वे दोन्ही दर्शनांमध्ये समान रूपाने स्वीकारलेली आहेत. सांख्यदर्शनाची प्रमुख तत्त्वे समजल्याशिवाय योगाचे तत्त्वज्ञान समजू शकत नाही. जरी महर्षी पतंजलींनी कोणत्याही सूत्रामध्ये वेदांचा किंवा वेदांमधील मंत्रांचा उल्लेख केलेला नसला तरीही योगामध्ये वर्णिलेल्या संकल्पनांचा मूळ आधार वेद आणि उपनिषदे आहेत हे स्पष्टपणे समजून येते. भगवद्गीतेचे तत्त्वज्ञानही काही अंशी योगदर्शनाशी मिळतेजुळते आहे. भगवद्गीतेच्या पुष्पिकेनुसार गीता  योगशास्त्रच आहे, तरीही तो संपूर्णतया योगदर्शनाचा ग्रंथ आहे असे म्हणता येऊ शकत नाही. कारण गीतेमध्ये सांख्य आणि वेदान्त दर्शनांची तत्त्वेही प्रतिपादित केलेली आहेत. तसेच योगदर्शनाचे प्रधान लक्ष्य चित्तवृत्तींचा निरोध हे गीतेचे प्रधान लक्ष्य नाही. योगदर्शन आणि गीता  यांचे स्वरूप आणि प्रयोजन यांमध्ये भिन्नता आहे.

जरी भारतीय दर्शनांमध्ये सहा दर्शने वेदांना प्रमाण मनात असली तरीही त्या आस्तिक दर्शनांचे मुख्य विषय वेगवेगळे आहेत. न्याय दर्शनाचा विषय प्रमाण आणि शास्त्रार्थाचे वाद इत्यादी प्रकार हा आहे. वैशेषिक दर्शनाचा विषय जगात अस्तित्वात असणाऱ्या भौतिक आणि अभौतिक पदार्थांचे विभाजन कसे करावे आणि त्यांचे स्वरूप काय आहे असा आहे. पूर्वमीमांसा दर्शनाचा विषय वेदांमध्ये वर्णित कर्मकांड आणि त्याचे विवेचन हा आहे. वेदान्त दर्शनाचा विषय उपनिषदांचे तत्त्वज्ञान आणि आत्मा हा आहे. सांख्यदर्शनाचा विषय सृष्टिप्रक्रिया, जीवाचे स्वरूप आणि २५ तत्त्वे हा आहे. योगदर्शनाचा मुख्य विषय चित्त, त्याचे स्वरूप, त्याच्या क्रिया आणि साधनेसाठी चित्ताची शुद्धता कशी करावी हा आहे. याचप्रमाणे योगदर्शन एक स्वतंत्र दर्शन असून त्यामध्ये वर्णिलेले विषय हे मानसशास्त्रीय अभ्यासासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत.

पहा : योगसूत्रे, महर्षि पतंजलि, व्यासभाष्य.

                                                                                                समीक्षक : कला आचार्य