धर्म हा शब्द ‘धृ’ या संस्कृत धातूपासून बनलेला असून या धातूचा मूळ अर्थ ‘धारण करणे’ असा होतो. या अर्थानुसार एखाद्या व्यक्तीमध्ये किंवा वस्तूमध्ये जे जे गुण, जो जो स्वभाव, जी जी वैशिष्ट्ये इत्यादी असतात किंवा धारण केली जातात, ती सर्व त्या व्यक्तीचे किंवा वस्तूचे धर्म आहेत असे समजले जाते.

एखाद्या पदार्थामध्ये एकाच वेळी अनेक धर्मही असू शकतात. उदा., पुस्तक वाचणाऱ्या व्यक्तीमध्ये मनुष्यत्व, वाचकत्व (वाचणे हा धर्म), द्रष्टृत्व (पाहणे हा धर्म) असे अनेक धर्म असू शकतात. काही धर्म मनुष्यात/वस्तूत अगदी थोड्या काळासाठी राहतात, तर काही धर्म तुलनेने दीर्घ काळासाठी राहतात. जोपर्यंत पुस्तक वाचण्याची क्रिया चालू आहे, तोपर्यंत वाचकत्व धर्म व्यक्तीमध्ये असेल परंतु, वाचनक्रिया संपल्यानंतर तिने अन्य काही क्रिया सुरू केली, तर त्या व्यक्तीमध्ये वाचकत्व धर्म राहणार नाही, परंतु तरीही तिच्यात मनुष्यत्व धर्म राहील. म्हणून “एखाद्या पदार्थात जे काही ‘आहे’ (वृत् = असणे), तो त्याचा धर्म होय” असे धर्माचे सामान्य लक्षण केले जाते (‘वृत्तित्वं धर्मत्वम्’ ।).

काही काही धर्म हे व्यक्तीच्या किंवा वस्तूच्या मूळ स्वरूपात परिवर्तन घडवून आणतात तर काही धर्म व्यक्तीच्या किंवा वस्तूच्या मूळ स्वरूपात परिवर्तन घडवत नसूनही ते धर्म म्हणून राहतात. उदा., एखादा मातीचा घडा निळ्या रंगाचा आहे त्यामुळे ‘नीलत्व’ (निळेपणा) हा त्याचा धर्म होऊ शकतो. त्या घड्याला पिवळा रंग दिला असता ‘पीतत्व’ (पिवळेपणा) हा त्याचा धर्म बनतो. नीलत्व किंवा पीतत्व हे घड्याच्या स्वरूपात परिवर्तन घडवून आणणारे धर्म आहेत. एखाद्या व्यक्तीमध्ये प्रसंगानुरूप पितृत्व, पुत्रत्व, मित्रत्व,स्वामित्व असे अनेक धर्म दिसून येतात; परंतु, ते धर्म व्यक्तीच्या स्वरूपात काही परिवर्तन घडवून आणत नाहीत.

योगदर्शनामध्ये चित्ताचे विविध धर्म सांगितले आहेत. ज्यावेळी चित्तामध्ये वृत्ती उत्पन्न होतात, त्यावेळी चित्तामध्ये ‘व्युत्थान धर्म’ असतो. ज्यावेळी चित्ताच्या सर्व वृत्तींचा निरोध होतो, त्यावेळी चित्तामध्ये ‘निरोध धर्म’ असतो. हे दोन धर्म परस्परविरोधी आहेत. ज्यावेळी रजोगुणाच्या प्रभावामुळे चित्त चंचल होते व प्रत्येक क्षणी चित्तात नवनवीन वृत्ती उदयाला येतात, त्यावेळी चित्तामध्ये ‘सर्वार्थता (सर्व विषयांकडे प्रवृत्त होणे हा) धर्म’ असतो. ज्यावेळी सत्त्वगुणाच्या प्रभावामुळे चित्त स्थिर होते व दीर्घकाळ एकाच विषयावर केंद्रित होते, अशा चित्तामध्ये ‘एकाग्रता धर्म’ असतो. ज्यावेळी एका धर्माची निवृत्ती होऊन दुसरा धर्म उदयाला येतो, त्यावेळी त्याला ‘परिणाम’ असे म्हणतात, अशी परिणामाची व्याख्या व्यासभाष्यामध्ये केलेली आहे (व्यासभाष्य ३.१३).

धर्मांचा जो आश्रय आहे, त्याला ‘धर्मी’ असे म्हणतात. पदार्थाच्या धर्मांमध्ये परिवर्तन झाले तरीही धर्मी अपरिवर्तनीय राहतो. महर्षि पतंजलींनी धर्मीचे लक्षण “शान्त म्हणजे भूतकालीन, उदित म्हणजे वर्तमानकालीन आणि अव्यपदेश्य म्हणजे भविष्यकालीन अशा तीनही प्रकारच्या धर्मांमध्ये समान रूपाने असणारा तो धर्मी” असे केले आहे (‘शान्तोदिताव्यपदेश्यधर्मानुपाती धर्मी |’ योगसूत्र ३.१४). उदा., आताचा युवक पूर्वी बालक होता व नंतर वृद्ध बनणार आहे. अशा स्थितीत ‘बालकत्व’ हा भूतकाळातील धर्म असल्याने त्याला ‘शान्त’ धर्म, ‘युवकत्व’ हा वर्तमानातील धर्म असल्याने त्याला ‘उदित’ धर्म व ‘वृद्धत्व’ हा भविष्यातील धर्म असल्याने त्याला ‘अव्यपदेश्य’ धर्म म्हणता येईल. या तीनही धर्मांमध्ये अवस्थित असणारा मनुष्य म्हणजे ‘धर्मी’ होय.

योगदर्शनातील उदाहरणानुसार पूर्वी चित्त चंचल असताना त्यामध्ये सर्वार्थता हा धर्म होता. त्यानंतर वर्तमानात ते एका विषयावर एकाग्र झाले असता त्यामध्ये एकाग्रता हा धर्म आहे व भविष्यात जर चित्ताच्या सर्व वृत्ती निरुद्ध झाल्या तर त्यामध्ये निरोध हा धर्म असेल. अशा प्रकारे सर्वार्थता हा धर्म होऊन गेल्यामुळे तो ‘शान्त’ धर्म, वर्तमान स्थितीत असणारा एकाग्रता हा ‘उदित’ धर्म व भविष्यात होणारा निरोध हा ‘अव्यपदेश्य’ धर्म या तीनही धर्मांमध्ये चित्त अवस्थित असते, त्यामुळे या तीन धर्मांचा धर्मी म्हणजे चित्त होय.

अशा पद्धतीने योगदर्शनामध्ये धर्म आणि धर्मी या संकल्पना स्पष्ट केल्या आहेत.

समीक्षक : कला आचार्य